मराठी, स्पॅनिश व कातालान

माझ्या बार्सिलोना (स्पेन)च्या दीड-दोन महिन्यांच्या वास्तव्यांत येथील भाषेविषयी काही गमतीदार गोष्टी आढळून आल्या. येथे दोन भाषा चालतात. एक स्पॅनिश, जी स्पेनची राष्ट्रभाषा आहे व दुसरी कातालान, जी बार्सिलोना ज्या काताल्युनिया प्रांतांत आहे त्याची प्रादेशिक भाषा आहे. पैकी स्पॅनिश पश्चिमेकडील सर्व देशांत मान्यता पावलेली भाषा आहे. युरोपमध्ये तर स्पेनच्या बाहेरही इतर देशांत इंग्रजीपेक्षा स्पॅनिश ज्यास्त प्रमाणांत उपयोगी पडते. या भाषेची जी वैशिष्ट्ये नजरेस आली ती अशी :


१) स्पॅनिश लोक "र" चा उच्चार स्पष्टपणे करतात. इथल्या निवासी मराठी गृहस्थांकडून असे कळले की स्पॅनिश लोकांना, जगांत फक्त आपल्यालाच "र" हे अक्षर उच्चारता येते असा (अज्ञानमूलक) अभिमान आहे. त्या (मराठी) गृहस्थांनी अर्थातच त्यांच्या संपर्कांत येणाऱ्या स्पॅनिश माणसांचा तो गैरसमज दूर केला आहे.


२) पुढे गप्पांच्या ओघांत असेही कळले की मराठींत ज्याला आपण 'अननस' म्हणतो त्याला स्पॅनिश भाषेंतही 'अननस' असेच म्हणतात. हे ऐकल्यावर आणखी काही शब्द जुळतात का ते पाहावे असे वाटल्यामुळे पुढे शोध घेतला तेव्हा 'अननस' या शब्दाइतके नाही तरी बऱ्याच प्रमाणांत मराठी शब्दांशी साम्य असलेले काही शब्द स्पॅनिश व कातालान भाषांत आढळून आले. ते असे :



  • तू - तू  (इंग्रजी you या अर्थी)

  • के? - काय?

  • दोन (२) - दोस

  • तीन (३) - त्रेस

  • सहा (६) - सेइस

  • सात (७) - सिएते

  • नऊ (९) - नुएव (स्पॅ), नऊ (काता.)

  • दा - दे, दे - द्या (स्पॅनिश मूळ धातू 'दा' अर्थ 'देणे')

  • नातू - नियेतो

  • नात - नियता

  • देव - दिओस (स्पॅ), देऊ (काता.)

  • पाय - पिए (स्पेलिंग pie)

  • दिवस - दिया

  • मास ('महिना' या अर्थी) - मेस

  • बटाटा - पटाटा

  • संत्रे (नारिंग) - नारंखा

  • पाखरू - पाखारो

  • मेज ('टेबल' या अर्थी) - मेसा

  • चोखणी (मूल रडू नये म्हणून तोंडात देतात ती) - चुपेते

  • (अक्षरे न जुळणारा पण भावार्थाने जुळणारा शब्द) तोंड - बोका

वरील यादी मला भेटलेल्या बार्सिलोनावासी मराठी गृहस्थांच्या रोजच्या व्यवहारांतील स्पॅनिश/कातालान च्या ज्ञानाइतकी मर्यादित आहे. संपूर्ण भाषा शिकल्यास आणखी बरेच शब्द मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.


पुढे असेही कळले की स्पॅनिश भाषेंतील काही शब्दांचे इंग्रजी शब्दांशीही बरेच साम्य आहे. त्याचबरोबर तिच्यांत बरेच शब्द अरबी भाषेंतून आलेले आहेत. स्पेनवर चार शतके मुसलमानांचे राज्य होते.