जसा होता (आणि अनुभवला )तशा भारतावर प्रेम केलेला महामानव

भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांना संबोधले जाते त्या बाबासाहेब आंबेडकरांचा आज (डिसेंबर ६, २००६) पन्नासावा महानिर्वाण दिन. त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी दुसरा एक चर्चेचा धागा चालू आहे. येथे मात्र मी त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या बद्दल वाचलेल्या आणि ऐकलेल्या काही ऐतिहासिक गोष्टी संकलीत करत आहे. यात बाकीचे संदर्भ आठवणीत नसले तरी एक संदर्भ हा श्री. अविनाश धर्माधिकारी यांच्या "आपण त्यांच्या समान व्हावे " या व्याख्यान मालेतील बाबासाहेबांच्यावरील व्याख्यान्याचा आहे. आपण वाचून झाल्यावर जर अजून काही आठवत असेल तर यात अवश्य लिहा.


बाबासाहेबांचे मुळचे पिढीजात आडनाव हे सकपाळ होते. त्यांच्या वडीलांनी रामजींनी ते बदलून सुभेदार केले. कालांतराने बाबासाहेबांच्या आयुष्यातील जे काही शिल्पकार/मार्गदर्शक होते त्यात त्यांचे "आंबेडकर" नावाचे शिक्षक होते. बाबासाहेबांनी ते आडनाव कधीपासून घेतले ते मात्र मला माहीत नाही. बाबासाहेबांचे घर हे नाथसंप्रदाय मानणाऱ्यांपैकी एक होते. चक्रधर स्वामी (महानुभाव पंथ ) आणि कालांतराने निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे सर्व नाथसंप्रदायी झाले. या संप्रदायाने कालानुरूप समता आणायचा समाजात प्रयत्न केला. विद्यासंपादन  आणि हरीकथानिरूपण या दोन गोष्टींना महत्त्व दिले, जे वडील रामजी सुभेदारांनी पुढे भिमरावला दिले.. आंबेडकरांचे वाचन अफाट होते आणि तशीच ज्ञानसाधनेची इच्छा.


लहानपणी महाराचे पोर म्हणून जे काही येयला पाहीजेत ते कडवट अनुभव पदराशी आले होते. विहरीवर आधी गोरा दिसतोय म्हणजे "वरच्या" जातीतलेच असणार या "गैरेसमजुतीने" आधी पाणी देणे पण वस्तुस्थिती समजल्यावर बेदम चोपणे नशिबी आले. तसेच लहान भावाबरोबर वडलांना भेटायला जात असताना अढळी ते मसूर चालत प्रवास तर नंतर साताऱ्यापर्यंत जायला एकाने बैलगाडीत घेतले आणि "वस्तुस्थिती" समजल्यावर मार देऊन हाकलले. या आणि अशा अनेक कडवट आठवणी बाबासाहेबांच्या आयुष्यात भरल्या होत्या. पण वैशिष्ठ्य असे की त्यांनी कदाचीत पुढे त्या जखमा भरून  आणण्याचा जसा प्रयत्न केला नसेल तसाच त्यांनी चांगल्या अनुभवाची कृतज्ञतापण आयुष्यभर विसरले नाहीत. म्हणूनच त्यांना "आपल्या धर्माच्या " चुकीच्या पद्धतीची चिड आली, राग आला, प्रसंगी बोलून दाखवला, विरोध केला पण त्यामुळे देशाची माणसांची लाज वाटत ते गप्प बसले नाहीत, तर अखंड काम करत देश चांगल्या वळणावर आणायचा प्रयत्न केला. म्हणूनच जेंव्हा ब्रिटीशांनी गोलमेज परीषदेत त्यांचा उल्लेख हा दलीतांचा पुढारी म्हणून केला तेंव्हा त्यांनी सावधपणे लगेच सांगितले की फक्त दलीत नव्हे तर साऱ्या भारताचा पुढाऱी आहे (आमच्या फूट पाडू नका!). आम्ही हिंदूच आहोत फारतर फार आम्हाला "प्रोटेस्टंट हिंदू" म्हणा.


बाबासाहेबांच्या आयुष्यात दोन "अ-द्लीत" शिक्षक आले, पेंडसे आणी आंबेडकर. दोघांनीही त्यांच्यावर मुलाससारखे प्रेम केले आणि वागवले. त्यांच्याबद्दल बाबासाहेब कायम कृतज्ञ राहीले.


कालांतराने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधे आणि नंतर कोलंबिया युनिव्हर्सिटीत शिक्षण केले. बडोद्याच्या सयाजीरावांनी शिक्षणाचा खर्च उचलला खरा, पण दरबारातील "उच्च" वर्णियांना ते भावत नव्हते म्हणून गरज असलेली मुदतवाढ न मिळून ते कोलंबियातून अर्ध्याच अभ्यासक्रमानंतर परतले. "महाराला" नोकरी कोणी देत नसल्याने आणि बाँड मधून दरबारी मोकळे करत नसल्याने, त्यांनी सयाजीरावांकडे क्लास १ चे अधिकारी म्हणून कामाला सुरवात केली. पण गड्यासकट सर्वांचा (सयाजी महाराज सोडून) वाईट अनुभव येऊ लागला  त्यामुळे अर्धवट सोडुन मुंबईची वाट धरली. दरबारातील लोकांकडे दुर्लक्ष करून सयाजीमहाराजांनी त्यांना आतामात्र बाँड मधून मुक्त केले.


पण नोकरी मिळेना, सिड्नेहॅममधे काही काळ लाडके प्राचार्य ठरले पण ती नोकरी टिकू शकली नाही. स्वतःचा "शेअर्स"चा धंदा फोर्ट भागामधे चालू केला. "क्लायंट्स"ना आवडायला लागला जो पर्यंत जात समजली नव्हती तो पर्यंत...पोटापाण्याच्या काळजीत असूनही "बहीष्कृत भारत" आणि "समता" अशी दोन पाक्षिके १९२७ आणि १९२८ मधे चालू करून चालवली.


त्याच सुमारास त्यांचा कोल्हापूरच्या शाहूमहाराजांशी संबंध आला. त्यांची विद्वत्ता आणि काम पाहून शाहू महाराज (जे स्वतः काही कमी नव्हते, ते) म्हणाले की "मी बाबासाहेबांचा कार्यवाह होऊन राहीन"!


सि.के. बोले नावाच्या लोकप्रतिनिधीनी विधी मंडळात सर्व तळी पाण्यासाठी जातीनिरपेक्ष मोकळी करण्याचा कायदा संमत केला. केवळ महाड नगरपालीकेने तशाच धर्तीवर स्थानीक कायदा केला. मार्च १९२७ मधे हा कायदा संमत झाल्यानंतर महाडला अस्पृश्यता निवारण परीषद होती. सर्व अस्पृश्यांनी या नव्या कायद्याचा आधार घेऊन चवदार तळ्यावर पाणि प्यायला जायचे ठरवले आणि तसे केलेही. अर्थातच कायदा केला याचा अर्थ माणसे बदलली होती असा नव्हता. मग गुंडगिरी झाली आणि उच्चवर्णीय गुंडांनी तमाम दलीतांना वय/लिंग न बघता मारहाण केली. बाबासाहेब नंतर तिथे आले पण त्यांनी सर्व कायद्यानेच करायचे ठरवले. सावरकर अनुयायी बापूराव जोशींनी त्यांना पाठींबा दिला (तसेच त्यांच्या प्रत्येक लढ्यात सावरकरांनीही पाठींबा दिला). जेंव्हा तळ्याचे शुद्धीकरण करायचे ठरवले तेंव्हा याच जोशांनी पाण्यात बुडी मारली आणी पाणि प्यायले देखील . अर्थातच त्यांना कर्मठ लोकंनी बहीष्कृत केले... पुढे याच चवदार तळ्यावर सत्याग्रहात त्यांच्याबरोबर जे अनेक "अ-द्लीत" होते त्यात ह्या जोश्यांवतिरिक्त लोकमन्यांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळकही होते.


पुढे १९३५ साली नाशिकमधे "काळाराम मंदीर" प्रवेश चळवळ झाली. दलीत आणि तथाकथीत सवर्णांनी एकत्र रामाचा रथ ओढून नेयचे ठरवले. हिंदू महासभेचे डॉ. मुंजे (टिळकांचे आणि नंतर सावरकरांचे अनुयायी, मला वाट्ते भोसला मिलीटरी स्कूलचे संस्थापक) यांनी करार घडवून आणायला मदत केली. पण ऐन वेळेस तथाकथीत सवर्णांनी फसवले आणि मंदीराला कायदा सुव्यवस्थेसाठी टाळा लावला.


गुराढोरांना पाणी पिऊन दिलेल्या तळ्याला महारांनी स्पर्श केल्याबद्दल शुद्धीकरण केल्यामुळे चिडलेल्या आंबेडकरांनी काळाराम मंदीराच्या घटने नंतर १३ ऑक्टोबर १९३५ ला प्रतिज्ञा केली की "मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही".


पुढे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेस फाळणीला कडाडून विरोध करताना त्यांनी धर्मावर आधारीत हिंदू मुसलमानांच्या संपूर्ण लोकसंख्येची अदलबदल व्हावी अशी मागणी केली. यात राजकारण असे होते की सामान्य मुसलमान यासाठी तयार होणार नाही आणि मग आपोआप (थोडा वेळ जाईल पण) फाळणी टळेल. अर्थातच काँग्रेस तयार झाली नाही....


घटनासमितीचे अध्यक्ष म्हणून मूळ मसुदा आणि नंतर बदलासहीत मसूदा एकहाती तयार केला. त्यात समान नागरी कायद्याची मागणी केली. ती मान्य होत नाही म्हणल्यावर घटनेच्या चौथ्या कलमात घालून उत्क्रांतीच्या पद्धतीने ती यावी अशी व्यवस्थ केली.


पुढे नेहेरू मंत्रीमंडळात कायदेमंत्री झाले आणि अत्यंत पुरोगामी (त्याकाळासाठी आणी दुर्दैवाने अजूनही तसेच वाटावे असे) हिंदू कोड बिल संसदेत आणले. अस्पृश्यता गुन्हा ठरवणाऱ्या आणि स्त्रीयांसहीत सर्वांना समानता देणाऱ्या या बिलाला राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांचा विरोध असल्याने नेहेरूंनी ते बिल येऊ दिले नाही. म्हणून निषेध म्हणून राजीनामा दिला. (कालांतराने ते / तत्सम बिल १९५६ मधे पास झाले). तो पर्यंत त्यांनी शेवटचे काम करायचे ठरवले, ते म्हणजे "हिंदू म्हणून न मरण्याची प्रतिज्ञा". मुसलमान आणि ख्रिश्चन संस्था थैल्या मोकळ्या करून तयार होत्या. (अर्थात पोप ने त्या आधी असे गोव्याच्या बाबतीत सांगितले होते की आधी सवर्णांचे धर्मांतर करा, कारण "फक्त दलीत नकोत"!). दुसरीकडे सावरकर, संत गाडगेमहाराज, संत तुकडोजीमहाराज आणि गोव्यातील ख्रिश्चनांना स्वगृही धर्मांतर करून आणणारे मसुरकर महाराज विनवत होते की काही करा पण भारतीय परंपरेशी नाळ तोडू नका. नाहीतर भारत हा भारत राहाणार नाही.


इतर धर्म, कम्युनिझम आणि बौद्ध धर्माचा अभ्यास केल्यावर प्रज्ञा, प्रेम आणि करूणा हे मूळ आणि भारतीय संस्कृतीतूनच तयार  झालेल्या बुद्धाला आंबेडकरांनी महानिर्वाणाच्या सात महीने आधी आपले केले. तमाम दलीतांनी त्यांना सक्रिय पाठींबा दिला हा आता इतिहास आणि वर्तमान आहे.  


महाराष्ट्रातील ग्रामीण भागाबद्दल बोलायचे तर समतेचे प्रतिक असलेल्या विठ्ठल-रखुमाई, ज्ञानेश्वर, तुकोबाबरोबर बुद्ध आणी बाबासाहेबांना देवघर आणि प्रेम लाभले.


मला जाता जाता मुक्ताबाईचा ज्ञानेश्वरांची समजूत काढणाऱ्या (उषा मंगेशकरने गाऊन प्रसिद्ध केलेल्या) अभंगातील काही ओळी आठवत आहेत, ज्या आंबेडकर स्वयंभूपणे जगले असे वाटते:



योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा


विश्वरागे झाले वन्ही, संते सुखे व्हावे पाणी


शब्द शस्त्रे व्हावे क्लेश संती मानावा उपदेश


विश्व सकल ब्रम्ह जोडा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा..


---


जिभ दातांनी चाविली, कोणी बत्तिशी तोडीली?


मन मारून तुम्ही चला, ताटी उघडा ज्ञानेश्वरा...


 


आंबेडकरांच्या वरील अतिशय त्रोटक माहीतीवरून आपण आज काय शिकावे?