एक होता राजा. त्याला दोन राण्या होत्या; परंतु दोघींनाही मूलबाळ नव्हते. आपल्या राज्याला पुढे वारस कोण, असा विचार मनात येऊन राजा दु:खी होई. कशाला हे राज्य, कशासाठी ही धनदौलत, ही कोणाच्या स्वाधीन करू, असे विचार सारखे त्याच्या मनी घोळत. राजेच दु:ख पाहून राण्याही दु:खी होत.
एके दिवशी कोणी तरी एके बोवा आला होता. एक राणी तेथे होती. राणी रडत होती. बोवाजी म्हणाला, 'राणी, राणी तुझ्या डोळ्यांत का पाणी ? राजाची राणी असून दु:खी का ? दासदासी पदरी असून दु:खी का ? रथ, घोडे, हत्ती असून दु:खी का ? तुम्हाला काय कमी ? तुम्हाला कसला तोटा ? तुम्हासारख्या श्रीमंतांनी रडावे मग गरीबांनी काय करावे ? देवाने तुम्हाला भाग्य दिले, राज्य दिले. रडू नका, रुसू नका, सुखाने नांदा'.
डोळ्यांत पाणी आणून राणी म्हणाली, 'शेतात पीक नाही तर शेताला शोभा नाही; तळ्यात कमळ नाही तर तळ्याला शोभा नाही; आकाशात चंद्र नाही तर आकाशाला शोभा नाही; झाडाला फळ नाही तर झाडाला शोभा नाही; शिंपल्यात मोती नाही तर शिंपल्याला शोभा नाही. महाराज, जिला पुत्र नाही, त्या स्त्रीच्या जगण्यात काय अर्थ ? मला 'आई' अशी हाक कोण मारील ? पुत्रवती जी आहे तीच खरी सुखी, तीच भाग्याची, तीच दैवाची. देवाने सारे दिले परंतु हे दिले नाही; देवाने सोने दिले परंतु सोनुकला दिला नाही. मी रडू नको तर काय करू ? राजाचे दु:ख पाहून मला प्राण नको असे वाटते. तुम्ही तरी कृपा करा, मला मुलगा द्या.'
बोवाजीस दया आली. तो म्हणाला, 'माझ्या कृपेने तुम्हाला पुत्र होईल; परंतु दुसरी राणी त्या मुलाचा द्वेष करील. त्याला मारू पाहील. म्हणून मी एक युक्ती करतो. तुमच्या मुलाचे प्राण तुमच्या या राजधानीत जे मोठे तळे आहे, त्या तळ्यात जो एक सोन्यासारखा मासा आहे त्याच्या पोटात ठेवतो. त्या माशाच्या पोटात मी एके सोन्याची साखळी ठेवीन. ती जोपर्यंत तेथे आहे तोपर्यंत तुमच्या मुलाचे प्राण सुरक्षित राहतील.'