आज कविता सोडून काहीतरी दुसरे लिहिण्याचा मूड आलाय. दुसरे काही म्हणजे गद्य. पुलं म्हणतात त्याप्रमाणे गद्य नाही ते पद्य आणि पद्य नाही ते गद्य हे अगदी खरेय. असो. आधी बराहा.कॊम चे आभार. त्यांनी जरा लिहायची सोय केलीये मराठीतून. (प्रशासकांना विनंती - मनोगतावरचे मराठी लेखन बराहा हून खूपच चांगले असून जमल्यास बराहा आय एम इ सारखे सॉफ्टवेअर जरूर काढावे. मी वाट बघतोय.) असो.
'रिमझिम रिमझिम...
रमजिन, रमजिन'
------कवी नलेश सामंत
चार शब्दांची कविता, फक्त चार! त्यातही दोन शब्दांची पुनरुक्ती. म्हणजे खरं तर दोनच शब्दांची किंवा चार अक्षरांची म्हणूया. 'र,म,ज,न या चार अक्षरांनी बनलेली पण गगनाला गवसणी घालणारी!
डीएनए चा रेणू जसा ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन व थायमिन या चार घटकांनी बनलेला असतो पण साऱ्या विश्वाचा जीवनाधार असतो अगदी त्याचप्रमाणे चार अक्षरांत ब्रम्हांडाला कवेत घेणारी.
केवळ याच नव्हे तर पुढच्या दहा शतकांना व्यापून दशांगुळे उरणारी. अल्पाक्षरी कवितेचा उत्तुंग मानदंड!
नलेश सामंत यांच्या कविता आकाराने लहान असतात पण आशयाने महान असतात. त्यात अर्थ ठासून भरलेला असतो. केवळ शब्दामधेच नाही तर अक्षरांतही अर्थ असतो. विरामचिन्हात सुद्धा अर्थ असतो. इतकंच काय पण शब्दाभोवतीच्या रिकाम्या जागासुद्धा अर्थाने परिप्लुप्त असतात. ही कविताही त्याला अपवाद नाही.
पहिल्या ओळीतल्या 'रिमझिम रिमझिम' मधे स्वल्पविराम नाही की अर्धविरामही नाही. नंतर फक्त तीन टिंब आहेत ... रमजिन, रमजिन मधे मात्र स्वल्पविराम आहे. यातून काय सांगायचं असेल त्यांना ? रिमझिम रिमझिम नंतरच्या तीन टिंबांचा काय अर्थ असेल ?
नलेश सामंतांची कविता वरवर पहाता दुर्बोध वाटते, पण खरं तर ती तशी मुळीच नाही. उलट त्यांच्याइतकी सोपी कविता मराठीमधे दुसऱ्या कोणी लिहिली असेल की नाही शंकाच असेल. कदाचित बहिणाबाईं चौधरींचा अपवाद असेल. आणि अर्थातच भिवंडीच्या संयोगिता वरणगांवकरांचा!
नलेश सामंतांच्या कवितेत शिरायची एक वाट असते. ती सापडेपर्यंत कविता दुर्बोध वाटते. पण एकदा का ती सापडली की कविता समजायला वेळ लागत नाही. ही वाट लयीच्या कुंपणातल्या फटीतून अर्थाच्या निबिड अरण्यात शिरते आणि जाणीवेच्या कक्षेला वळसा घालून नेणिवेला कवेत घेते. म्हणून त्यांची कविता समजून घेण्यासाठी त्यातल्या लयीच्याच अंगाने पुढे जावे लागणार हे उघड आहे.
या कवितेतली लय कुठली ?
कवितेत सोळा अक्षरे आहेत. सोळाच का ? पंधरा किंवा सतरा का नाहीत ? याला कारण आहे. त्रितालात सोळा मात्रा असतात आणि कवितेतही सोळा अक्षरं आहेत. म्हणून ही कविता वाचताना सोळा मात्रांचा त्रिताल वाजतो आहे असं वाटतं. गाण्याच्या क्लासमधे शिकवणाऱ्या एखाद्या फालतु तबलजीचा त्रिताल नाही हा! साक्षात खांसाहेब अल्लारखांचा दमदार त्रिताल!! सोळा मात्रांमधे सनातनाचा गाभारा काठोकाठ भरुन टाकणारा त्रिताल!
धा धिं धिं धा धा धिं धिं धा
धा तिं तिं ता ता धिं धिं धा II
आता कुणी म्हणेल त्रितालच का ? झपताल किंवा आडा चौताल का नाही ? यालाही कारण आहे. त्रितालात चार चार मात्रांचे चार विभाग असले तरी ठेका दर्शवणारी टाळी तीन वेळाच वाजते. एक जागा रिकामी असते. म्हणून तर त्रितालाचे वर्णन 'तीन ताली एक खाली' असे करतात. ती रिकामी जागा आपण भरुन काढायची असते, लयीच्या अंगाने! तशीच इथे तीन टिंबानंतरची जागा रिकामी आहे. त्याचा अर्थ लावण्यासाठी रिमझिम रिमझिम चा अर्थ पाहूया.
रिमझिम हा शब्द उच्चारला की मध्यमवर्गीय मनाला आठवतं ते एक जुनं भावगीत.
रिमझिम पाऊस पडे सारखा
यमुनेलाही पूर चढे ।
पाणीच पाणी चहुकडे गं बाई
गेला मोहन कुणीकडे ॥
कसला पाऊस पडतोय हा ? नेहमीचाच पाऊस आहे की काही वेगळं आहे त्यात ? दुषित पर्यावरणामुळे पडणारा विषारी ऍसिड रेन आहे का हा ? की कॉंप्युटरमधे शिरुन त्यातल्या हार्ड डिस्कचा चुराडा करणारा रेन व्हायरस आहे हा ? की आजच्या जगांत चहुकडून कोसळणारा माहिती तंत्रज्ञानाचा पाऊस ? नलेश सामंतांच्या कवितेतला पाऊस आहे तो! कुणा लुंग्यासुंग्या कवीच्या कवितेतला पाऊस नाही. तो नेहमीचा कसा असेल ? त्यातली यमुना ही यमुना नदीच आहे की तेही कसलंतरी प्रतिक आहे ? आणि मोहन तो कोण ? तो नंदाचा पोरटा ? यशोदेचा कान्हा ? द्रोपदीचा सखा की अर्जुनाचा मित्र ?
की सरीवर सरी येऊन गोपींना सचैल न्हाऊ घालणारा हा पाऊस नाहीच ? ही गोकुळातली रिमझिमच नाही. ती 'रिमझिमके तराने लेके आयी बरसात' या गाण्यातली रिमझिम आहे का ? पावसाळी रात्रीच्या पहिल्या मुलाखतीची याद देणारी, मध्यमवयीन मनाला कोमट उभारी देणारी ?
नाही, तसंही नाही, जरा नीट बघुया.
कवितेत 'रिमझिम' नाही तर 'रिमझिम रिमझिम' आहे. अर्थातच ही आहे 'वह कौन थी' या सिनेमातल्या नैना बरसे या गाण्यातली रिमझिम! हरवलेल्या मोहनाला शोधणाऱ्या राधेची ही पाणचट रिमझिम नाही आणि टुकार हिंदी सिनेमातली, नायिकेला पावसात भिजवून आंबटशौकिन प्रेक्षकांना तिच्या अंगप्रत्यंगाचे दर्शन घडवणारी रिमझिमही नाही. ती आहे इतिहासपूर्व कालापासून युगानुयुगे भटकणाऱ्या एका आत्म्याने आजच्या सायबरयुगातल्या आत्म्याला घातलेली साद! उदास रिमझिम, आर्त रिमझिम! पहिल्या ओळीतल्या 'रिमझिम रिमझिम' या दोन शब्दांत स्वल्पविराम का नाही ते आता स्पष्ट व्हावं.
आणि त्यानंतरची ती तीन टिंबं ? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या चिरंतन ऋतुचक्रांशी नातं सांगणारी ? की बालपण, तारुण्य आणि वार्धक्य याची आठवण करुन देणारी ? पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग हे तिन्ही लोक व्यापून टाकणारी ? की साक्षात ब्रह्मा, विष्णु, महेश ? उत्पत्ती, आस्तित्व व विलय यांची प्रतिकं ?
नाही. नीट पहा. नीट निरखून पाहिलं की दिसून येईल की टिंबं तीन नाहीत. तर चार आहेत. चौथं अदृश्य आहे.तीन टिंबांनंतर जी मोकळी जागा आहे तेच चवथं टिंब आहे. असून नसलेलं किंवा नसून असलेलं. जणु त्रितालातली चौथी टाळी, न वाजता वाजणारी, गाण्याला अर्थ देणारी. 'तीन ताली एक खाली' मधून लयबद्ध घुमणारी!
ही दिसणारी तीन टिंबं ह्या आपण ज्या त्रिमित विश्वात रहातो त्याच्या तीन मिती आहेत. लांबी, रुंदी आणि उंची. चौथी मिती काळ. आइन्स्टाईनच्या सापेक्षतेच्या समीकरणातला काळ. तो दिसत नाही पण असतो. पुढं सरकतो, आपल्याबरोबर वर्तमानकाळाला फरपटत नेतो. त्या काळाचं प्रतिक हे चौथं टिंब! न दिसणारं टिंब. निराकार आकार, नीरव ध्वनी. नलेश सामंतांची कविता लयीच्या अंगाने का वाचावी लागते ते आता कळेल. तशी वाचली नाही तर हे चौथं टिंब दिसणारच नाही. लयीच्या अंगाने वाचली तरच त्रिताल ऐकू येतो आणि मग कवितेचा अर्थ लागतो. नलेश सामंत केवळ अक्षरांत आणि विरामचिन्हातच अर्थ भरतात असं नाही पण नसलेल्या विरामचिन्हातही अर्थ भरतात हे आता मान्य व्हायला हरकत नाही.
कवितेतली पुढची ओळ अतिशय महत्त्वाची आहे. रमजिन, रमजिन। सर्वसामान्य वाचकांना हे मद्यप्रकार वाटतील. रम आणि जिन. ते पीत पीत कोणीतरी रिमझिम पावसाचा आनंद घेत बसलंय असं वाटेल. रम हा पुरुषी मद्यप्रकार. सैनिक, शिकारी अशा मर्द गड्यांचा लाडका. आणि जिन जनानी. जिन हे बायकांचे पेय. म्हणून मग रम आणि जिन ही स्त्री-पुरुषांची प्रतिके आहेत असे वरवर पहाता वाटेल. नलेश सामंतांना स्त्रीपुरुष संबंधांबद्दल लिहायचं आहे, प्रकृतीपौरुषेय रंगवायचं आहे असा भास होईल. बाहेर धुवांधार पाऊस पडतोय, कुणीतरी प्रियेला मिठीत घेऊन मद्याचा आस्वाद घेतोय असं चित्र मन:पटलावर उमटेल. पण तो भ्रम आहे, ते खरं नाही.
सामान्य कवीच्या कवितेत एकच अर्थ असतो. चांगल्या कवीच्या चांगल्या कवितेत वर जाणवणाऱ्या अर्थाच्या खाली एक खोल अर्थ दडलेला असतो. तो अर्थ न जाणवणाऱ्या किंवा तिथपर्यंत नजरच न पोचू शकणाऱ्या मंदबुद्धी वाचकांच्या मते ही कविता अर्थहीन ठरु शकेल. कदाचित त्यांना ही कविताच वाटणार नाही. पण अशा मूढांची कींव करण्यापलिकडे आपण काय करु शकतो? या अर्थाच्या पल्याडचा अर्थ कोणता ?
रम या धातूपासून रमणे हे क्रियापद बनते. त्याचा अर्थ खेळणे, आनंद घेणे, उपभोग घेणे, आसक्त होणे(पहा मराठी शब्दरत्नाकर-कै. वा̱. गो. आपटे यांचा शब्दकोश) आणि जिन म्हणजे जितेंद्रिय, जैन साधू (पहा तोच शब्दकोश).
हे अर्थ घेतले की समजते की रम आणि जिन हे मद्यप्रकार नाहीत. ती स्त्री-पुरुषांची प्रतिकेही नाहीत. नलेश सामंतांना त्यातून काहीतरी वेगळच सांगायचं आहे.
रम आणि जिन. इंद्रियसुखात रमणे आणि इंद्रियांवर विजय मिळवणे. उपभोग आणि संयम, आसक्ती आणि विरक्ती, भौतिक आणि पारलौकिक, स्वार्थ आणि परमार्थ, चंगळवाद आणि त्याग. थोडक्यात रम आणि जिन ही मद्यं नसून माणसाच्या मनांतल्या प्रवृत्तीची दोन टोकं आहेत. ज्याक्षणी हे लक्षांत येतं त्याक्षणी थरारुन जायला होतं. नलेश सामंतांना जे सांगायचं असतं ते असंच वैश्विक सत्य असतं.
पहिल्या ओळीत एका आत्म्याचा युगायुगांचा प्रवास आहे हे आपण पाहिलंच. त्यानंतरच्या चार टिंबातील दिक्कालासही अतीत होणं समजून घेतलं. आणि दुसऱ्या ओळीत त्यांनी रंगवलेला सदाचार आणि दुराचार, साधू आणि सैतान, देव आणि दैत्य यांच्यात चाललेला सनातन झगडा पाहून तर मन त्यांच्या प्रतिभेपुढे नतमस्तक झाल्याशिवाय रहात नाही!
केवळ चार शब्दांत त्यांनी कुठल्याकुठे झेप घेतली आहे हे बघितल्यावर त्यांना केवळ याच नाही तर पुढच्या चार शतकातले श्रेष्ठ कवी का मानतात ते समजतं!!!
------- सुबोध जावडेकर
श्री नारायण वासुदेव फडके यांची भैरवी ही कादंबरी नुकतीच वाचली. कादंबरी तशी जुनी आहे - १९८९ ला प्रसिद्ध झालेली. म्हणजे बऱ्याच जणांना कल्पना करायलाही अवघड. असो.
विशेष लिहावेसे वाटले कारण ही कादंबरी सुरुवातीपासूनच वेगळेपण दाखवत जाते. प्रथम म्हणजे श्री द्वारकानाथ कर्णीक यानी केवळ हस्तलिखित वाचले एवढेच नाही तर मुद्रित शोधनही केले. श्रीविद्या प्रकाशनाने हे प्रसिद्ध केले. दुसरे म्हणजे सुरुवातीची अवतरणे. मल्लिनाथ (हे कोण होते कुणाला माहीत आहे का?), रविंद्रनाथ टागोर, आईन्स्टाईन, भवभूती, शेक्सपीअर आणि लॉर्ड बायरन एवढ्या जणांना अवतरवले आहे. त्यातील भवभूती आणि बायरन यांच्या अवतरणांचा सविस्तर उहापोहही केलेला आहे.
जाईच्या कानांवर या गोष्टी गेल्या. रामजीला न कळत ती मोहनच्या बायकोकडे मदत पाठवी. कधी दूध, कधी फळे, कधी काही ती पाठवू लागली. मोहन मरणाच्या दारात होता. त्याला भेटण्यासाठी जाईचा जीव तडफडत होता; परंतु ती जाऊ शकली नाही. तिची व मोहनची भेट ह्या जगात जणू पुन्हा व्हावयाची नव्हती. मोहन मरण पावला !
****************
गजरीच्या दु:खाला अंतपार राहिला नाही. तिला कोणाचा आधार ? माहेरचे मायेचे तिला कोणी नव्हते आणि सासर असून नसल्यासारखे. आपल्या चिमण्या बाळाला जवळ घेऊन ती रडत बसे; परंतु गरीबाला रडण्याला तरी कोठे पुरेसा वेळ आहे ? गरीब मनुष्य काम करील तेव्हा खाईल ! परंतु गजरी कामाला तरी कशी जाणार ? लहान मुलाला कोठे ठेवणार ? त्याला पाठीशी बांधून कामावर गेली असती, परंतु बाळाच्या जिवाला बरेवाईट होईल असे तिला वाटे.
मोहनच्या मरणाची बातमी रामजीला कळली. जाईला कळली. जाई रडरड रडली. एके दिवशी तिने काहीतरी निश्चय केला. रामजीला न सांगता ती गजरीकडे आली. गजरी मुलाला घेऊन बसली होती. जाई म्हणाली, 'वैनी, आपण दोघी एकत्र राहू. दोघी मिळून ह्या बाळाला वाढवू. कधी तू कामाला जा, कधी मी जाईन.'
गजरी म्हणाली, 'तुम्ही आपला सुखाचा जीव दु:खात का घालता ? मामंजी तुम्हाला पुन्हा घरात घेणार नाहीत. आम्ही दु:खात आहोत तेवढं पुरे. होईल कसं तरी आमचं. नाही तर ते गेले तिकडे बाळ व मी जाऊ.' जाईच्या डोळ्यांना पाणी आले. ती केविलवाणी होऊन काकुळतीने म्हणाली, 'वैनी ! नको ग अशी कठोर होऊ. ह्या झोपडीत माझं समाधान आहे. ही गरिबी मला प्रिय आहे. मी सुखात का तिथं होते ? वैनी ! माझ्या मनाची स्थिती कोणाला माहीत ? मी दुर्दैवी आहे. जन्मल्यावर थोड्याच दिवसांत माझे बाबा दूर गेले व मेले. माझी आई मला सोडून गेली. मी ह्यांच्या घरात आले तर इथं पिता-पुत्रांची ताटातूट माझ्यामुळंच झाली. ह्यामुळंच मोहन श्रम करून लवकर मेला. माझा हा पायगुण. मी या साऱ्याला कारण ! जन्मताच आईनं माझ्या गळ्याला नख का लावलं नाही ? देवानं मला जिवंत तरी का ठेवलं ? मला काहीच समजत नाही. मला सुख नको, संपत्ती नको; मला ऐषआराम नको; मला गरिबीतच राहू दे. तुझ्याजवळच राहू दे. तू मला नाही म्हणू नकोस.'
रामजी व राघो दोघे जीवश्चकंठश्च स्नेही, जणू एका घोटाने पाणी पीत, एका प्राणाने जगत. दिसायला शरीरे दोन, परंतु त्यांचे मन एक होते, हृदय एक होते. गावातील सर्वांना त्यांच्या मैत्रीचे कौतुक वाटे.
परंतु काही काही लोकांना ही अभंग मैत्री बघवत नसे. त्या दोघांचे भांडण व्हावे असे त्यांना मनापासून वाटे आणि खरोखरच एके दिवशी तसे झाले.
त्या दिवशी कशावरूनतरी गोष्ट निघाली. रामजी व राघो हमरीतुमरीवर आले. एकमेकांचे तोंड न पाहण्याचे त्यांनी ठरवले. राघो जरा मनाने हळवा होता. ज्या गावात आपण इतकी वर्षे परस्पर प्रेमाने वागलो तेथेच इतके भांडलो ह्याची त्याला लाज वाटू लागली. तो घरातून बाहेर पडेना. त्याचे चित्त कशातही रमेना. खाणे पिणे रुचेना. सुखाची झोप येईना. शेवटी तो गाव सोडून दूर देशी निघून गेला.
राघो आज येईल, उद्या येईल अशी त्याची बायको वाट पाहतं होती; परंतु राघोकडून ना चिठ्ठी ना निरोप. त्याची बायकोही खंगू लागली. ती जेवू लागली म्हणजे नवऱ्याची तिला आठवण येई. पती कुठे असतील, ते जेवले असतील का ? असे मनात येऊन तिचे डोळे भरून येत व तिचे जेवण संपे.
असे काही दिवस गेले. राघो परत आला नाही, परंतु त्याच्या मरणाची दृष्ट वार्ता मात्र आली. ती बातमी ऐकून राघोच्या बायकोने हाय घेतली. थोड्याच दिवसांनी तीही देवाघरी निघून गेली; परंतु लहानग्या जाईला आता कोण ? ना आई ना बाप. लहान वयात जाई पोरकी झाली.
आपला मुख्य विरोध हा जातीय आधारावरील आरक्षणाला आहे, मग त्याच प्रमाणे आर्थिक आधारावरील आरक्षणासाठी पण विरोध असावा असे मला वाटते, कारण जन्मलेला/ली हि कोणत्या जातीत/गावात/शहरात/आर्थिक परिस्थितीत जन्मली हि गोष्ट त्याच्या/तिच्या करियरच्या आड येऊ नये इतकेच. मग याला उपाय काय? सर्वांना समान शिक्षणाची संधी मग त्यात विनामूल्य शिक्षण/फी माफी हे पर्याय योग्य वाटतात. उगीच मी जातीने/आर्थिक परिस्थितीने मागास आहे म्हणून मला आरक्षण द्या म्हणणे कितपत योग्य आहे? माझ्या आजोबा/पणजोबांना पूर्वी त्रास दिला/झाला होता (जो त्रास कदाचित आता मला नसेल हि) म्हणून मला आता आरक्षण द्या याला काय अर्थ आहे? त्याच आधाराने मला केंब्रिज/ऑस्फ़र्ड विद्यापीठांत पण किमान ५०% जागा राखीव हव्यात, आहो या ब्रिटिशांनी आपल्या आजोबा/पणजोबांना पूर्वी त्रास दिला, हीन काम नाहीका करून घेतले ?
पाहा पटते का? - हा वाद मुख्यत्वे कशासाठी? आरक्षणाचा वाद उच्यशिक्षाच्या क्षेत्रा साठीच का? बी.ए./आय.टी. आय. या क्षेत्रात आरक्षणाचा मुद्दा का निघत नाही? कारण आपल्या देशात मुख्यान्वये फक्त उच्चशिक्षितांचे राहणीमान/मिळकत हि इतर सामान्य क्षेत्रातील पदवीधरांपेक्षा फार तफावतीने जास्त आहे. आज आय.टी. क्षेत्रात संधी/मिळकत जास्त आहे, मग उद्या या क्षेत्रात सुद्धा आरक्षण मागितले जाईल का ? (आता मेकॉनिकल/सिविल क्षेत्रांना नको हवे तर...) कदाचित हो, कारण मूळ मुद्दा आहे हा मिळकत वाढवण्याचा आणि राहणीमान उंचावण्याचा, आणि यात काही चूक नाही. कारण समाजात जो पर्यंत आर्थिक समानता/किंवा कमी तफावतीचे राहणीमान निर्माण होत नाही तो पर्यंत आरक्षण वगैरे सारखे मुद्दे निघतच आणि चिघळतच जाणार, आणि मूळ उद्देश जो "न्युत्र्टलायजेशन"/ सामाजिक समानता आहे तो दूरच राहणार. मग हे आपल्या देशातच का? कारण आपल्या कडे असलेली मिळकतीची तफावत, प्रत्येक कामाचा आपण दर्जा ठरवतो आणि त्यानुसार त्याची मिळकत आणि त्यानुसार त्याचे राहणीमान आणि त्यानुसार त्याचा (सामाजिक) दर्जा ठरवतो/ठरतो, उदा. आपल्या कडे बस चालकचे वेतन हे साधारणता ५-८ हजारच असते(किंवा ते तेवढेच योग्य आहे असे आपल्याला वाटते) जरी तो त्या मिळकती पेक्षा जास्त कष्टाचे काम करत असला तरी.कारण शारीरिक कष्टाची किंमत ही त्या पातळीच्या बैद्धिक कामा पेक्षा कमीच मानली जाते. आता जरा विचार करून पाहा हं - तुम्ही त्याला ओळखता आणि, हाच बस चालक जर उद्या आयनॉक्स किंवा तत्सम मल्टिप्लेक्स मध्ये , जीन्स-टी शर्ट घालून, हातात मोबाईल घेऊन गोल्ड क्लास चे तिकिट घेण्या साठी , तुमच्या शेजारी उभा आहे, तुमच्या मनात पहिला विचार काय येईल? अरेच्या हा इथे कसा? याची येवढी ऐपत? म्हणजे आता इथे आपण त्याचा सामाजिक दर्जा त्याच्या मिळकती नुसार ठरवला जाती नुसार नाही. म्हणजे आपल्याला सामाजिक समानता आणण्यासाठी आधी आर्थिक समानता आणली पाहिजे, म्हणजे काय? सगळ्यांना उच्चशिक्षित करून प्रत्येकाचे उत्पन्न वाढवायचे? हे शक्य आहे का? नाही तर उपाय काय ?समाजातील आर्थिक उत्पन्नाची दरी कमी केली पाहिजे, किमान मिळकत कायदा प्रभावीपणे राबवला गेला पाहिजे. आठ तास वर्कशॉप मध्ये काम करणारा पदविका/पदवी धारक आणि आठ तास ब्यांकेत काम करणाऱ्या पदविधारकाच्या मिळकतीत अती तफावत का असावी? (कदाचित हि तुलना इतकी चपखल बसत नसेलही पण कल्पना येऊ शकते). जर सामाजिक समानता आणणे हाच आरक्षणामागचा खरा उद्देश असेल तर त्या आधी "आर्थिक न्युत्र्टलायजेशन"/आर्थिक समानता गरजेची आहे. अन्यथा सगळे नुसतेच उच्चशिक्षित करण्याच्या नादात आपण कळत-नकळत आर्थिक तफावतीला खत-पाणी घालत आहोत,या वर लक्ष नाही दिले तर सध्याची परिस्थिती पाहता लवकरच समाजात १.अधिक मिळकतीचे उच्च शिक्षित संगणक अभियंते
२.सामान्य मिळकतीचे इतर अभियंते/उच्च शिक्षित तरुण आणि
३. सामान्य मिळकतीचे इतर जन
४. उच्य शिक्षित व मिळकतिचे मागास(???) आणि कमी शिक्षित व कमी मिळकतिचे मागास. आशी नवीन समाज व्यव्यस्था निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
"आहो कसला समानतावाद घेऊन बसलात, जगात कोणी कोणासारखे नसते, उगीच उच्य शिक्षणात राखिव जागा साठी भांडण्या पेक्षा प्रथमिक शिक्षण,मुलभुत गरजांच्या हक्कासाठि लढाने गरजेचे आहे...
प्रतिक्रिया स्वागतार्ह्य ...
लोकांना बऱ्याच प्रकारची व्यसन असतात. पण आपण म्हणतो ती व्यसनाधीनता म्हणजे सिगारेट ,दारू,गुटखा,जुगार,बाईचा नाद हे होय. बहुतेक सर्व व्यसनांमध्ये एक समानता असते. उदाहरणे द्यावयाचे झाल्यास पुढीलप्रमाणे -सिगारेटचे देता येईल .बिडी ओढणाऱ्यांपासुन ५५५ चे पाकीट ओढणारा .म्हणजेच व्यसनांची किंमत ही खालपासुन वरपर्यंत वाढत जाते. दारू च घ्या देशी पिणाऱ्यांपासुन उंची विदेशी पिणाऱ्यांपर्यंत .दुर्दैवाने म्हणाव लागत पण ती वस्तुस्थिती आहे वेश्या-बाजरात ही अशीच चढणारी आणि उतरणारी किंमत असते. आता गुटखा खाणाऱ्यांनाच विचारा मधला ' ट' काढल्यास बहुधा ते काय खात असतील यांची कल्पना त्यांना येत असेल. जुगार खेळणाऱ्याचे ही तसेच आहे . छोटी खेळी खेळता खेळता मोठी खेळी तो कधी खेळू लागतो ते त्याच त्याला कळत नाही. म्हणजेच आपण अर्थ काढू शकतो की व्यसने ही सर्व वर्गासाठी आहे पण ऐपतीप्रमाणे . गरीबांची व्यसने वेगळी, मध्यमवर्गाची वेगळी , उच्चभ्रु वर्गाची वेगळी . लहानपणी वाचले होते भुगोलाच्या पुस्तकात विविधतेतच एकता आहे ती एकता बहुधा व्यसनांना लागू पडते. आपण म्हणतो तो वाया गेलाय का तर तो सिगारेट पितो. पण सिगारेट पिणारा वाया कसा जातो ते हळूहळू लक्षात येते.आधी सिगारेट मग दारू मग पुढेपुढे व्यसनांची पायऱ्या चढत तो कसा वाया जातो आणि आपण त्याच्यासाठी एक गाण ही म्हणतो -काय होतास तु काय झालास तु ,अरे वेड्या मुला वाया गेलास तु. पण आपल दुर्देव असे की हल्ली व्यसन ही फॅशन बनलीय. काळाप्रमाणे चालणे आपल्याला आवडत असल्याने आपण बहुधा व्यसनांकडे दुर्लक्ष करतो .आपला शारीरीक व मानसिक ऱ्हास होतोय हे आपण विसरतो. किंवा कळतय पण वळत नाही. म्हणूनच कोणितरी म्हटलय व्यसन हे कधीही सुटत नाही ते सोडण्यासाठी निश्चय करावा लागतो. चला पाहूया निश्चय करून.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बरीचशी लग्ने होतात, परंतू मध्य प्रदेशातल्या सागर, बामनौर येथील एक दलित युवक स्वतःच्या लग्नाच्या वरातीत चक्क घोडीवर बसला होता. लग्नामध्ये घोडीवर बसण्याचा हक्क फक्त उच्चवर्णीयांचा आहे, त्यांमुळे त्याला बराचसा विरोध झाला, लग्नावर बहिष्कार टाकण्यात आला, धमक्या देण्याचे प्रकार झाले. परंतु पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे हा विवाह सुरळीत पार पडला.
ही गोष्ट फार प्राचीन काळातली आहे. तिच्यात अलिकडील काळातील स्थळांशी वा पात्रांशी साम्यस्थळे सापडल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
लाखो वर्षांपूर्वी भरतखंडात एक महाअरण्य होते. सर्व प्रकारचे प्राणी त्यांत रहात होते. पण त्यावर वर्चस्व होते ते माणसांचे! जंगलातल्या इतर प्राण्यांना याची फार खंत होती. स्वतंत्र होण्यासाठी त्यातील अनेकांनी माणसांशी अपेशी झुंज दिली होती, त्यांत प्राणार्पणही केले होते, पण ते व्यर्थ गेले होते. हळुहळू माणसांना या प्रदेशाचा कंटाळा आला होता. तरी वरकरणी तसे न भासवता त्यांनी काढता पाय घेण्याचे ठरवले होते. तुमच्या स्वातंत्र्यलढ्याला मान देउन तुमची चांगली व्यवस्था लावून मगच आम्ही जातो असा पवित्रा त्यांनी घेतला होता. परंतु जाताना त्यांनी जंगलाचे दोन असमान भाग केले. एका भागांत सदैव वखवखलेल्या मांसाहारींची सोय झाली. दुसरा भाग अर्थातच बहुसंख्यीय शाकाहारी प्राण्यांसाठी असावा अशी सर्वांची अपेक्षा होती. पण शाकाहारींचा पहिला राजा हत्तीसमाजाचा होता. त्याचे नांव हत्तेरु. तर या हत्तेरुला मोठेपणा मिरवण्याची खूप हौस होती. त्याच्या बरोबरीचे अनेक हत्ती तशाच विचारांचे होते. त्याने असे फर्मान काढले की ज्या मांसाहारींना इथेच रहायचे आहे त्यांनी खुशाल इथे रहावे, शाकाहारी त्यांना त्रास देणार नाहीत. याचा परिणाम फार गुंतागुंतीचा झाला.
अनेक लबाड लांडगे, शिकारी कुत्रे, कांही वाघ सिंह मागेच राहिले. त्यांना खुष ठेवण्यासाठी त्यांची खास बडदास्त ठेवण्यात आली. तरसांना शिकार करता येत नसल्यामुळे प्रत्येकाने आपल्या शिकारीतला वाटा त्यांना द्यावा असा ठराव पास झाला. वाघ सिंहांनीही खास अधिकार मागून घेतले. बाकीच्यांच्या पदरात मात्र बहुसंख्य असुनही कांहीच पडले नाही. ते बिचारे, स्वतंत्र झाल्याच्या आनंदात "गेले घ्यायचे राहुनी" असा विचार करुन गप्प बसले.
हत्तेरु व त्याचा कळप दिवसाचा बराच वेळ पाणवठ्यावर जलक्रीडा करण्यात घालवायचे. सगळा कारभार त्यांनी गाढवांवर सोपवला होता. सामान्य प्राण्यांचा वाली कोणीच नव्हता. कोल्ह्यांनी या परिस्थितीचा फारच फायदा करुन घेतला होता. लांड्ग्यांनी हरणांवर हल्ला केला तरी हे कोल्हे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करायचे, गप्प बसून मजा बघायचे. पण कधी या हल्ल्यांना कंटाळून शाकाहारी प्राण्यांनी प्रतिहल्ला केला की जंगलभर नुसती कोल्हेकुई सुरु व्हायची. मग हत्ती सर्व प्रकरणाची चौकशी करुन हरणांना शांततेचा उपदेश करायचे आणि अन्य मोठ्या आकाराच्या शाकाहारींना ताकीद द्यायचे. माणसांनी केलेले कायदे पाळायला प्राणी बांधील नव्हतेच! वानरसेना सुरवातीच्या काळात अलिप्तपणे झाडावरची फळे खाण्यात आणि हत्तेरुचे नेमके काय चुकले यावर चर्चा करण्यातच धन्यता मानत होती.
एके दिवशी हत्तेरु मरण पावला. सर्व प्राण्यांना अल्पकाळ चिंता वाटली. परंतु हत्तींनी हत्तीराला महाराणी केले. तिने हत्तेरुच्या तुलनेने बरा कारभार केला खरा, पण सत्तालोलुप खुषमस्कऱ्यांची एक फौजच तिच्याभोवती तयार झाली. सर्व प्राण्यांना एकमेकांशी भांडत ठेवून आपली सत्ता मजबूत करण्यात ती यशस्वी झाली. याचा परिणाम काय होईल याचा फारसा विचार न केल्याने जंगलाचे आस्तित्वच धोक्यात येण्याची वेळ आली. पुढे फार उन्मत्त होऊन तिने सिंहांमधे भांडणे लावून दिली. तेंव्हा ते सहन न होऊन काही सिंहांनी ती बेसावध असताना तिला एकटे गाठून ठार केले. हत्तीराच्या मृत्युनंतर जंगलभर एकच हाहाकार उडाला. हत्तीसमाज तर गलितगात्रच झाला. त्यांनी एकदोन नेते सिंहासनावर बसवले खरे, पण ते सगळेच शेणाचे पुतळे ठरले! हत्तीराचा मुलगा, हत्तीव हा तर फारच अननुभवी, त्या बिचाऱ्याचा या साठमारीत निष्कारण बळी गेला.
हत्तेरुच्या पश्चात माकडांनी सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. पण हत्तीरासमोर त्यांची डाळ शिजली नव्हती. हत्तीराच्या नंतर मात्र त्यांनी शाकाहारी का मांसाहारी हा एक जुना वाद उकरुन काढला. वर्षानुवर्षे हत्तींच्या गैरकारभाराला कंटाळलेल्या प्राण्यांना त्यांत तथ्य दिसू लागले, थोडे कुतुहलही वाटले. कोल्हे मात्र माकडांना तीव्र विरोध करत होते. पण कोल्हे हे बऱ्यावाईट सर्वच गोष्टींना विरोध करतात हे प्राण्यांना माहिती होते. तसेच कोल्हे कधीकाळी सत्तेत आले तर सर्वांनाच उपासमारीचे भय होते. अशा स्थितीत एकदा तरी माकडांना संधी द्यावी या विचाराने बहुसंख्य प्राण्यांनी त्यांचे समर्थन केले. माकडे सत्तेवर आली पण त्यासाठी त्यांना काही नाराज हत्ती, घोडे, गेंडे, जिराफ वगैरेंचे सहाय्य घ्यावे लागले. सामान्य प्राणीही आता जरा बरे दिवस येतील या आशेने हरखून गेले.
पण कसचे काय, माकडांनी सत्तासुरा चढताच माणसांनी त्यांच्यासाठी केलेल्या सर्व म्हणी खऱ्या करुन दाखवल्या!
सारे जंगल अशांत झाले. हत्तींच्या राज्यात कांही नाराज प्राणी, "यापेक्षा माणसांचे राज्य बरे होते" असे बोलून दाखवत. माकडांच्या धुमाकुळात तर यापेक्षा हत्तींचा गैरकारभार बरा होता अशा निर्णयाप्रत सर्व प्राणी आले. पण हत्तींमधे प्रचंड फाटाफूट झाली होती. सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. फक्त लांडगे, कोल्हे व शिकारी कुत्र्यांचे फावले होते. माकडांना पर्याय मिळेपर्यंत सर्व प्राणी माकडांच्या हातातले कोलीत काढून घेण्याच्या प्रयत्नांत होते. माकडांचा प्रमुख एक वयोवृद्ध कपिराज होता. तो हताश झाला होता कारण त्याचे कोणीच ऐकत नव्हते. शेवटी कंटाळून त्यानेही नाचावयास सुरवात केली. मग तर सगळी वानरसेना उत येऊन सूरपारंब्या खेळायला लागली. कावळे नेहमीप्रमाणे कांवकांव करुन या गोंधळात भर घालू लागले. ऊंच झाडावर बसल्यामुळे सर्व बातम्या त्यांना आधी समजत, त्याला तिखटमीठ लावून त्या चिवडण्यातच ते धन्यता मानत. वाईट बातम्या ओरडून पसरवणारे हे कावळे चांगल्या बातम्यांमधे फारसा रस दाखवत नसत.
अस्वले या साऱ्या अराजकात अलिप्त राहून नदीकाठी मासे खाण्यात मग्न होती. शेवटी एकदाचा हत्तींनी पुढाकार घेऊन माकडांना पिटाळून लावले. सर्व प्राणी भयभीतपणाने आता पुढे काय वाढून ठेवले आहे याची वाट पाहू लागली. पण हत्तींमधला कलह पुन्हा एकदा उफाळून आला. वाघ सिंहांमधल्या मारामाऱ्या चालूच राहिल्या. माकडांनी आगी लावायला सुरवात केली.
मूठभर बलवान प्राणी सुखी झाले होते त्या जोरावर सगळ्या जंगलाची खूपच प्रगती झाली असल्याचा हत्ती, कोल्हे व कावळ्यांना साक्षात्कार झाला!!
सामान्य प्राण्यांच्या मते मात्र,
जंगलावरचे वखवखलेल्या प्राण्यांचे छुपे हल्ले चालूच राहिले.
कमजोर प्राण्यांची उपासमार चालूच रहिली.
बलवान प्राण्यांसाठी वेगळा न्याय चालूच राहिला.
जखमेवर मीठ चोळावे तशी "जंगल मे मंगल" ही घोषणा ऐकत रहावी लागली.
जंगलात खऱ्या अर्थाने सुराज्य यावे ही सामान्य प्राण्यांची अपेक्षा फोलच ठरली !!!
त्यांना बिचाऱ्यांना कुठे माहित होते की माणसांच्या राज्यातही हेच चालते ??