भेजा फ्राय - नवीन चित्रपट

भेजा फ्राय हा नवीन चित्रपट कालच पाहिला. वेगळा विषय, वेगळी हाताळणी यामुळे त्यावर लिहावेसे वाटले. मुंबईतल्या चित्रपट आणि संगीत या क्षेत्रात काम करणारी माणसे ही यातील मुख्य पात्रे. त्या अर्थाने 'नवीन' पिढीचा हा चित्रपट आहे. त्यामुळे या पात्रांतील संबंध (वैवाहिक व इतर) हे थोडेसे न झेपणारे वाटू शकतील. परंतु जे मुंबईत 'लोखंडवाला' अथवा तत्सम परिसरात राहिले / फिरले आहेत त्यांना हा विषय फार नवीन वाटणार नाही. किंबहुना, त्यात आपल्या ओळखीचे कोणी असल्याचा भासदेखील होऊ शकतो (जसा काही पात्रांबद्दल मला झाला).

देवगांधार

ओळख बरं आज सकाळी मी कोणाला पहिले ??

पोपटी रंगाचा ड्रेस घातलेला ... मनात प्रश्नांचे, विचारांचे काहुर माजलेले... एक हात सतत पर्स वर ठेवलेला ... दर मिनिटला मनत इच्छा ... देव फोन येउदे, फोन येउदे .... टेलेफोन ओफ़िस समोरुन एकटेच माज़े आनंदाचे झाड चालत येत होते ...

कॅट बस

आम्ही जेव्हा क्लेम्ससन शहरात आलो तेव्हा तिथे आम्हाला भेटली एक बस, ती म्हणजे कॅट बस. कॅट म्हणजे clemson area transit.  शेंदरी व जांभळ्या रंगाची रंगसंगती असलेल्या कॅट बसवर मात्र वाघाचे पंजे उमटवलेले होते. दर पंधरा मिनिटांनी ही कॅट धावत असे आणि महत्त्वाचे म्हणजे चकटफू!! विद्यापीठ, घरांची प्रत्येक कॉलनी व दोन तीन किराणामालाची दुकाने येथे प्रत्येक ठिकाणी ही बस जात असे.

पत्ते

जेमतेम बावन्न पत्त्यांची ही एकत्रित कुटुंबे. चार वर्णाच्या, विविध आवडीनिवडीच्या पत्त्यांनी थाटलेला त्यांचा संसार. इस्पिक, किल्विर, बदाम आणि चौकटच्या गोतावळ्यात वेगळवेगळे पत्ते, त्यांचा त्याप्रमाणे मानही वेगळा. तस म्हटल तर राजाराणीचा सुखी संसार इथेही आहेच की ! गुलामाला राजकुमार म्हटले की झाले.  राजाराणीचा हा संसार वरवर त्यांचा असला तरी त्याचा कर्ताकरविता असतो दुसराच कुणी हुकमाचा एक्का.  त्याच्या एका हुकुमासरशी डावच्या डाव कोसळून पडतात. एरवी उभे असणाऱ्या पत्त्यांना डाव सुरु झाला की एकमेकात मिळून वागण्याचा सल्ला देत, कुणीतरी पिसून काढतो. फर्रकन चित केल्यागत आडव पाडतो आणि पुन्हा उचलून हातात घेतो,' पाहू तरी काय करताय ?'अशा थाटात!

गोमुत्राचा उपयोगाबद्दल काही प्रश्न

हिंदू मान्यतेप्रमाणे 'गाय' या प्राण्याच्या अंगी अनेक दैवी शक्ती आहेत. त्यामानाने बैल मात्र मागे पडलेला दिसतो. असो.
गोमुत्राचा अनेक ठिकाणी उपयोग केला जातो. कदाचित त्यावर संशोधन झाले असावे वा होत असेल.

महाराष्ट्रात भंडारा येथे एका शाळेत दलित विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या शुद्धीकरणासाठी गोमुत्राचा वापर करण्यात आला.

असे का ?

लहानपणापासून मला पडणारे असंख्य प्रश्न. त्यांतील कांही निवडक .........

१. पेरुची बी आणि दांतातली फट एकाच मापाची का असते ?
२. प्रत्येक लग्नांत एकतरी दांताची फणी ओठाबाहेर पसरलेली स्त्री का असते ?
३. हंसताना बहुतेक बायका तोंडावर हात का धरतात ?
४. नथ घातल्यावर आपण चांगले दिसतो असा सार्वत्रिक गैरसमज का आहे ?
५. मुहूर्ताची वेळ न पाळता त्यानंतरही मंगलाष्टके का म्हणत रहातात ?
६. मंगलाष्टके म्हणणाऱ्यांना आपण सुरेल गातो असे का वाटते ?
७. कांही लोकांचे तोंड कायम उघडे का असते ?
८. आपण काहीच म्हणालो नसताना समोरचा माणूस 'काय म्हणताय?' असे का विचारतो?
९. लांब पल्ल्याच्या गाड्यांची दारे एका वेळेला एकच माणूस आंतबाहेर करु शकेल इतकी लहान का असतात ?
१०. रिझर्व्हेशनच्या डब्यांत शिरताना आपण नेमके आपल्या सीटच्या विरुद्ध दिशेने आंत का शिरतो?
११. दादर (मध्य) स्टेशनच्या प्रत्येक उदघोषणेमागे एक प्रश्नचिन्ह का असते ?
१२. लोकलमधे आपल्याच सीटच्या खाली आवाज करुन दचकवणारा काँप्रेसर का असतो?
१३. लोकलमधे पंख्यांना स्विच ठेवण्याऐवजी कंगवेच का नाही ठेवत ?
१४. सर्व फेरीवाले आवाजाचे स्पेशल ट्रेनिंग घेऊन आलेले असतात का ?
१५. डाऊन आणि अप हे कोणत्या दिशांच्या आधारे ठरवतात ?
१६. टाईमटेबल मधे छापलेले खाद्यपदार्थाचे दर कोणत्या जमान्यातले असतात ?
१७. लोकांना 'पूल' वापरायला सांगणाऱ्या रेल्वेचे कर्मचारी स्वत: रुळ का ओलांडतात ?
१८. हवाईअड्डा हे नांव 'सर्व प्रकारच्या गुन्हेगारांचे  स्थान ' या अर्थाने ठेवले असेल का ?
१९. परदेशी जाताना चित्रविचित्र पोशाख का घालावे लागतात ?
२०. कुठलीही माहिती न लपवता आपली 'योजना' सांगणारी मोबाईल कंपनी आस्तित्वात आहे का ?
२१. मराठी वाहिन्यांवर कायम 'अशुद्धलेखन का असते ?
२२. ठळक बातम्या सांगताना शक्य तेवढा वाद्यांचा गोंगाट का करतात ?
२३. दु:खद बातमी सांगतानाही काही वाहिन्यांवर मागे तबले का बडवले जातात ?
२४. बोलण्याची सुरवात संवाददात्याला कायम 'देखिये' या शब्दानेच का करावी लागते ?
२५. मुलाखतींच्या कार्यक्रमात दूरध्वनीवरुन प्रश्न विचारणारे मानसिकदृष्ट्या सक्षम असतात का ?
२६. सर्वात आचरट जाहिरातीचे बक्षीस टीव्हीला मिळेल का एफेम रेडिओला ?

पोलंड, चेक, स्लोव्हाकिया आणि ऑस्ट्रियामध्ये कोणी आहे का?

मंडळी,

कंपनी कामानिमित्त वरील देशांत धाडत आहे. कोणी मनोगती वरील देशात आहेत काय? वॉर्सॉ, प्राग आणि व्हिएन्ना मध्ये राहायची खात्रीशीर सोय कुठे होऊ शकेल ह्याबद्दल कोणी सांगू शकेल काय?

बिगर इंग्रजी देशांत जायचा पहिलाच प्रसंग असल्याने जरा फ़ुंकून पितोय!

थोरामोठ्यांच्या सहवासात...

चांगभलं दादानूं, सदानंदाचा येळकोट घ्या तायानूं!
बरं का मंडळी, फार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. संध्याकाळची वेळ होती. मुंबापुरीतल्या एका त्यातल्या त्यात शांत गल्लीतून मी आणि छगन्या रमतगमत फिरत होतो. आमचा छगन्या म्हणजे एक भारी व्यक्तीमत्व बरं का! कुठही जायचं म्हटलं की आधी स्वारी माझ्या दारात येऊन साद घालणार,"झेंगट्या, आहेस का मायजयां वागानं खाल्ला तुला?' (मायजयां ही आमच्या कोकणातली बोलीभासा आसा हां! नायतर पुन्ना माज्या चावडीवर होळीची लाकडं जमवीन मी!) झेंगट्या हे काही माझं खरं नाव नाही बरं का मंडळी! पण दोस्तांत मी झेंगट्या याच नावानं ओळखला जातो. हां, तर सांगत काय होतो, अशी छ्गन्याची साद आली की मी निमूटपणे लेंगाबिंगा चढवून पायताणं घालायला लागायचो. छगन्या तोवर "काय मावशी, तब्येत काय म्हणते आता?" अशा चौकशा करुन बेसनाचा लाडूबिडू खाऊन पायजम्याला हात पुसत उभा असायचा.तर असा एकदा छगन्याबरोबर फिरायला बाहेर पडलो. फिरताफिरता किती लांब आलो ते कळालंच नाही. नेहमीप्रमाणं काहीतरी गुणगुणत होतो. एकदोन जागा झिंझोटीच्या अंगानं गेल्या आणि वरच्या गॅलरीतून अचानक आवाज आला " भालो, खूब भालो - कौन गाना गाता हाय?" मंडळी, आवाज ओळखीचा वाटला आणि वर वळून पाहिलं तसा अंगावर सर्रकन काटाच आला !
वरच्या मजल्यावरुन साक्षात थोरले बर्मनदा खाली बघत होते. थोरले बर्मनदा म्हणजे आमचे आराध्य दैवत बरं का मंडळी! आम्ही डोळे भरून पहात राहिलो. नकळत पायातली पायताणे काढून छातीशी धरली. बर्मनदांनी त्यांच्या गुरख्याला काहीतरी ओरडून सांगितलं गुरखा लगबगीनं आमच्या जवळ आला. आम्ही नजर न हलवता अमिताभने मुलाला आणि सुनेला तिरुपती बालाजीच्या पायावर घालताना बघावं तशा भक्तीभावानं वर बघत होतो. "आय, लडका लोग, टुमको शाब बुलाटा हाय" गुरखा दरडावणीच्या स्वरात म्हणाला. काय सांगू मंडळी, अहो, 'पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा' अशी आमची अवस्था झालेली. लगबगीनं आम्ही पायर्‍या चढून वर गेलो. बर्मनदा झोपाळ्यावर बसले होते. तोंडात भरपूर रंगलेले पान होतेच. आम्ही त्यांच्या पायावर लोळणच घेतली. "अरे बेटा, गले मिलो -" बर्मनदांनी आम्हाला उराशी धरले. "अब सुनाओ, जो नीचे गा रहे थे.." अहो, बर्मनदांसमोर गायचं म्हणजे काय खायचं काम आहे का मंडळी! आम्ही मनातल्या मनात रोकडेश्वराचं स्मरण केलं आणि पेटी पुढे ओढली. झिंझोटी म्हणजे आमचा आवडता राग बरं का मंडळी! साधारण अर्धा तास आम्ही तो आळवला. बर्मनदा तल्लीन होऊन ऐकत होते. "जिओ बेटा जिओ, क्या तैयारी हाय! अब ये सुनो - " असं म्हणून बर्मनदानी आमच्याच सुरावटीवर बांधलेली रचना आपल्या खड्या आवाजात गायला सुरुवात केली
"मोसे छल किये जाय
हाय रे हाय देखो
सैंया बेईमान -"
(पुढे ती रचना खूप गाजली वगैरे सगळा इतिहास आहे, पण त्याविषयी पुन्हा कधीतरी!) बर्मनदांच्या घरुन चमचम, शोंदेश वगैरे खाऊन भरल्या पोटाने आणि तृप्त मनाने आम्ही पायर्‍या उतरत होतो तेवढ्यात खालच्या मजल्यावरुन "ऑरे झेंगट्या, तुम इदर क्या करता हाय?" अशी आणखी एक हाक ऐकू आली. टी शर्ट आणि शॉर्टसमधली एक चष्मीश गोलमटोल आकृती घरातल्या घरात फुटबॉल खेळत होती. हा आपला पंचम बरं का मंडळी! माझ्या गणेशोत्सवातल्या गाण्याच्या कार्यक्रमात कधीतरी तंबोरा धरायला वगैरे यायचा. 'रैना बीती जाय - ' चा वेळी सुरुवातीचा आलाप कसा घ्यायचा यावर रडकुंडीला आला होता बिचारा. 'झेंगट्या. बचा लो यार. दीदी का गाना हाय, अच्छा होना चाहिये - ' असं म्हणत माझ्या घरी आला होता. तेंव्हा त्याला पुढ्यात बसवून त्याच्या गळ्यातनं ती जागा घोटवून घेतली होती. पुढे ते गाणं खूप गाजलं. त्याचा एक वेगळा किस्सा आहे, पण तो किस्सा पुन्हा कधीतरी -
बर्मनदांच्या घरुन बाहेर पडलो. मन धुंद झालं होतं. ही संगीताची धुंदी काही वेगळीच चीज आहे बरं का मंडळी! चालत चालत पेडर रोडवर कधी आलो ते कळालंच नाही. अचानकच आजूबाजूची गर्दी वाढल्याचं जाणवलं. लोक टाचा उंच करकरुन बघत होते. आम्हीही गर्दीत सामिल झालो. पांढऱ्या शुभ्र साडीतल्या लतादीदी गच्चीत फेऱ्या मारत होत्या. त्यांचा दारवान पांडुरंग माझ्या चांगल्याच ओळखीचा आहे (आम्ही दोघे पास्कलच्या अड्ड्यावर - पण तो किस्सा पुन्हा कधीतरी!) "काय झेंगट्या, तंबाखू काढ गड्या!" पांडुरंग म्हणाला. मी पुडी त्याच्या हातात ठेवली. "दीदी भेटतील का रे पाच मिनिटं?" मी भीतभीतच त्याला विचारलं. "थांब हां जरा - मी विचारुन येतो - ही तंबाखू धर जरा तोवर" पांड्या माझ्या हातात मळलेली तंबाखू देऊन हात झटकत आत गेला. इकडे आम्ही माना उंचावून बघतोय, हातात मळलेली तंबाखू सत्यनारायणाचा प्रसाद धरावा तशी धरलेली आणि दीदींच्या गच्चीतल्या फेऱ्या सुरुच! 
पाच मिनिटे झाली असतील नसतील. पांड्या धापा टाकत खाली आला "लेका झेंगट्या, दीदी कालपास्नं तुला फोन लावतायत. तू काहीतरी बील भरलं नाहीस म्हणून तुझा फोन बंद आहे, असं काहीतरी रेकॉर्डिंग ऐकू येतंय म्हणे. मला म्हणाल्या, "संगीतात काय जादू असते बघ पांडुरंग! मंगेशीनं आपणहून त्याला पाठवला!" मंगेशी म्हणजे आमचं आणखी एक श्रद्धास्थान बरं का मंडळी! "जा लवकर वर!"
आम्ही परत पायताणे काढून छातीशी धरली. वर गेलो. दीदींच्या फेऱ्या संपल्या होत्या. आमच्याकडं बघून त्या नेहमीप्रमाणं प्रसन्न हसल्या. "या, या, झेंगटराव, अहो कित्ती दिवस झाले, काही गाठ नाही, भेट नाही-" दीदींच्या तोंडून 'कित्ती' हा शब्द ऐकणं म्हणजे एक स्वर्गीय अनुभव आहे बरं का मंडळी! आम्हाला वाटलं आता 'आयेगा आनेवाला-' म्हणतायत की काय! पण त्या म्हणाल्या, "चपला, तिथं दाराशी ठेवल्या तरी चालतील!"
मग आम्ही बसलो. दीदींनी पन्हं मागवलं. दीदींच्या घरचं पन्हं म्हणजे काय चीज आहे मंडळी! छगन्यानं बावळटासारखं तीनतीनदा मागून घेतलं. "अहो, तुमची मुद्दाम आठवण झाली म्हणजे मीरेची काही भजनं रेकॉर्ड करत्येय. बाळचं डायरेक्शन आहे, पण त्यातल्या काही जागा अपुऱ्या वाटतायत मला! आता हेच बघा" दीदींनी चष्मा सावरत आमच्यापुढं कागद ठेवला. आम्ही पुन्हा एकदा रोकडेश्वराचं स्मरण केलं आणि हार्मोनियम पुढं ओढला. पुढं ती भजनं खूप गाजली वगैरे -पण तो किस्सा पुन्हा कधीतरी!
 

ह्या गंगेमधि गगन वितळले

p

ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
अर्ध्या हाकेवरी उतरला बुद्धगयेचा पिवळा वारा

विटाळलेली मने उघडती झापड-दारे आपोआप
अन् चिखली ये बिचकत श्वास, जणु पाप्याचा पश्चात्ताप

सुरांत भरली टिटवीच्या कुणि, मृत्युंजयता भोळी भगवी
आणि अचानक शिवली गेली, ध्रुवाध्रुवांतील काही कडवी

अजाणत्याच्या आकांक्षांतील शंख-शिंपले येऊन वरती
उघड्या रंध्रांमध्ये अनामिक गगनगंध हा ठेवून घेती

इथेतिथेचे फुटले खापर, ढासळली अन् जरा 'अहम्'ता
उभ्या जगावर चढली अडवी, तव मायेची कमान आता

ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
असशील जेथे तिथे रहा तू, हा इथला मज पुरे फवारा
 -- बा. सी. मर्ढेकर

मर्ढेकरांची ही कविता वाचताना, का ते माहीत नाही, पण हटकून माझ्या डोळ्यासमोर मुंबईतल्या बाणगंगा मंदिराचा तलाव येतो(छायाचित्र येथून साभार). तसं पाहिलं तर, कुठलेही पुस्तक वाचताना आपल्या डोळ्यासमोर ज्या प्रतिमा उभ्या राहतात, त्या आपल्या अनुभवविश्वाच्या संचितातूनच परत वर येत असतात. एखाद्या ग्रामीण पार्श्वभूमीवरील पुस्तकातली वर्णने वाचताना, आपल्या नकळत आपला गाव आपल्या डोळ्यासमोर उभा राहतोच की. त्यामुळे मुंबईतीलच एखादी प्रतिमा या कवितेमुळे माझ्या मनात उभी राहणे हे साहजिकच आहे. अर्थात, हा प्रत्येकाच्या वैयक्तिक अनुभवाचा भाग झाला. दुसरं कारण असं असावं की, मर्ढेकर हे मराठीतील पहिलेच 'महानगरीय' कवी असावेत. निसर्ग, प्रेम, चांदणे, हृदयभंग यांच्याबाहेर पडून शहरातील - आणि विशेषतः मुंबईतील अनुभवांचे चित्रण करणारे. त्यामुळे ही कविता मर्ढेकरांना या (बाण)गंगेच्या पायऱ्यांवर बसून समोरच्या तलावातील आकाशाचे वितळलेले प्रतिबिंब पाहत पाहत, 'देव आहे की नाही? असलाच तर त्याचे काम काय?' असा विचार करत असताना सुचली असावी, असं मला सतत वाटत राहतं.

अर्थात या कवितेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ किंवा तो वापरण्यामागचे प्रयोजन मला पूर्णपणे कळले आहे असे नाही, पण तिचा एकंदर आशय किंवा मूड थोडाफार पकडता येतो. 'भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी' असे म्हटले तरी प्रत्येक गोष्ट, भावना बुद्धीच्या निकषांवर घासून तिचे स्पष्टीकरण देता येतेच असे नाही. विमनस्क परिस्थितीत, अतर्क्य अवस्थेत मग हे दैववादाचे 'विटाळलेले झापडदार' किलकिले होऊ लागते. एकदा का, 'तूच कर्ता आणि करविता' मान्य केले की ज्या प्रश्नांची उत्तरे आपली तर्कशक्ती देऊ शकत नाही असे प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांच्यातले दोन ध्रुवांतले अंतर शिवले जाते. खूप वेळ भेडसावणाऱ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळणे किती सुखद आहे! आजवर अंतर्मनात, नेणीवेत दडपून ठेवलेले, स्वतःलाच कायम विचारलेले हे प्रश्न मग जाणीवेत येऊन हा सुखद उतारा, हा गगनगंध भरून घेतात. एकदा या दृष्टीने मग जगाकडे पाहिले, तर मग सगळ्या चराचरावर त्याचेच राज्य, त्याच्याच मायेची कमान दिसू लागते.

इथवर जरी कवितेचा अर्थ नीट लागत असला, तरी शेवटची परमेश्वराला 'असशील जेथे तिथे रहा तू' बजावणारी ओळ म्हणजे केवळ - 'देव शोधण्यासाठी देवळात जायची गरज नाही, या इथल्या फवाऱ्यात, सभोवतीच्या सृष्टीतच तो लपलेला आहे' अशा काहीशा बाळबोध अर्थाची असेल असा निष्कर्ष काढणे सयुक्तिक वाटत नाही. पण मग, आपल्या ढासळलेल्या 'अहम्'ची कबुली देणाऱ्या कडव्यानंतर अचानक हे आत्मभानाचा प्रत्यय येणारे कडवे का यावे? तात्पुरती चलबिचल झाली, तरी पुन्हा 'व्हेन रीझन रिटर्न्स टू इटस थ्रोन' झाले की जसा नव्याने आत्मविश्वास येतो ते दर्शविण्यासाठी? किंवा यापेक्षा तिसरेच काहीतरी अपेक्षित आहे किंवा काहीच नाही? मला वाटतं, याचं उत्तर प्रत्येकाने आपल्यापुरतं ठरवावं.

ही हवीहवीशी वाटणारी 'किंचित' दुर्बोधता/अनिश्चितता वाचकाला -- शांताबाई शेळकांच्या शब्दांत सांगायचे झाले तर 'जाणीव विरते तरीही उरते अतीत काही, तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही' सारखी अनुभूती देणारी -- मर्ढेकरांच्या कवितांच्या इतर अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणता येईल.