भाषावार प्रांतरचना

भाषावार प्रांतरचना ही एक फसलेली गोष्ट आहे. आपण मारे कितीही नगारे वाजवले तरी मराठी माणसे  म्हणजे नेमके कोण? ( अथवा तेलगु/तामिळ/कन्नड) म्हणजे तरी नेमके काय? जी बोंब मराठीची तीच इतर भाषांची!

महाराष्ट्राची राजधानी - मुंबईच्या विकासात अमराठी पारश्यांचे योगदान केवढे आहे.ज्या टाटा बजाज मुळे पुणे बहरले.. ते मराठी की अमराठी?

मराठीपणा जपताना आपण आपला संकुचितपणा जपतो आहोत का?

तेव्हा भाषेचा अभिमान असावा... आभिनिवेष नसावा. माझ्या मऱ्हाटीचा बोलू कवतुके  म्हणणाऱ्या भागवत संप्रदायाने देखील कानडाऊ विठ्ठलु... स्वीकारला आहेच की!

अवघे विश्वची माझे घर.. म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांना हा संकुचितपणा अपेक्शीत आहे काय?

भाषेच्या वेगळेपणामुळे आपली संस्कृती वेगळी होत नाही. आणि सगळ्या भारतीय भाषा संस्कृतोद्भवच आहेत.(तामिळ सोडून..निदान तामिळि लोकांना तरी तसे वाटते.. व्यक्तिशः मला जेवढे तामिळ माहीती आहे, त्यावरून तामीळ देखील संस्कृतोद्भव आहे असे वाटते..)

भाषा हा निकष लावायचा तर "अटकेपासून कटकपर्यंतचे" राज्य मराठ्यांचे नव्हते काय? सीमेवरील आक्रमणे मोडून काढणाऱ्या शीखांनी कोणत्या "भाषेचे" रक्षण केले? महाराजांनी राज्यव्यवहार कोष निर्मिला त्याचा हेतू मराठीचा प्रचार करावा हा होता की परकीयांचा राज्यकारभारावरील ठसा पुसावा हा होता?

राष्ट्रभाषा हिंदी म्हटलयावर  इतर भाषांचे महत्त्व कमी होते का?

आणि आजच्या जागतिकीकरणाच्या काळात हा ख़रं म्हणजे हा प्रश्नच उरत नाही.

महाराष्ट्र दिनानिमित्त मनोगतावर काही उद्बोधन व्हावे म्हणून हा लेखनप्रपंच!

पुन्हा एकदा...भाषेचा अभिमान असावा... आभिनिवेष नसावा!

भव्य हिमालय तुमचा आमुचा केवळ माझ्या सह्यकडा

गौरीशंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा......

-विटेकर