वाचायला येउ लागले तेव्हापासून मी सतत वाचतेच आहे. लहानपणी बालगोष्टी, किशोर, चांदोबा......जे हाती लागेल ते संपवूनच खाली ठेवायचे. वाचनाचे वेड खूप लोकांना असतेच.अगदी पुडीच्या कागदावर लिहिलेलेही वाचले जाते. कधीकधी त्यावर कुणाचे मन थांबलेले सापडते. वाचनवेडे मान्य करतील की हे वाढत जाणारे वेड आहे. वेगवेगळ्या वयात वाचनाचे प्रकार बदलतात, अर्थही बदलतात. माझाही वाचनप्रवास वेग घेत होता. बालगोष्टी मागे पडल्या होत्या. किशोरवयात पदार्पण केले होते. अनेक नवीन भाव आकार घेत होते. योगिनी जोगळेकर, भालचंद्र नेमाडे, सुहास शिरवळकर, वपु.....हे आवडू लागले. काहिसे हुरहूर लावणारे, स्वप्नात नेणारे लिखाण भावत होते. अशातच उदयचे ( लेखकाचे लोकांना माहित असलेले नांव लिहिलेले नाही, उदय हे त्याचे काही खास लोकांनाच माहित असलेले नाव आहे. ) लिखाण वाचायला मिळाले. बारा-तेरा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. ओघवत्या, भारावून टाकणाऱ्या कादंबऱ्या. मी एकामागोमाग एक वाचितच सुटले होते. पाहता पाहता उदयच्या लिखाणाने माझ्या मनाचा कब्जा घेतला. त्याच्या धुमसत्या, अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या, प्रेमासाठी आसुसलेल्या पात्रांच्या व्यक्तित्वाने, भन्नाट लेखनशैलीमुळे माझ्या मनाने त्याचे रुप रेखाटले होते. अमिताभचा जंजिर येउन गेलेला होता. दिवार,जमीर सारखे सिनेमे गाजत होते. त्याच्या सगळ्या लिखाणातून तोही असाच डॅशिंग, रफटफ पण मनात मात्र हळवा असणार ह्यात काही शंकाच नव्हती. तशातच त्याच्या एका कादंबरीच्या प्रस्तावनेत मला त्याचा पत्ता मिळाला. त्यात त्याच्या जन्मतारखेचा उल्लेख होता. त्यावेळी त्याची तिशी उलटून गेली होती. घर,संसार व लेखनप्रपंच ह्यात दंग असलेला एक प्रभावी लेखक. लेखक कसा दिसतो हे पाहण्याचा मला मोह झाला... वाढदिवस नजरेच्या टप्प्यात आला होता. जराही वेळ न दवडता मी त्याला पत्र लिहिले. वाचून झालेल्या कादंबऱ्या आवडल्या आणि तुम्हाला भेटायची इच्छा आहे असेही लिहिले. त्याआधी घरातील आपली माणसे वगळता मी कोणालाही पत्र लिहिले नव्हते. त्यामुळे असे अनोळखी माणसाला पत्र लिहिताना मोठे साहसच केले होते. माझ्या ह्या खुळेपणाला घरातले सगळे हसत होते. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला उत्तर येईल असे एकदाही वाटले नव्हते. पोस्टमन येइ त्यावेळी मी शाळेत असे. घरी आल्या आल्या मी आईला विचारी, पत्र आलेय का? आई गालातल्या गालात हसून नाही म्हणे. असा महिना उलटला. मुळातच आशा नव्हती त्यात इतके दिवस उलटल्यावर ......एके दिवशी घरी आले तर आई हातात निळ्या रंगाचे आतंर्देशीय पत्र घेऊन उभी. माझा आनंद चेहऱ्यावर मावत नव्हता. पत्रात त्याने सामान्यपणे सगळे लेखक जे लिहितील तेच लिहिले होते. प्रकाशकाना भेटण्यासाठी मुंबईत येणे होतेच तेव्हा नक्की भेटू. आमचा पत्रव्यवहार वाढू लागला. दहावीचा अभ्यास जोर धरु लागला होता. अवांतर वाचनासाठी वेळ कमी पडत होता. दरम्यान त्याची आणिक एक कादंबरी प्रकाशित झाली. पत्रात त्याने मुंबईस येत असल्याचे कळविले. मी वेळ झाल्यास आमच्या घरी या असे आग्रहाचे निमंत्रण दिले.त्याने ते स्विकारले.