आखाती मुशाफिरी (५)

भाग (५)
ते मला उद्या कळणार होते.
------------------------------------------------------------------------
कुणाचाही सल्ला, कुणाचीही परवानगी न घेता मी एक नवा प्रयोग करूं पहात होतो. यशस्वी झालो तर प्रशंसा होईलच याची शाश्वती नव्हती. नव्हे तशी शक्यताही क्षीणच होती. मात्र अपयशी ठरलो तर मात्र धडगत नव्ह्ती. कदाचित परत मायदेशी धाडला जाण्याचीच शक्यता अधिक. कारण प्रस्थापित कार्यप्रणाली बदलण्याचे धाडस ज्यांनी पूर्वी केले त्यांची गत काय झाली होती हे मला माहित होते. पण वांडपणा करण्याची खोड जन्मजात होती त्याला मी तरी काय करणार.

त्यानंतरच्या सकाळी मी कामावर दाखल झालो तेंव्हा ही अशी चलबिचल, काहूर मनांत घेऊनच. कादरखान मनात काहीं तरकीब घेऊन आला होता हे मला त्याच्या उजळलेल्या चर्येवरून दिसत होते. पण मात्र चर्चेसाठींसुद्धा एक मिनिटही वाया घालवण्याची माझी तयारी नव्हती. सर्वांना मी आधी कामाला लागण्याचा आदेश दिला. कादरखान तेवढ्यातही मला कांही सांगू पहात होता. पण मी त्याला ’शुई सबर’ (जरा थांब) असा इशारा दिला. सगळ्या जथ्थ्यामधे ती चर्चा झालीही असावी. कारण उत्सुकतेची अस्फुट रेषा मला जवळ जवळ प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होती. मी पण मी कामाचाच 'यल्गार' केला आणि सारे बिनबोभाट कामाला लागलेही. आज मी या टोकापासून त्या टोकापर्यंत पळापळ करून कामावर देखरेख करणे पसंत केले. आज कुणी कालच्यासारखी गडबड करू धजावला तर त्याला वेळीच खीळ घालण्याचा माझा अंतस्थ हेतू होता. ठीक अकरा वाजतां (बरोबर जेवणाच्या एक तास आधी)मी काम बंद करण्याचा इशारा दिला. सारा जथ्था अचंभ्यात आणि मी, तोपर्यंत एकही मिनिट वाया न घालवता, जितके काम व्हायला हवे होते ते झालेले आहे या समाधानात!

कांही कामगार इकडे तिकडे पांगले. मात्र कादरखान, नुरुलखान आणि आणखी साताठ जण घोळका करून, दबक्या आवाजात चर्चा करीत उभे. त्यांना केबीनकडे येण्याचा इशारा देऊन मीही केबीन कडे वळालो. कालचे चार आणि आज अधिक दोघेजण असे सहाजण केबीनमधे आले. सर्व प्रथम मी शीत्कपाटातून एक पाण्याची बाटली काढून त्यांच्या रोखाने भिरकावली आणि दुसरी घेऊन मी खुर्चीत बसलो. माझी आणि सगळ्यांचे पाणी पिऊन झाल्यावर,
'' हां, बोलो खान '' म्हणत मी सुरुवात केली.
'' साब,  धूपका बहोत तकलीफ. एक तरकीब ये के सुबह येक घंटा जल्दी छूटेगा. जो (जैसे) आज छूटा.. और शामको येक घंटा जियादा काम कुबूल.''
म्हणजे उन्हाचा त्रास होतो हा माझा अंदाज बरोबर होता.
'' लेकिन खान, ये नामुमकीन. मुदीर नही मानेगा. मकतब (मुख्यालय) नही मनेगा.''
'' तो फिर येक बाकल कम करो '' बाकल म्हणजे (ब्लॉक) सीमेंटच्या विटा.
'' मतलब? हम समझा नही !''
'' साब, जमीं कुल्लुश सखत. नीचे बाकल लाज़मी नही''

जमीन कडक असल्याने केबल खालील विटांची गरज नाही. असं त्याला म्हणायचं होतं. बरोबर आहे. ते काम कमी झालं तर वेळ वाचणार होता आणि एकूण कामाची गती वाढण्यासारखी होती. पण हा निर्णय मी कसा घेणार ? कामाची प्रमाणें (स्पेसीफिकेशन्स) बदलणे माझ्या अधिकारांत येत नव्हते. मी म्हणालो,
'' खान, येभी नामुमकीन. तुमको मालूम, ये सब गोरा (ब्रिटिश डिझायनर) मख्ररूर किया. हम के करेगा.''
'' साब ये सब पहले नही होता. रब्बानी चालु किया. ''
'' लेकिन ये सब यूं नही हो सकता. कागज़, फतुरा देखना होगा. हम दरख्हास्त करेगा. लेकिन   तबतक तुम्हारा पहला तरकीब हो सकता.''
'' तो करो. हम तैयार. '' 'तो करो' म्हणण्याची त्याची लकब माजेशीर होती.
'' लेकिन मुदीरके साथ बात करना लाज़मीं है.''
'' तो करो.''
ते सगळे जेवणासाठी लेबरकॅंपकडे रवाना झाले. विटांचा तळाचा एक थर गाळणे हा उपाय मंजूर होण्या सारखा नव्हताच. कामाच्या वेळा बदलणे याचा विचार करणे शक्य होते. पण मुख्यालयाच्या गळी ही गोष्ट उतरवायची तर समक्ष जाणे गरजेचे होते. फोनवर बोलणे औधत्त्याचे मानले जाण्याची शक्यताच अधिक. मी मुख्यालयाला फोन करून अडचणीची त्रोटक कल्पना दिली आणि भेटीची वेळ मागितली. ते लगेच या म्हणाले. एव्हाना दोन वाजले होते. तीन वाजतां पठाण परत कामावर येणार आणि मी जागेवर नाही हे पाहून मौज मस्तीच करणार. कारण मी तीनच्या आंत परत येणे शक्यच नव्हते.
क्षणभर विचार केला, गाडी काढली आणि सरळ लेबरकँप गाठला. मी तिथे पोहचलो तों पठाण गाडीत (ट्रक) चढतच होते. मला पाहिल्याबरोबर जे खाली होते त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे केले. हा बाबा असा इथे कसा उपटला याचे नवल प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होते. कादरखान गाडीजवळ आलाच. मी मुख्यालयाशी बोलून परत येत आहे तोपर्यंत काम चालूच राहिले पाहिजे; ती जबाबदारी त्याची. असे बजाऊन मी मुख्यालयाकडे मोहरा वळवला. मुख्यालयात सर्वप्रथम मी साईट सोडून आलो त्याबद्धल खरडपट्टी झाली.

 माझ्या आखातातील वास्तव्यात मी एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली होती. अधिकारी सहसा ब्रिटिश असत आणि आम्हां भारतीयांना झापायची, तासायची एकही संधी ते सोडीत नसत. मग कर्तृत्वाच्या नावाने ते स्वत: शून्य कां असेनात. हे देश एकेकाळी त्यांच्या वसाहतीत, त्यांच्या अधिपत्त्याखाली होते. पुढे इतका अवाढव्य व्याप सांभाळणे अशक्य झाले आणि भारतापाठोपाठ बहुतेक वसाहतीत स्वतंत्र्याचे वारे वाहू लागले. त्यामुळे या देशांना स्वायत्तता द्यावीच लागली. तरी पराभवाचा तो सल प्रत्येक गोरा मनांत ठेऊन असे. भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात आपले प्रभुत्व दाखवले होत. सिद्ध केले होते म्हणून ते जरा वचकून होते. पण एखादा कमकुवत दुवा दिसला की ते ’ब्लडी इंडियन, ब्लडी निग्गर्स’ म्हणून हेटाळणी करण्यात भूषण मानीत.

मुख्यालयातील चर्चा असफलच झाली. स्पेसीफिकेशनमधे तळाचा विटांचा थर पूर्वी नव्हता पण रब्बानीने, केबलला मातीत खाली झोळ (सॅग) अशी भलतीच भीती घालून ती सुधारणा आमलांत आणून शेखी मिरवलेली होती. हे तो स्टीव्ह मेकॅन्झी नावाचा गोरा मान्य करत होता पण मला पूर्ववत बदल करूं द्यायला तयार नव्हता. कामाच्या वेळेत बदल करण्याची मुभाही नाकारण्यात आली.उलट काम वेळेत पूर्ण झाले नाही तर गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली गेली. निराश मनाने मी साईटवर परतलो. वाटेत साईटवर तरी काय उजेड (!) पडला असेल या चिंतेत होतो.

साईटवर पोहोचतो आणि पाहातो तो काय !

क्रमशः