अनंत या संकल्पनेचे दोन कवडसे आपण या आधी पाहिले आहेत. आज अजून एक कवडसा शोधण्याचा विचार मनात आला. तत्काळ दोन प्रश्न उपस्थित झाले.
१. अनंत या तत्त्वाचे किती प्रकार असतील?
२. ह्या प्रकारांची संख्या अनंत असेल का?
यावर अनुमान लावण्यासाठी संख्यांना पाचारण केले. सगळ्या सम संख्यांनी (२,४,६,८…) दरबारी कानडा आळवायला सुरुवात केली. लगेचच सगळ्या विषम संख्याही (१, ३,६,९,…) जोडीला सुर धरून नाचू लागल्या. त्यांच्या नृत्यात त्या संख्या निरनिराळ्या चमू बनवीत होत्या. चमूंचे समूहनृत्य सुरू झाले. नवीन चमू बनत होत्या आणि जुन्या विसर्जित होत्या. प्रथम सगळ्या वर्ग संख्यांची चमू आली (१, ४, ९, १६, २५, ३६…). निमिषार्धातच ती विसर्जित होऊन घन संख्यांची चमू बनली (१, ८, २७, ६४, १२५…). क्रमशः चमूंचे वैविध्य वाढत गेले. हा सगळा प्रकार इतका आकस्मिक होता की सगळ्या संख्यांना हे नृत्यगान आवरण्याची विनंती केली.