महानगरपालिकेमध्ये एक अवघड दिवस!!

शनिवारचा दिवस होता तो. सलग तीन दिवस सुट्टीच्या आनंदात मी अक्षरशः वेडा होण्याच्या बेतात होतो. शनिवार, रविवार आणि सोमवारी दसऱ्याची सुट्टी!! जीवनात सुख यापेक्षा वेगळे ते काय असते? मग मी एक प्लॅन केला. शनिवारी सगळी महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत आणि रविवारी आणि सोमवारी सुट्टीचा मनसोक्त आनंद उपभोगावा असे ठरवले. मग एक यादी घेऊन मी शनिवारी सकाळी माझ्या दुचाकीवरून निघालो. निघालो म्हणजे काय, फुलपाखरासारखा बागडत निघालो! पहिलं काम गाडी (म्हणजे दुचाकी, पुण्यात सायकलीला देखील गाडी म्हणतात.) सर्व्हिसिंगला टाकणे. मस्त शीळ वाजवत मी गॅरेजला पोहोचलो. बघतो तो काय तिथे तोबा गर्दी. आधीच १२५ गाड्यांची सर्व्हिसिंग करायची आहे आणि आता नवीन गाडी घेतली जाणार नाही असे तिथल्या माणसाने नम्रतेने (विश्वास बसतोय का बघा!) सांगीतल्यावर मी माझा मोर्चा पुणे महानगरपालिकेच्या कोथरुड क्षेत्रीय कार्यालयकडे वळवला. मिळकत कर नावाचा एक कर भरायचा असतो तो भरण्यासाठी मी हिम्मत करुन निघालो होतो. शासकीय कामे करायची म्हणजे हिम्मत लागते आजकाल. कसंबसं मी बळ एकवटलं आणि निघालो. शिवाय दंडाची भीती ही होतीच. म्हटलं भरून टाकावा एकदाचा. हा कर कशासाठी आकारला जातो तेच मला कळलेलं नाहीये आजतायागात. म्हणजे घर घ्यायचं आम्ही, कर्ज घ्यायचं आम्ही, हप्ते भरायचे आम्ही, फर्निचर घ्यायचं आम्ही आणि हे शहाणे त्यावर कर घेणार. हे पाणी देणार नाहीत, चांगले रस्ते देणार नाहीत, रस्त्यांवर रस्तेच नाहीत म्हणून दिवे देणार नाहीत, सक्षम सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था देणार नाहीत, माजलेल्या बिल्डर्सविरुद्ध कायदेशीर आणि चटकन संरक्षण देणार नाहीत, भ्रष्टाचारविरहीत शासन यंत्रणा देणार नाहीत, घरांची सुरक्षा देणार नाहीत आणि मोजून कर मात्र घेणार पगारदारांकडून!! अजब आहे सगळं! असो. मी निघालो. मला वाटलं खूप गर्दी असेल पण नव्हती. माझा पहिलाच प्रसंग मिळकत कर भरायचा! आतापर्यंत मिळकतच नव्हती तर काय कप्पाळ भरणार मिळकत कर! मनाचा हिय्या करून मी मनपा कार्यालयाच्या आवारात शिरलो. एक अनामिक हूरहूर लागून राहिली होती. लग्नाच्या आधी मुलींना भेटतांनादेखील वाटत नव्हती अशी भीती वाटत होती. सगळीकडे शासकीय कार्यालयाचा जणू शिक्का उठून दिसत होता. मी जरा घाबरतच एका कर्मचाऱ्याला मिळकत कर कुठे भरतात असे विचारले. तो कर्मचारी कुठल्या कर्मात गुंग होता हे त्याचं त्यालाच ठाऊक. पण त्याने साधे मान वर करून देखील पाहिले नाही. मी पुन्हा अजीजीने विचारले. साक्षात ऐश्वर्या रायला देखील मी माझ्याशी लग्न करशील का असे एवढ्या अजीजीने नसते विचारले. करशील तर कर नाहीतर उडत जा कुठल्यातरी फिल्म फेस्टिवलला असे ठणकावले असते आणि माझी झोपमोड झाली असती.  एवढेच नव्हे तर तुझे चित्रपट तसेही चालत नाहीत त्यामुळे आता डोक्यावर अक्षता पाडून घेऊन माझा संसार तरी नीट चालव असेही ऐटीत म्हटलो असतो. पण इथे गोष्ट जरा नाजूक होती. तो सरकारी कर्मचारी होता. त्याने क्रिकेटमध्ये अंपायर बोट वर दाखवून आऊट दर्शवितात तसे वर बोट केले आणि परत त्याच्या शासकीय कर्मात गुंतला. मी जरा गोंधळून त्याला पुन्हा विचारावे असे ठरवले पण उगीच त्याच्या कामात व्यत्यय नको म्हणून अंदाजाने वरच्या मजल्यावर गेलो.


सकाळचे ११ वाजत आले होते. मनपा कार्यालयात मात्र अजून पहाटच होत होती. २-३ जण नुकतेच स्थानापन्न झाल्याचे दिसत होते. फारच बुवा सिन्सिअर होते ते. "एवढं काय मेलं कामाचं कौतुक?" असं एखाद्या पोक्त मातृतुल्य स्त्री कर्मचारी म्हणल्यादेखील असतील त्यांना पाहून. मी अशाच एका कर्मचारीणी कडे जाऊन अतिनम्र आणि पुन्हा अजीजीच्या स्वरात म्हणालो


"मिळकत कर कुठे भरता येईल, मॅडम?"


त्यांना मॅडम म्हणणे बहुधा आवडले असावे. त्यांनी मला पटकन दाखवले. मी त्यांनी माझ्यावर अनंत उपकार केल्यासारखे त्यांचे आभार मानून तेथून निघालो. एक काळ्या-सावळ्या, विशालकाय बाई बसल्या होत्या त्या दिशेने मी निघालो. बाई नुकत्याच येऊन बसल्या होत्या. मी त्यांच्याकडे मिळकत कराचे देयक देत म्हणालो


"यातला मिळकत कर कमी करून घ्यायचा आहे, मॅडम. पाणीपट्टी कमी करून घ्यायची आहे. आमच्या भुसारी कॉलनीत पाणी येत नव्हते. करून देता, प्लीज?"


त्या बाईंनी एक नजर टाकली आणि घोगऱ्या आवाजात त्या म्हणाल्या "हिरवी पावती कुठाय?"


"कोणती हिरवी पावती, मॅडम?" मी मॅडम सोडणार नव्हतो.


"या देयका आधी एक हिरवी पावती मिळाली असन तुम्हाला, ती!"


"नाही हो, हा एकच कागद आहे माझ्याकडे याबाबतीतला."


"नाही नाही. असं कसं होईन? बरं पिवळी तरी हाय का?"


"पिवळी? नाही हो" माझा चेहरा बापुडवाणा झाला.


"मंग नाही कमी करता येनार टॅक्स! आमाला तुमच्या मागच्या वर्षीचे टॅक्स काय माहित? तुमच्या कडे हिरवी पावती पन नाय."


"पण मॅडम मला मिळाल्याच नाहीत हिरव्या निळ्या पावत्या!"


"असं कसं होईन?"


"अहो खरंच. ताबा घेतल्यापासून नाही मिळाल्या. हे एकमेव बिल आहे. आणि त्यात मागच्या थकबाकीचा उल्लेख आहेच की. त्यावरून काढा नं पाणीपट्टी!"


"नाही. तसं करता येनार नाही. बघा की तुमच्या घरी असतीन पावत्या. नंतर येऊन भरा टॅक्स!"


"अहो नाही हो मॅडम, पुन्हा वेळ नाही मिळणार आणि दंड पण आहेच की मुदतीनंतर. बिल्डर कडे असतील त्या पावत्या!"


"हो. दंड तर आहेच. मंग बिल्डरकडून आनून द्या पावत्या. "


"अहो, आता मला ताबा घेऊन एक वर्षाच्या वर होऊन गेलं. आता कुठे मी बिल्डरकडे जाऊ आणि पावत्या आणू. त्याच्याकडे देखील त्याने नीट थोडी ठेवल्या असतील. तुमच्या कडे रेकॉर्ड असतेच की. त्यात बघा नं प्लीज!"


"नाही. आमच्याकडे रेकार्ड नसते. कांपुटरमध्ये असते."


"मग तर अधिक सोपं. बघा की तेवढं प्लीज!"


"कांपुटरमध्ये पन पूर्न नसते."


"अहो मॅडम, प्लीज बघा ना. बिल्डरकडे त्या पावत्या मिळणार नाहीत हे तुम्हाला देखील ठाऊक आहे. मला पुन्हा वेळ नाही मिळणार हो टॅक्स भरायला. आज ही शनिवार म्हणजे तुम्ही १२.३० ला कार्यालय बंद करणार."


"मंग़ पूर्न भरून टाका टॅक्स. काय फक्त ५०० रुपयेच तर कमी होतील झाले तर."


"अहो असं कसं?"


मी विचारात पडलो. म्हटलं आता कसे करावे. बाईंच्या चेहऱ्यावरची रेषही हलत नव्हती. इतके कार्यतत्पर, हुशार आणि सौजन्यशील कर्मचारी मनपा नेमत असेल तर त्याला कोण काय करणार? मग मी शेवटचा प्रयत्न म्हणून दुसऱ्या एका कर्मचाऱ्याकडे विचारणा करण्यासाठी जाण्याचे ठरवले. त्यांना मी आधी १-२ वेळा भेटलो होतो आणि विशेष म्हणजे माझे वडील त्यांना बऱ्याचदा भेटले असल्याकारणाने माझ्याकडे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक होता. मी त्यांना फोन केला आणि ओळख पटविल्यावर अडचण सांगीतली. त्यांना विनंती केल्यावर ते (त्यांच्याच) जागेवर आले. त्यांनी लगेच एक भलं-मोठं बुक कढून पाणीपट्टी काढून दिली. जास्तीत जास्त १ मिनिट लागला. त्यांनी ओरडून बाईंना माझी पाणीपट्टी सांगीतली. अतिशय नाखुशीने बाईंनी माझ्याकडून देयक घेतले. १५०० रुपये वजा करतांना त्यांची जी दमछाक झाली ती मी कधीच विसरू शकणार नाही. म्हणजे अदनान सामीची २० किलोमीटरची शर्यत पळतांना होणार नाही एव्हढी दमछाक ती साधी वजाबाकी करतांना बाईंची झाली. शेवटी एकदाची वजाबाकी संपन्न झाल्यावर त्यांनी मला एका ठिकाणावरून विभाग प्रमुखाचा शिक्का आणि दुसऱ्या ठिकाणावरून सही आणायला सांगीतली. ती सही झाल्यावर माझ्याकडे हिरवी आणि पिवळी पावती नसल्या प्रित्यर्थ अजून एक सही आणायला सांगीतली आणि एवढे सोपस्कार करुन रंगवलेला कागद झेरॉक्स करून एक प्रत त्यांच्याकडे द्यायला सांगीतली. मी झेरॉक्स कशासाठी असे विचारल्यावर, आमच्या कडे रेकार्डला का असेच काहीतरी थातूर-मातूर उत्तर मिळाले.


मला त्या दुसऱ्या साहेबांची मदत मिळाली म्हणून बरे अन्यथा मला १५०० रुपयांवर पाणी सोडावे लागले असते. साधे एक पुस्तक काढून त्यातली पाणीपट्टी बघण्याचे कष्ट ही घ्यायला बाई तयार नव्हत्या. तरी बरे अजून कार्यालयात अजून झुंजूमुंजूच होत होते. संध्याकाळची वेळ असती तर कदाचित त्या लाटणं घेऊनच मागे लागल्या असत्या. पर्समध्ये ठेवत असतीलही एखादे लाटणे कदाचित!!


बाकी बरेच वृद्ध नागरीक त्रस्त झालेले दिसत होते. कुणाची काय काय कामे होती. मी पुन्हा आधीच्या साहेबांकडे गेलो आणि त्यांना सही मागीतली. ते म्हणाले की तुम्ही अगोदरच विभाग प्रमुखांची सही घेतलेली आहे. पण बाई ऐकायला तयार नव्हत्या. मग साहेब स्वतः बाईंकडे आले आणि विचारले. तेंव्हा बाईंनी मला पुढील कार्यवाहीसाठी मोकळे केले.


२ तास अथक झुंज देऊन मी यशस्वी झालो. असा जर आपला शासकीय कारभार असेल तर भारताविषयी अभिमान वाटावा असे अजून काय घडवू शकणार आहोत आपण भविष्यात?


--समीर