कठीण कठीण कठीण किती


      एक मुंबईकर सपत्नीक लखनौमधल्या एका सुप्रसिद्ध मिठाईच्या दुकानात गेले. त्या दुकानातली मिठाई त्यांना इतकी आवडली की त्यांनी गल्ल्यावर बसलेल्या दुकानाच्या मालकाला लगेच दाद दिली, "भाईसाहब, आपकी मिठाई बहुत सुंदर हैl"
      त्यावर मालकाने उत्तर दिले,"अगर मेरी मिठाई सुंदर है तो साहब, आपकी पत्नी बडी मिठी हैl"
      हिंदी पंधरवड्याच्या निमित्ताने चाललेल्या कार्यक्रमात हा विनोद ऐकला तेंव्हा माझ्या मनात विचार आला की अशी विशेषणांची गल्लत मी नेहमीच करते.मला पुरणपोळी सुंदर आणि मांजरीचे पिलू गोड वाटते. एखादी गोष्ट भयंकर आवडते तेंव्हा आवडणारी गोष्ट भयंकर कशी असेल हा विचारही माझ्या मनाला शिवत नाही. खरेच कुठलीही भाषा शुद्ध बोलणे किती कठीण असते.
      मुंबईसारख्या मोठ्या शहरांत कितीतरी भाषा सतत कानावर पडत असतात. त्यातल्या काही भाषा आपण बोलायचा प्रयत्न करतो. शेवटी आपली मातृभाषासुद्धा बिघडवून घेतो. हल्ली मराठी मालिकांतून 'माझी मदत करशील' अशी वाक्ये ऐकायला मिळतात. माझ्या मते मराठी मालिकांचे लेखक हिंदी मालिकांचेही लेखन करत असावेत. म्हणून 'मेरी मदद करोगे' सारखे 'माझी मदत करशील'.
      इंग्रजी शब्दांचा वापर न करता कुठलीही भाषा बोलणे महा कठीण. माझ्याकडे कामाला येणाऱ्या चौथी पास मुलीलाही ते शक्य नाही. हल्ली घरकामे करणे 'डेंजार' झाले आहे.त्यामुळे ती तिच्या 'येरा'च्या (एरिया) बाहेरची कामे धरत नाही. काम धरण्याआधी कामाची आणि 'मेन' म्हणजे आधीच्या बाईने काम का सोडले याची 'एंकूरी' करते.
      एका घरी काम करताना ती पडली आणि तिला दुखापत झाली म्हणून ती आठवडाभर कामाला आली नाही. जिच्या घरी ती पडली तिने खाड्याचा पगार कापला. त्याबद्दल तक्रार करताना ती म्हणाली," त्यांच्या लाद्या एकदम गुळगुळीत. मी सरकून पडले ही माझी 'मिष्टिक' आहे का? खरं म्हणजे मी त्यांच्याकडे पडले म्हणून त्यांनी मला 'सपोर्ट करायला पाहिजे. उलट माझा पगार 'कट' केला. हे तर 'चिट' आहे". 
      तिला बघायला आलेला मुलगा तिला मुळीच पसंत नव्हता. कारण तो बुटं घालायची सोडून शँडल घालून आला होता. शर्टसुद्धा 'विन' केला नव्हता. निदान मुलगी बघायला येताना त्याने 'झांटममेल'सारखे (जंटलमन) यायला हवे होते. "म्हणजे कसं?" या माझ्या प्रश्नावर तिने उत्तर दिले,"अपटूडेट" 
      आमच्या बँकेत एक निरक्षर बाई तिची एफ्. डी. मुदतीपूर्वी मोडायला आली तेंव्हा तिच्या आणि काउंटरवरच्या मुलीतला संवाद ऐका.
      'या कागदाचे पैसे हवे होते." 
      "अहो, ही रिसीट ड्यू व्हायला अजून एक वर्ष आहे"
      " जरा पैशांची गरज होती" 
      "ठीक आहे. दोन दिवसांनी या. कॅलक्युलेशन रेडी ठेवते. म्हणजे आलात की इमिजिएटली पैसे मिळतील. " 
     "आज नाही मिळणार? जरा आर्जंट होतं" 
      "घाईघाईत कॅलक्यूलेशन करून मिस्टेक झाली  मग? एक्सेस पेमेंट  झालं की पैसे रिकवर करायला डिफिकल्ट जातं. रूलप्रमाणे दहा दिवसांची नोटीस द्यायची असते. तरीपण तुम्हाला उद्या पैसे देते."
      " आज संध्याकाळला गावाला जायचं होतं."
      "एवढी अर्जंसी होती तर एलेवंथ आरला कशाला आलात?"
      " म्हंजे?" 
       " म्हणजे लास्ट मोमेंटपर्यंत थांबलात का?" 
       "हां, लास्सला म्हंजे मुलगा बीजी होता. माझ्याबरोबर यायला त्याला टैम नव्हता"   
       वास्तविक मी या प्रकाराला हसता नये. माझाही एकदा असाच मोरू झाला होता. एक जोडपे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवायला आले होते. सही करण्यापुरते साक्षर होते म्हणून मी त्यांना फॉर्म भरून देत होते. मी प्रश्न विचारत होते आणि नवरा उत्तरे देत होता. नाव? पत्ता? किती पैसे ठेवणार? किती वर्षांकरता ठेवणार? ऑपरेशन कसे? इतका वेळ बायको गप्प बसली होती. 'ऑपरेशन कसे 'हे ऐकल्यावर चित्कारली,"आप्रेशन? आप्रेशन बिप्रेशन नाही. लेकीच्या लग्नाकरता पैसे ठेवतोय."
      मी मान वर करून बघितले. ती बाई माझ्याकडे रागाने बघत होती. 'काय अभद्र बोलतेय ही बाई' असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता. मी वरमले. 'सेवरली' की 'जॉईंटली' हे मराठीत कसे विचारायचे ते पटकन सुचले नाही. मी विचारले," पैसे दोघांनाही द्यायचे की कुणालाही दिले तरी चालतील?"
      "अरे व्वा! आमचे पैसे कुणालाही कसे देणार? आम्हालाच मिळाले पाहिजेत." तिने ठणकावून सांगितले.
      मी म्हणाले," तुमचे पैसे तुम्हालाच मिळणार. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की मुदत झाल्यावर पैसे दोघांच्याही सहीने द्यायचे की एकाच्या सहीने चालतील."
       "एकाच्या सहीने चालतील." तिने उत्तर दिले. पण यांच्याकडे आपले पैसे सुरक्षित राहतील की नाही अशी शंका तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
        काही दिवसांपूर्वी मी पुस्तके खरेदी करायला गेले होते. दुकानात एक मराठी मुलगा इंजिनीअरिंगचे पुस्तक घ्यायला आला होता. तो इंग्रजी माध्यमातून शिकला असावा कारण तो दुकानदाराला विचारत होता," हे पुस्तक मी पुन्हा केलं तर मला किती पैसे मिळतील?" हा प्रश्न त्याने पुन्हा पुन्हा विचारल्यावर  दुकानदाराला अर्थबोध झाला. तो म्हणाला," एकदा विकत घेतलेले पुस्तक आम्ही परत घेत नाही." 
      माझा मुलगाही इंग्रजी माध्यमातून शिकला आहे. तो व्यवस्थित मराठी बोलतो. पु. लं. च्या, मराठी नाटकांच्या सी. डी‍.ज् बघून प्रसंगी मोठी मोठी वाक्ये फेकतो. मधून मधून म्हणीही वापरतो. फक्त त्याचा घोडा पेंड न खाताही पेंगतो. (शाळेत असताना तो म्हणाला होता,"इतर विषयात चांगले मार्क मिळून काय उपयोग. ड्रॉइंगमध्ये माझा घोडा पेंगतो ना.") 
      परवा मी त्याला विचारले,"काय रे तुझ्या त्या समीरचं लग्न झालं का रे?"
      " अग, त्याने धावून जाऊन लग्न केलं." 
      "अरे, धावून नाही पळून जाऊन" 
       " धावून आणि पळून मध्ये काही डिफरंस आहे का?" 
      यावर मी काय उत्तर देणार? 
      पण काही म्हणा मनोगतावर आल्यापासून माझे मराठी बरेच सुधारले आहे. आधी जे मला शुद्ध वाटत होतं- चुकले -जे शुद्ध वाटत होते ते कसे चूक आहे हे शुद्धलेखन आणि व्याकरणविषयक लेख वाचून कळले. सतत मराठी प्रतिशब्द वाचून बोलताना इंग्रजी शब्दांचा आधार घेण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. मराठी शुद्ध बोलणे वाटले होते तितके कठीण मुळीच नाही.
                                                                   वैशाली सामंत.
     

कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति

नवरात्रीच्या निमित्ताने जगद्गुरु शंकराचार्यांनी लिहिलेले हे सुप्रसिद्ध स्तोत्र व मला त्याचा समजलेला अर्थ देत आहे. भक्ती, श्रद्धा वगैरे बाजूला ठेऊन एक काव्य म्हणून पाहिले तरी त्यातील अनुप्रास, यमक, रूपक वगैरे अलंकार, छंदबद्ध तशीच भावोत्कट शब्दरचना मंत्रमुग्ध करणारी आहे असे मला वाटते. याचा आस्वाद द्यावा म्हणून मी हे मनोगतावर देत आहे. त्यात चुका झालेल्या असतील तर त्या सर्वस्वी माझ्या अज्ञानामुळे झाल्या आहेत.

परवलीचा शब्द

          मी जेंव्हा या साईट वर दाखल झाले, सर्वात पहिला शव्द मला आवडला तो म्हणजे, 'परवलीचा शब्द', म्हणजे 'पासवर्ड'. आजपर्य़ंत पासवर्ड या शब्दाचे मला कधी आकर्षण वाटले नाही पण 'परवलीचा शब्द' मला भावला. माझा आणि त्याचा स्नेह तसा जुना.६-७ वर्षांपूर्वी मी माझे पहिले खाते उघडले, याहू!! वर. तिथे लिहिलेला,वापरलेला पहिला परवलीचा शब्द. त्याकाळी( खूप जुनी गोष्ट सांगितल्या सारखे वाटते ना?), तर त्या काळी आम्ही अगदी प्रयोगशाळेत या टोकापासून त्या टोकापर्य़ंत ओरडायचो, 'अग या मशिनचा पासवर्ड काय आहे? '. कधी न सांगताच बदलायचोही, उगाच त्रास देण्यासाठी. :-) तेंव्हा त्याचं महत्त्व जाणवलंच नाही. तो खेळ खेळ नाही राहिला.दिवसेंदिवस या छोट्याशा शब्दाचे महत्त्व वाढतंच गेले. तुमचे बैंक खाते,वैयक्तिक पत्रव्यवहार खाते, कामाचे पत्र खाते, क्रेडिट कार्डाचे खाते,अगदी इथे लिहिण्यासाठीचे पण खाते. :-) अशी महत्त्वाची माहिती असलेली खाती फक्त या परवलीच्या किल्लीने उघडतात. जेवढ्या सुविधा तेवढी मोठी यादी.
         तर प्रत्येक नवीन खात्याबरोबर नवीन शब्दाचा शोध सुरू होतो.बरं सगळीकडेच एकच शब्द टाकावा तरी पंचाईत, आणि नाही टाकावा तर....??? डाबर च्यवनप्राश वापरा, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी. :-)) माझ्या कार्यालयात, ७-८ दिवसांच्या सुट्टीनंतर लोक परत आल्यानंतर प्रशासकाच्या कामाचा व्याप वाढलेला असतो. कारण बरेच जण आपला पासवर्ड विसरलेले असतात. आता तुम्ही म्हणाल असा कसा विसरतात? पुन्हा एकदा ....च्यवनप्राश हेच उत्तर. :-) तर, मग काही लोक नवीन शब्द टाकतात तर काहींना जुना शब्द सापडून जातो. आता नवीन शब्द सुचणे तरी सोपे काम आहे का? काही साधा-सुधा असून चालत नाही.किती तरी नियम. ५-८ अक्शरी असावा,नुसते 'अबकड' टाका आणि पाहा,तो संगणक नक्की रडेल. बरं त्याला हेही कळत की मागच्या वेळी तुम्ही हाच शब्द टाकला होता का.वैतागून कुणी जन्मतारीख टाकतो तर कुणी आपल्या प्रिय 'मैत्रिणीचे' उपनाम. ;-) कधी दुसऱ्या-समोर टाइप करायची वेळ आली की मग गाल कसे लाल होतात पाहिलंय? शेवटी कसाबसा हा पासवर्ड चालून जातो आणि आपल्या खात्याचे कुलूप उघडते.
         जरा कुठे हुश्श... होतंय तर संगणकाची सूचना येऊ लागते, थोड्या दिवसात आपला पासवर्ड मरणार आहे( एक्स्पायर होणार आहे) ,कृपया बदला.अहॊ माणसाच्या कल्पनाशक्तीला पण काही मर्यादा असतेच की !!पुन्हा एकदा माझी आणि शब्दांची मारामारी सुरू होते. कधी वाटतं सर्व एका ठिकाणी लिहून ठेवावेत. तसं करणं म्हणजे चोराच्या हातात तिजोरीची किल्ली देणं आहे. बरोबर ना? वेगवेगळ्या ठिकाणी लिहावेत तर धोतराला बांधलेल्या गाठीसारखे. कुठली गाठ कशासाठी बांधली हेच आठवणार नाही. मी अजून एक विसरलेच होते, कायदे, पासवर्ड वापरण्याचे.मोठे मोठे घोटाळे झाले आहेत या छोट्याशा शब्दाने. कितीतरी लोक आपल्या नोकरीस मुकले असतील या पासवर्डचा चुकीचा उपयोग केल्याने. एखादा तीळ ७ जणांत वाटता येईल पण पासवर्ड नाही. अजून काय सांगणार मी बापडी या शब्दाबद्दल.त्याची मूर्ती लहान पण कीर्ती महान. मीच त्याच्या जाळ्यामध्ये अडकलेली छोटीशी माशी. जेव्हढे लिहीन ते थोडेच.
          माझे हे पासवर्ड-पुराण मी इथेच थांबवते कारण तिकडे एक संगणक कुलूप लावून बसला आहे. त्याला उघडण्याचा प्रताप चालू आहे.आता तर असं वाटतंय की तो संगणक जोरजोरात हसतोय माझ्यावर. :-((... म्हणतोय, "आता सांग, काय करणार. नवीन शद्ब कसा शोधणार?"..... तसं माझं शब्दांशी काही वाकडं नाही हो, पण त्या संगणकाचे आहे ना. त्याला वाकडेच शब्द रुचतात. त्यामुळेच तर सुरू झाली माझी ही आजची कहाणी. :-)

व्यंजनसंधी

व्यंजनसंधी: 

व्यंजनसंधीचे काही नियम पुढीलप्रमाणे


पहिल्या पाच वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातले पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. 

पोटशब्द
एकत्र येणारी व्यंजने व संधी
जोडशब्द

विपद्+काल द्+क्=त्+क्=त्क् विपत्काल

वाग्+ पति
ग्+प्=क्+प्=क्प् वाक्पति

वाग्+ ताडन
ग्+त्=क+त्= क्त्
वाक्ताडन

षड्+ शास्त्र
ड्+श्=ट्+ श्=ट्श्
षट्शास्त्र

क्षुध्+ पिपासा ध्+प्=त्+प्=त्प् क्षुत्पिपासा

पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होतो.

पोटशब्द
एकत्र येणारी व्यंजने व संधी
जोडशब्द

वाक्+विहार
क्+व्=ग्+व्+ग्व्
वाग्विहार

षट्+ रिपू
ट्+र्=ड्+र्=ड्र
षड्रिपू

अप्+ज
प्+ज्=ब्+ज्= ब्ज
अब्ज

पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्यात वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो. 

पोटशब्द
एकत्र येणारी व्यंजने व संधी
जोडशब्द

वाक्+निश्चय
क्+न्=ड्.+न्
वाङ्निश्चय

षट्+मास
ट्+म्=ण्+म्
षण्मास

जगत्+नाथ
त्+न्=न्+न्
जगन्नाथ

त् या व्यंजनापुढे