काल सोळा सप्टेंबर, हुतात्मा महावीरसिंग यांची शतकोत्तर द्वितीय जयंती. त्या निमित्त हुतात्मा महावीरसिंग यांना विनम्र अभिवादन.
मोडेन पण वाकणार नाही या लेखात मी त्यांची अल्प अशी माहिती दिली होती. हुतात्मा महावीरसिंग यांनी १२ मे रोजी अंदमान येथे प्राणांतिक उपोषणास आरंभ केला. राजकीय बंदिवानांना मिळणारी चोर-दरोडेखोरांसारखी अपमानास्पद वर्तणूक, वाचायला वर्तमान पत्र न मिळणे, पत्रलेखनाची मुभा नाही, एकमेकांना भेटण्यास व बोलण्यास मनाई, अमानुष छळ, दिले जाणारे दुर्गंधीयुक्त व किडे पडलेले पाणी, अन्नात सापडणाऱ्या आळ्या, अतिशय लहान कोठडी, त्यात अंधार, भिंतींना व जमीनीला ओल, खाली शेवाळ, वर भयानक काम याचा निषेध करण्यासाठी महावीरसिंगांनी प्राणांतिक उपोषणाचा निर्धार जाहीर केला व अनेक क्रांतिकारकांनी त्यांच्यासमवेत उपोषणास प्रारंभ केला. १२ मे १९३३ रोजी उपोषण सुरू झाले. १७ मे रोजी जबरदस्तीने दूध पाजून महावीरसिंग यांचे उपोषण मोडण्याच्या प्रयत्नात तुरुंगाधिकारी असताना फुफ्फुसात दूध शिरून महावीरसिंग यांना हौतात्म्य प्राप्त झाले. पाठोपाठ २६ मे रोजी मोहन किशोर नमोदास व २८ मे रोजी मोहित मोइत्रा यांना याच प्रकारे हौतात्म्य लाभले.