बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले असे म्हटले आहे. ते सार्थ आहे. बोलबच्चन खूप असतात पण जे बोलतात ते करून दाखवणारे फार थोडे.
प्राणांतिक उपोषणाच्या बाता मारणारे भरपूर, पण तुम्ही जीव घेऊ शकता, जीवन देऊ शकत नाही हे इंग्रजांना दाखवून देण्यासाठी आपल्या ध्येयाप्रत उपोषणाने प्राण देणारे फक्त तीन महान हुतात्मे हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेत होऊन गेले जे इतिहासात अजरामर आहेत; हुतात्मा जतीन दास, हुतात्मा महावीरसिंग आणि हुतात्मा मणिंद्रनाथ बॅनर्जी. आज १३ सप्टेंबर, हुतात्मा जतीन दास यांची पुण्यतिथी.