सर्वसाधारणपणे शिक्षणाशी संबंधित अशा कुठल्याही विषयावर चर्चा होते त्यावेळी पाठांतर करून मिळवलेले यश हे विद्यार्थ्याच्या क्षमतेचे खरे निदर्शक नाही हा मुद्दा बऱ्याच वेळा मांडला जातो. त्यावरून पाठांतर वाईट अशी सोयीस्कर समजूत आळशी विद्यार्थी व त्यांचे पालक करून घेण्याची शक्यता आहे.
शिक्षणांत पाठांतराचे महत्त्व खूप आहे. त्याची घोकंपट्टी म्हणून हेटाळणी करणे बरोबर नाही. विषयाचे आकलन होणे महत्त्वाचे असले तरी अभ्यासक्रमांत असलेल्या गोष्टींचे संपूर्ण आकलन मुलांना त्या वयांत होऊ शकत नाही व त्यांचा व्यवहारांतील पडताळाही त्यांना घेता येत नाही. कारण त्या वयांत त्यासाठी लागणारी भोवतालच्या जगाची जाण मुलांना नसते व त्यांचा प्रत्यक्ष व्यवहाराशी संबंधही तितक्या प्रमाणांत येत नाही. पाठांतर (घोकंपट्टी) केल्यास पुस्तकांतील माहिती स्मृतींत यांत्रिकपणे साठवली जाते. नंतर जसजसा व्यवहारी जगाशी संपर्क वाढत जातो तसतशा (पाठांतर करून) स्मृतींत ठेवलेल्या गोष्टी उलगडू लागतात. अशा वेळी शिकलेल्या गोष्टींना व्यावहारिक पुष्टी मिळाल्याचा (डोक्यांत प्रकाश पडल्याचा) आनंद होतो व शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य होते. शिवाय सध्याच्या परीक्षापद्धतींत ज्यास्त मार्क मिळून चांगल्या संधि मिळणे हाही पाठांतराचा लगेच मिळणारा फायदा आहे.
शिवाय आज पाठांतराच्या जोरावर गुणवत्तेंत वरच्या क्रमांकावर असलेल्या मुलांनी (व कदाचित त्यांच्या पालकांनीही) कोणत्या मार्गाने यश मिळू शकते हे ओळखले आहे. त्यामागे प्राप्त परिस्थितींत यशाचा मार्ग शोधून त्याप्रमाणे प्रयत्न करण्याची प्रवृत्ति आहे. ही प्रवृत्ति त्यांना पुढील व्यावहारिक आयुष्यांतही उपयोगी पडणारी आहे.
मग पाठांतर त्याज्य समजावे का?