नुकताच, नवऱ्याच्या नोकरीबदलामुळे, गेली अकरा वर्षं वास्तव्य असलेलं गाव सोडून नवीन गावी स्थलांतराचा योग आला. स्थलांतर आपल्या सोबत शंभर गोष्टी घेऊन येतं. त्यांत प्रथम स्थानावर विराजमान अर्थातच सामानाची बांधाबांध. सामानाची बांधाबांध आपल्या सोबत अजून डझनभर गोष्टी घेऊन येतं आणि त्यातली सर्वात अपरिहार्य कुठली असेल तर ती नवरा-बायकोची वादावादी! कुठल्या वस्तू फेकायच्या, कुठल्या ठेवायच्या, "कशाला इतका पसारा जमवून ठेवलाय", "वेळच्यावेळी आवरायला काय होतं", "मला काय तेवढं एकच काम असतं का घरात"... या प्रत्येक शीर्षकाखाली तात्विक मतभेदांवर(! ) आधारित अजून ढीगभर संवाद!