पूर्वीच्या काळातल्या कुटुंबप्रमुखांचा दरारा एकाद्या सर्वसत्ताधीशासारखा असायचा. त्यांना विरोध करण्याची तर कोणाची प्राज्ञा नसायचीच, पण एरवीसुद्धा घरातले लोक त्यांच्यासमोर थोडे धांकातच उभे राहत असत. त्यात दिवाळीतला पाडवा हा खास कुटुंबप्रमुखांचा दिवस असे. मात्र त्यांचे प्रेमळ कुटुंबवत्सल रूप त्या दिवशी सर्वांना जवळून पहायला मिळत असे. त्या दिवशी ओवाळणीचा मोठा समारंभ होत असे. अग्रपूजेचा मान माझ्या वडिलांचा असे.