काही दिवसापूर्वी श्री. शा. हणमंते यांचा संख्या संकेत कोश वाचायला मिळाला. या कोशात शून्यापासून एकशे आठपर्यंत ज्या संख्यांचे संकेत ग्रंथांतून किंवा संभाषणातून उल्लेखले जातात त्यांचा संग्रह केला आहे.पंचप्राण कोणते? सप्तधातू कोणते? नाटकाची सहा अंगे कोणती? छत्तीस यक्षिणी कोणत्या? काळ्या बाजाराचे चाळीस प्रकार कोणते?छप्पन्न भाषा, बाहत्तर रोग, ब्याण्णव मूलतत्त्वे, शहाण्णव क्षत्रियांची कुळे, शंभर कौरव या तऱ्हेची विविध विषयांतील माहिती या कोशात वाचायला मिळते. कोशकर्त्यांनी साडेतीनशेच्यावर विविध विषयांवरील ग्रंथांचे संदर्भ घेऊन पाच हजारांच्यावर संकेतांची माहिती एकत्रित केली आहे. वेद, उपनिषदे, धर्मशास्त्र, भक्तिशास्त्र, पुराणे, योगशास्त्र, वैद्यकशास्त्र, विविध कोश अशा असंख्य ग्रंथांचा अभ्यास करून हा कोश बनवला आहे. विषयांच्या वैविध्यामुळे हा कोश केवळ रोचकच नाही तर बहुश्रुतता वाढवणाराही आहे. यातील मला आवडलेले काही संकेत इथे देत आहे.
शून्यकर्ण/शून्यचरण--कर्ण/चरणविहीन (साप व तत्सम ) प्राणी
शून्यमस्तक--ज्याचे तीन किंवा चारी पाय पांढऱ्या रंगाचे असून डोक्यावर वा कानाजवळ भोवरा वगैरे कोणतेही चिन्ह नसते असा घोडा
शून्यवेला--मध्यान्ह, मध्यरात्र, संध्याकाळ. या वेळी केलेली कृत्ये निष्फळ ठरतात असे मानतात.