मे १२ २००९

२. निराकाराला जाणण्यात एकमेव अडथळा : व्यक्तिमत्त्व

ह्यासोबत

आधी निराकार ही कल्पना समजून घेऊ. समजा तुम्ही एका उंच टेकडी वरील विस्तीर्ण पठारावर एकटेच आहात, तुम्ही आणि आकाश या मध्ये कोणीही नाही. तुमच्या चहूबाजूला आकाशा शिवाय काही नाही. तुम्ही आकाशाकडे पाहत राहिलात तर तुमच्या लक्ष्यात येईल की आकाश असे काही नाही, एक अनंत पोकळी सर्व काही व्यापून आहे. ती पोकळी केवळ वरच नाही तर पृथ्वीच्या खाली सुद्धा आहे. ही पोकळी अंतहीन आहे तुम्ही कितीही खोल, कितीही वर किंवा कोणत्याही दिशेला गेलात तरी तुम्हाला शेवट मिळणार नाही. मग तुम्हाला हे देखील जाणवेल की ही पोकळी केवळ दूरवर नाही तर आता आणि इथे तुमच्या शरीरातून आरपार गेली आहे. तुम्ही आणखी शांत झालात की तुम्हाला कळेल आणि जाणवेल की तुमच्या दोन विचारांमध्ये सुद्धा ती पोकळी आहेच. ही शांत आणि रम्य पोकळी सर्व अस्तित्व व्यापून आहे. दखल घेत नव्हतो म्हणून लक्ष्यात येत नव्हती इतकेच. ही सर्वव्यापी पोकळी म्हणजेच निराकार. ती इतकी डोळ्यासमोर आहे की बुद्धाला जेव्हा तिचा उलगडा झाला तेव्हा त्याला मनापासून हसू आलं तो म्हणाला डोळ्यासमोर असलेली आणि इतकी प्रकट गोष्ट मी किती वर्ष शोधत होतो, मी इतक्या सोप्या गोष्टीसाठी कायकाय प्रयास केले. बुद्ध या पोकळीला शून्य म्हणतो.

जसे चित्र कॅन्व्हासवर प्रकटते, तो कॅन्व्हास असल्या शिवाय कोणतेही चित्र निर्माण होऊ शकत नाही आणि आकारा मागे जरी झाकला गेला तरी तो कॅन्व्हास सारे चित्र व्यापून असतो तशी ही पोकळी किंवा हा निराकार सारे अस्तित्व व्यापून आहे. अस्तित्व या दोनच घटकांचे बनले आहे, एक निराकार आणि दुसरे त्यात प्रकट झालेले सगळे आकार. हा निराकार सगळ्या व्यक्त जगाचा मूळ आधार आहे, तो सगळ्या निर्मितीचा स्रोत आहे. सगळे सूर्य, तारे, ग्रह, ही पृथ्वी, सगळी जीवसृष्टी या निराकारात प्रकट झाले आहेत. ह्या निराकारात स्वतःला जाणण्याची क्षमता आहे तो निर्जीव नाही. तो एका सार्वभौम उपस्थिती सारखा सदैव हजर आहे त्यामुळे कृष्णानी त्याला साक्षी म्हटलं आहे. ज्ञानी त्याला आत्मा म्हणतात आणि प्रत्येक आकाराच्या आत, बाहेर, तोच निराकार असल्यामुळे तो प्रत्येक आकाराचे मूळ स्वरूप आहे. आकार निर्माण होतील आणि विलीन होतील पण निराकार जसाच्या तसा राहील. आकार निर्मिती ही निराकाराची संभावना (पोटेंशियालिटी) आहे, पण आकार नसला तरी निराकार असणारच. निराकाराचा बोध होणे आणि आपण मुळात निराकारच आहोत ही वस्तुस्थिती होणे एकच आहे कारण निराकारात अंतर नाही. निराकाराचा बोध होणे आणि आपण निराकार आहोत हे कळणे एकच आहे. या बोधाला कृष्णमूर्ती 'द नोअर बिकम्स द नोन' म्हणतात आणि ओशो त्याही पुढे जाऊन 'अँड देअर ईज नो वन' असं म्हणतात कारण निराकार म्हणजे वस्तुतः कोणीही नाही. संपूर्ण शांतता! म्हणून बुद्ध सत्याला शून्य म्हणतो. निसर्गदत्त महाराज या सृष्टीला पोकळ देखावा म्हणतात कारण कुणाच्याही आत कुणीही नाही.

खरं तर निराकार इतका डोळ्यासमोर आणि प्रकट आहे की त्याचा बोध तुम्ही वर लिहिलेलं नुसतं मन लावून आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता वाचलं की तुम्हाला होईल. पण आपण मुळात निराकारच आहोत हे तुम्हाला मान्य होणार नाही आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे प्रत्येकाने आपण स्वतः कोण आहोत याची करून घेतलेली कल्पना किंवा व्यक्तिमत्त्व. ओशो अष्टावक्र गीतेत म्हणतात : 'तुम्हारी कल्पना ही तुम्हारा कारागृह बन गयी है!'

आता इथे मुक्ती म्हणजे काय ते समजावून घेणे उपयोगी होईल. निराकार अनिर्बधं आहे, संपूर्ण मोकळीक आहे, कोणताही आकार निराकाराला बांधू शकत नाही;  आपण निराकार आहोत हा बोध तुम्हालाही आपण कधीही आणि कोणत्याही बंधनात नव्हतो याची तत्क्षणी अनुभूती देतो. त्यामुळे सत्याच्या बोधाला मुक्ती असं म्हटलं आहे. आता तुम्हाला ओशोंच्या वाक्याचा अर्थ लक्ष्यात येईल. हे कारागृह काल्पनिक आहे, तुमच्या गैरसमजा शिवाय कोणतेही बंधन नाही.

माणूस म्हणून जन्माला येणे हा मुक्तीचा एकमेव मार्ग आहे कारण केवळ माणसाला त्याच्या जाणीवेच्या प्रगल्भतेने निराकाराचा बोध होऊ शकतो. पण माणूस म्हणून जन्माला येणे आणि व्यक्तिमत्त्वाच्या बंधनात अडकणे हे अनिवार्य आहे, ते कुणालाही चुकले नाही. म्हणून आता व्यक्तिमत्त्व कसे तयार होते ते पाहू.

मूल जन्माला आल्यावर आकार (देह) आणि निराकार (शून्य) यात अंतर नसते. चित्र आणि कॅन्व्हास एकच असतात. मुलाची जाणीव त्याच्या नकळत आत्ममग्न असते. मुलाच्या जाणीवेत त्याच्या शिवाय दुसरे कोणीही नसते. म्हणजेच जाणीव मोकळ्या आकाशा सारखी असते. निराकाराला आपण निराकार आहोत हा बोध नसतो. ज्या क्षणी मुलाचे आप्त त्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात त्या क्षणी  ही एकसंध जाणीव उन्मुख (ओरियंट) होते, एकसंध आकाशाला दिशा येते आणि जाणलेले आणि जाणणारा हे द्वैत तयार होते. ज्यावेळी त्या मुलाला नावाने हाक मारली जाऊ लागते, समजा 'संजय, संजय' तेव्हा कुठेही आणि कोणीही नसलेला  काल्पनिक संजय केवळ हाके मुळे तयार होतो.  मुलाची ओरियंट झालेली जाणीव हळूहळू संजय अशी हाक मारली की हाक मारणाऱ्याकडे बघू लागते आणि इथून व्यक्तिमत्त्व तयार होऊ लागते. हा संजय दोन्ही बाजूनी तयार होऊ लागतो; सगळे त्याला संजय समजू लागतात आणि तो ही स्वतःला संजय समजू लागतो. पुढे 'संजय इकडे ये' आशी हाक मारल्यावर देह इकडून तिकडे जातो पण अचल निराकाराला आपणच चालतो आहोत असे वाटायला लागते. नाती-गोती निर्माण झाली की हा गोंधळ पुढे पुढे भावनिक स्तरावर जाऊन पोहोचतो. त्यातून यथावकाश मुलाचे लग्न वगैरे झाले की मग हे प्रकरण फारच गंभीर स्वरूप धारण करते.

तत्पूर्वी मुलाच्या शाळेत जाण्याने त्याचे दोन सखोल गैरसमज होतात पाहिला स्वतःच्या रूपाविषयी आणि दुसरा स्वतःच्या बुद्धिमत्ते विषयी. स्वतःला देह समजल्यामुळे आपल्या दिसण्या विषयी प्रत्येकाचा गैरसमज असतोच असतो आणि बुद्धीचा तर शेवट पर्यंत साथ सोडत नाही. दोनच प्रकारचे गैरसमज मूल करून घेते : एक मी सुंदर आहे किंवा सुमार आहे आणि दोन : मी बुद्धिमान आहे किंवा माझ्याकडे  हवी तशी बुद्धिमत्ता नाही. पुढे मूल स्वतःच्या पायावर उभे राहून कमावायला लागले की एक सार्वजनिक आणि सर्वमान्य गैरसमज त्याचा श्वास घुसमटवतो आणि तो म्हणजे मी श्रीमंत आहे किंवा गरीब. अश्या त्रिपैलू (रूप, बुद्धी आणि संपती) गैरसमजाचे ओझे व्यक्तिमत्त्व निर्माण करते. त्यामुळे कोणीही काहीही म्हणो एक न्यूनगंड मनात कायमचा घर करून बसतो. हा न्यूनगंड हेच अस्वास्थ्याचे मूळ कारण आहे. जो लौकिक दृष्ट्या यशस्वी होतो तो वरून कितीही स्वस्थ दिसला तरी निराकाराशी संपर्क तुटल्यामुळे अस्वस्थच असतो आणि अयशस्वी माणसाला तर अस्वस्थतेनी हे जीवनच नकोसे होते. सगळी मनुष्यता या दोनच विभागात विभागलेली आहेः एक यशस्वी आणि अस्वस्थ आणि दोन : अयशस्वी आणि अस्वस्थ. पण साऱ्या अस्वस्थतेचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे तुम्ही स्वतः विषयी करून घेतलेली कल्पना, तुम्ही निर्माण केलेले आणि समाजानी तुम्हाला दिलेले व्यक्तिमत्त्व. पण मजा अशी आहे की कोणत्याही गैरसमजाचा तुमच्या मूळ स्वरूपावर काहीही परिणाम होत नाही, तुम्ही मूळ आहात तसेच म्हणजे शांत, व्यापक, अनिर्बंध राहता पण जगण्यातली मजा निघून जाते, आपण निराकार आहोत हे विसरल्यामुळे ऐक अनामिक अस्वस्थता कायमची सतावत रहाते. अध्यात्म म्हणजे या शांत आणि स्वस्थ निरकाराचा बोध घेऊन आकारात जगणे, मग जीवनात एक निश्चींतता येते कारण काळजी करणाराच कोणी राहत नाही. 

Post to Feedकाही नाही :)
छान समजावलेत
सौरभ हा सगळा माझा अनुभव आहे
छान

Typing help hide