मे २१ २००९

८. भावनेचा गोंधळ आणि पैशाची मजा

ह्यासोबत

सध्याचे धावपळीचे जीवन हे जरी सर्वदूर पसरलेल्या हृदय अस्वास्थ्याचे मूळ कारण समजले जात असले तरी खरे कारण बेसावधपणे होणारी विचारांची निर्मिती आणि त्यांचे हृदयाला भिडणे हे आहे. हल्ली प्रत्येकाला काही तरी उत्तेजक झाल्या शिवाय जीवनात मजा येते असे वाटतच नाही. माझ्या बोलण्यात जराही अतिशयोक्ती नाही. अठरा मे ला काँग्रेसला बहुमत मिळाल्याचे कळल्यावर शेअर बाजाराचं मूल्य एकदम सहा लाख पन्नास हजार कोटीनं वर गेलं (म्हणजे सहाशे पन्नास वर बारा शून्ये! ). किती लोकांचे किती पैसे शेअर या निव्वळ कल्पनेवर लागले आहेत?  खेळ ही निव्वळ कल्पना आहे पण किती कोटी लोकांचे हृदय ट्वेंटी-ट्वेंटीच्या जवळजवळ प्रत्येक बॉलला खालीवर होते? मजा म्हणजे हृदय खालीवर व्हावे म्हणून तर मॅच बघायची! सगळं सरळ आणि सहज झालं तर ती मॅच अजिबात इंटरेस्टींग वाटत नाही. आपली मानसिकता काय दाखवते? हृदय जे केवळ भयाने सक्रिय व्हावे अशी निसर्गाची योजना आहे ते आपल्याला सदैव खालीवर झाल्याशिवाय मजाच येत नाही. माझा एक मित्र मला म्हणाला लोक तुझ्या निराकाराच्या मागे का लागत नाहीत? मी म्हणालो निराकार म्हणजे शांतता, लोकांना शांतता हवी कुठे आहे? शांत आणि मजेत जगणं बेचव वाटतं. हे खरं तर सत्यं शोधणं अवघड वाटण्याचं कारण आहे. लोकांना उत्तेजना (एक्साइटमेंट) म्हणजे आनंद असे वाटते आणि हल्ली अश्या उत्तेजकांचे हरप्रकारे सादरीकरण होते, केव्हाही टिव्ही लावा एकदम भावनेला हात घालणाऱ्या सिरीअल्स किंवा मसालेदार बातम्या (निवेदकांचे आता काय अघटित घडतंय बघाच! अशी उत्सुकता लावणारे आवाज आणि त्याचा सुरेख परिणाम साधावा असे बॅक्ग्राउंड म्युझिक). आता गाण्यासारखी रम्य गोष्ट पण तिथे सुद्धा शेवटी एलिमिनेशनचा थरार हवा नाहीतर पुढचा कार्यक्रम कोण बघणार? आणि टिआरपी कसा वाढणार?

जोडले जाणे हे निराकाराच्या विस्मरणाचे मूळ कारण आहे. विचार ही सुरुवात आहे आणि भावना हे त्याचे सघनी करण आहे. तुम्हाला वावगे वाटेल पण नाती ही माणसाची कल्पना आहे आणि पैसा ही तर निव्वळ विनिमय सोयीचा व्हावा म्हणून माणसाने शोधलेली युक्ती आहे पण ह्या दोन कल्पनांचे विचारांना भावनेत रूपांतरित करण्याचे सामर्थ्य किती महान आहे?

 आपण प्रथम नाते ही कल्पना बघू. मुळात विवाह हीच कल्पना आहे (मी सोय, उपयोग, आणि त्याची अनिवार्यता नाकारत नाही) पण ती दोघांनी आणि समजानं मान्य केलेली कल्पना आहे. समाज व्यवस्था टिकावी म्हणून ती कल्पना अनिवार्य देखील आहे पण शेवटी ती कल्पना आहे हे तुम्हीही मान्य कराल. विवाह हीच जर कल्पना आहे तर तिथून आणि त्यातून पुढे निर्माण होणारी सारी नाती कल्पनाच नाहीत का? एकहार्ट म्हणतो 'सी द फंक्शन अँड नॉट द रिलेशन'. कोणत्याही प्रसंगात काय करायचं आहे ते बघा नातं मधे आणू नका. एका क्षणात तुम्ही भावनेच्या सगळ्या गोंधळातून मुक्त होता आणि तरीही प्रसंग अत्यंत समर्थपणे हाताळू शकता. हा भावनेच्या कल्लोळा पासून सुटकेचा एकमेव उपाय आहे. विवाह ही कल्पना आहे ही एक समज विवाहितांना आली तर किती तरी सेपरेशन्स आणि जीवनातले वाद टळू शकतील आणि तरीही समाज व्यवस्था अबाधित राहील.

निराकाराचा बोध म्हणजे सर्व कल्पनांचे निराकरण कारण सगळ्या कल्पना मानसिक आहेत आणि  तुमचे व्यक्तिमत्त्व हा सगळ्याचा कल्पना आणि भावनांचा परिपाक आहे.

आता देश ही सुद्धा कल्पना आहे, पृथ्वीवर कोणतीही सीमारेषा नाही, पण माणसाने या एका कल्पनेवर अगदी महाभारता पासून आज पर्यंत जवळजवळ पाच हजार युद्धे खेळली गेली आहेत! महाभारतातून काय मिळवले तर गीता! आणि त्या किमतीला तिचा काय मोठा उपयोग झाला? कारणे काहीही असोत शांतता निर्माण होईल ही शक्यता आजही शून्य आहे! आणि युद्धाचे कारण काय तर देश ही कल्पना. एक मुत्सद्दी कारगील युद्धावरच्या चर्चेत म्हणाला होता की प्रश्न कोणताही असो, रणांगणावर काहीही झाले तरी टेबलावर बसल्या शिवाय तो सुटत नाही हे माणसाला  कधी कळणार? असा कल्पनांनी भ्रमित झालेला माणूस शांततेचा शोध कसा घेईल? त्याला डोळ्या समोरचे निराकार कसे दिसेल कारण ते दिसायला चित्त शांत हवे ते अश्या कल्पनेच्या गदारोळात कसे स्थिर राहणार?

आता पैसा ही कल्पना किती जीवन व्यापून आहे आणि किती मानवी कलहांचे कारण आहे हे सर्वज्ञात आहे. असे म्हणतात की पोलीस कुठल्याही गुन्ह्याचा तपास करताना फक्त दोनच शक्यतांवर तपासाची सगळी दिशा ठरवतात, एक : पैसा आणि दुसरे स्त्री! याच अर्थाचे वाक्य कुणीसे म्हटले आहे की पैसा मिळणार नाही असे कळले तर लोक सकाळी बिछान्यातून उठणार देखील नाहीत. आणि लोकांना पैसा ही कल्पना नसून वास्तविकता आहे असे इतके प्रकर्षाने वाटते की पैसा आणि श्वासाची लय याचा फार निकटचा संबंध निर्माण झाला आहे. पैसा हीच जीवनाची सर्वमान्य दिशा असल्यामुळे श्वासाची लय बिघडली तरी हरकत नाही पण पैसा सोडायचा नाही ही मानसिकता झाली आहे. त्यामुळे पैसा ही नुसती कल्पना न राहता तो भावनिक विषय झाला आहे. आता हृदय हालणार नाही तर काय? मुळात जीवनाची धावपळ नाही तर पैशाची ओढ हे हृदयाच्या अस्वस्थतेचं कारण आहे. अशात स्व-विस्मरण होणं किती स्वाभाविक आहे हे तुमच्या लक्ष्यात आलं असेल. 

नात्यातील भावनेच्या निराकरणाचा सोपा मार्ग जसा 'सी द फंक्शन अँड नॉट द रिलेशन' हा आहे तसा पैशाच्या बाबतीत 'फील द ब्रेथ अँड नॉट द इश्यू' हा आहे. म्हणजे कोणताही आर्थिक प्रसंग असो फक्त श्वासाची लय सांभाळा तुम्ही तो प्रसंग सहजतेनं हाताळू शकाल. याचं कारण असं आहे की माणसाचा मूळ गैरसमज 'पैसा आहे म्हणून श्वास चालू आहे' हा आहे आणि वास्तविकता अशी आहे की 'श्वास चालू आहे म्हणून पैशाला अर्थ आहे'. आपण पैशालाच 'अर्थ' म्हणून मोकळे झालोत, श्वास महत्त्वाचा होता हे बहुदा शेवटच्या श्वासालाच कळत असावं. आता तुम्हाला बुद्धाच्या विपश्यनेचं महत्त्व कळेल.

हा लेख मी एक सुंदर कथा सांगून संपवतो. एक झेन साधक आपल्या मास्टरला विचारतो 'सिद्ध पुरुषाच फक्त एक लक्षण तुम्ही सांगू शकाल काय? त्यावर हसून तो मास्टर म्हणतो 'चेहऱ्यावर मंद स्मित आणि लयबद्ध चाललेला श्वास!'   

Post to Feed
Typing help hide