मे २५ २००९

१०. काही आध्यात्मिक प्रश्नोत्तरे

ह्यासोबत

माझ्या आध्यात्मिक वाटचालीत अनेक मित्रांशी अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या त्यातून मला मानवी विचारांची आणि गैरसमजांची दिशा कळत गेली. सर्वांना उपयोगी होतील म्हणून ती प्रश्नोत्तरे :

प्रश्न : तुम्ही स्वतःला सत्य समजले आहे हे कशावरून म्हणता?

उत्तर : मी म्हणतो म्हणून!

प्रश्न : ओशो स्वतः सत्य समजल्यावर वीस वर्षे थांबले  होते (१९५३-१९७३). ते म्हणाले मी लोकांना त्याची जाणीव व्हायची वाट बघत होतो.

उत्तर : ओशोंनी नंतर म्हटले की 'मै अंधोंकी दुनियामे चष्मे बेच राहा हूं'. तुम्हाला निराकार समजला की नाही हे तुमच्या शिवाय कोण जाहीर करणार?

प्रश्न :  तुम्हाला निराकार समजायला सगळ्यात उपयोगी पडलेली गोष्ट कुठली ?

उत्तर : स्वतः वरील प्रेम!

प्रश्न : आम्हाला निराकार का समजत नाही?

उत्तर : तुम्ही स्वतःला व्यक्ती मानता म्हणून.

प्रश्न : आम्ही स्वतःला निराकार मानून ते समजेल का?

उत्तर : ते मानायला कशाला हवे? तुम्ही मुळात निराकार आहातच.

प्रश्न : तुम्ही हे इतके धाडसाने कसे म्हणू शकता?

उत्तर :  जी वस्तुस्थिती आहे त्यात कसले आले धाडस?

प्रश्न : सत्य शोधणे इतके अवघड का मानले गेले आहे?

उत्तर : तुम्ही स्वतःला शोधायला निघालात तर ते अवघड होणार नाही का? तुम्ही आता या क्षणी इथे नाही का? त्यात शोधण्या सारखे काय आहे?

प्रश्न :  आपण मुळात  निराकार आहोत हे समजल्यावर तुम्हाला नक्की काय फरक पडला?

उत्तर : माझ्या दृष्टीने भविष्यकाळ व्यर्थ झाला त्यामुळे काळजी संपली. भूतकाळ हा ज्याला दुःख प्रिय आहे किंवा वर्तमानात जगण्या सारखे काही दिसत नाही त्यालाच उपयोगी असतो, मला असा प्रश्न केव्हाच नव्हता.

प्रश्न : साधना काय असावी?

उत्तर : तुम्ही काहीही केले तरी तुमचे सर्व निर्णय तुम्ही तुमच्या बुद्धीच्या वकूबा प्रमाणे घेणार. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला समज येत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही मार्ग निवडला तरी तो चुकीचाच असणार. 'सत्य डोळ्या समोर आहे आणि मुळात आपण स्वतः च सत्य आहोत हे कळण्यासाठी मी काय साधना करावी?' असे वेळ मिळेल तेव्हा स्वतःला विचारत राहा, एका क्षणी तुम्हाला मी काय म्हणतो ते अक्षरशः  डोळ्यासमोर दिसेल. 

प्रश्न :  तुम्हाला काय काय अध्यात्मात्मिक अनुभव आले?

उत्तर :  शून्य! आध्यात्मिक अनुभवाची आशाच तर सत्य जाणू देत नाही. अमक्याला प्रकाश दिसला, तमक्याला स्वर्गीय संगीत ऐकू येते, शरीरातून अजून सुगंध येत नाही अश्या एक ना अनेक अनुभवांची अशी काही आध्यात्मिक जगात चर्चा आहे की तुम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे असे वाटते. वास्तविकात सत्य ही स्थिती आहे अनुभव नाही. फक्त एका क्षणात तुम्हाला निराकार जाणवतो आणि मग लक्ष्यात येते की आपण दखल घेत नव्हतो म्हणून नाही तर निराकार सर्वत्र आणि सदैव अवतीभवती होता, मग हे पण लक्ष्यात येते की तो आणि आपण काही वेगळे नाही.  

प्रश्न : तुम्हाला राग येतो का?

उत्तर : हो!

प्रश्न : मग तुमच्यात आणि सत्य न कळलेल्यात फरक काय?

उत्तर : मला राग येतो आहे हे राग येण्यापूर्वी कळते आणि मी न रागावण्याचा निर्णय घेऊ शकतो.

प्रश्न : षड्रिपूंवर विजय मिळवण्या बद्दल तुमचे काय मत आहे?

उत्तर : जर तुम्हाला न रागावण्याचा विकल्प उपलब्द्ध असेल तर तुम्ही तुम्हाला काय वाटते ते प्रभावी पणे मांडू शकता. लोभ, मोह, मद, मत्सर हे स्व न गवसल्यामुळे वाटणाऱ्या न्यूनतेचे परिणाम आहेत. प्रणय ही निसर्गाने स्वतःच्या निर्मिती साठी केलेली अंगभूत योजना आहे त्यामुळे प्रत्येक सक्षम शरीरात ती असणारच. मला यात विजय मिळवणे वगैरे काही दिसत नाही.

प्रश्न : तुम्हाला निराकाराचा शोध घ्यावा असे का वाटले?

उत्तर : जीवनात थोडेसे स्थैर्य आले आणि जराशी कल्पनाशक्ती असेल तर तुमच्या लक्ष्यात येईल की इथून पुढे सगळी पुनरावृत्ती आहे आणि पुढे हे सगळे असहाय होत संपणार आहे. मी असे ऐकले होते की व्यक्ती पुन्हापुन्हा जन्म घेत राहते, मी अतिशय आळशी आहे त्यामुळे परत हे सगळे उभे करायचे म्हणजे फार प्रयास होईल हा विचार मला स्वस्थ बसू देईना. मला वाटायला लागले की आता लवकरात लवकर उत्तर शोधणे गरजेचे आहे, अध्यात्म हे उत्तर असावे म्हणून मी शोध सुरू केला.

प्रश्न : निराकार शोधून काय उत्तर मिळाले?

उत्तर : पुनर्जन्म म्हणजे काय मजा आहे ती कळली! कोणत्याही क्षणी निर्णय घेताना तुमचा विचार पुढे असतो आणि त्याप्रमाणे तुम्ही कृती करता, विचार तुमच्या जीवनाचे सारथ्य करतो! मृत्यू ही सुद्धा अशीच क्षणिक घटना आहे, तुम्ही शेवटच्या विचाराला बेसावधपणे  शक्ती देता मग तो विचार परत आकार घेतो, तुम्हाला परत आपण शरीरात आलो असे वाटू लागते. निराकार गवसल्यामुळे आपण शरीर आणि विचार या पेक्षा वेगळे आहोत हे कळले, त्यामुळे विचाराच्या मागे जाणे किंवा न जाणे हा विकल्प उपलब्द्ध झाला!    

प्रश्न : सत्याच्या शोधात तुम्हाला रोजच्या जगण्यात काय बदल घडवावा लागला?

उत्तर : मी मला जे जड वाटत होते ते बिनदिक्कत पणे सोडून देत गेलो!

प्रश्न : हे जीवन आपोआप चालले आहे की या मागे कोणी आहे?

उत्तर : आपोआप चालले आहे.

प्रश्न : कशावरून?

उत्तर : सगळ्या जीवनाचा आधार तुमचा आता चालू असलेला श्वास आणि हृदयाचे धडकणे आहे आणि ते आपोआप आहे.

प्रश्न : मग आम्हाला तसे का वाटत नाही?

उत्तर : माणसाचे मूल हा जगात सर्वात दिर्घकाळ घेऊन स्वयंपूर्ण होणारा सजीव आहे. त्याचा जन्म कुटुंबातच होणे गरजेचे समजले गेले आहे.  एकदा कुटुंब आले की समाज अनिवार्यपणे आला मग त्याबरोबर मन, भावना आणि व्यक्तिमत्व आले. मग समाजाचेच मार्ग आणि दृष्टीकोन आला, म्हणजे पैसा आहे म्हणून श्वास चालू आहे हा मूलभूत गैरसमज खूप खोलवर गेला. आता तुम्हाला कोणीही काहीही म्हटले तरी आपण हातपाय मारल्या शिवाय जगणे अशक्य ही ठाम समजूत झाली. मग श्वास आणि हृदय फक्त कवितेत, त्याचा रोजच्या जीवनाशी काहीही संबंध राहत नाही, आता तुम्हाला आपोआप चालू आहे हे श्वासाकडे लक्ष्य गेल्या शिवाय कसे कळणार? बरं गेलं तरी इतक्या विवंचना आहेत की ते तिथे सगळा उलगडा होई पर्यंत कसे राहणार म्हणून तुम्हाला तसे वाटत नाही.

प्रश्न : नियती काय आहे?

उत्तर : कुणाची नियती? व्यक्ती हाच तर भ्रम आहे! म्हणजे त्या कल्पनेची सामाजिक उपयोगीता आहे पण शेवटी व्यक्तिमत्त्व तर सत्य न कळण्याचे कारण आहे.

प्रश्न : व्यक्तिमत्त्वाचे ओझे आम्हाला का वाटत नाही?

उत्तर : कारण दिवस भरात किंवा महिना भरात काही तरी तुम्हाला हवे तसे घडते आणि काही तरी होईल आणि कशात तरी मजा येईल असे तुम्हाला शेवट पर्यंत वाटत राहते. सदैव वाटणाऱ्या अस्वास्थ्याची कुणीही खुली चर्चा करत नाही किंबहुना तसे बोलणे हे मानसिक अस्वास्थ्याचे लक्षण समजले जाते. अश्या व्यक्तीला मग सगळे मजेत आहेत आणि आपलेच काही तरी चूकते आहे असे वाटू लागते.  ती व्यक्ती निराकार शोधून व्यक्तिमत्त्वाचा पेच सोडवण्या एवजी सहलीला जा, (शक्य असेल तर) नवा जोडीदार शोधा, भविष्य बघा, (कारण नसताना) कामाचा व्याप वाढवा, नव्या योजना आखा, असे शक्यतो ही अस्वस्थता न जाणवेल असे मार्ग शोधते. अश्या तऱ्हेने तुमच्याच कडून सर्वतोपरी व्यक्तिमत्त्व अबाधीत ठेवले जाते म्हणून तुम्हाला त्याचे ओझे वाटत नाही.   

प्रश्न : तुम्हाला सगळ्यात आवडलेले आध्यात्मिक वक्तव्य कोणते?

उत्तर : एकहार्ट म्हणतो : 'रिअलायझेशन ऑफ बीइंग शॅल ब्रिंग लाईटनेस टू युअर लाईफ'! (पॉवर ऑफ नाऊ)

प्रश्न : ओशोंचे तुम्हाला सर्वात आवडलेले विधान कोणते?

उत्तर : १) 'मी कोणत्याही पूर्वतयारी शिवाय बोलतो, त्यामुळे मला चुकण्याची भीती नसते. मी काय बोललो हे तुम्हाला जेव्हा समजते त्याच वेळी मला समजते!'  (ऑटोबायग्राफी ऑफ अ स्पिरिच्युअली इन्करेक्ट मिस्टीक)

        २) 'एन्लाइटन्मेट इज द स्टफ विथ विच द एकझिस्टन्स इज मेड' (व्हेन द शू फिट्स)

        ३) 'तुम्हारी मान्यता ही तुम्हारा कारागृह बन गयी है' (अष्टावक्र महागीता)

प्रश्न : निसर्गदत्त महाराजांचे एखादे वाक्य?

उत्तर : 'निराकारा मधे जाणण्यात आणि असण्यात फट नसते' (सुखसंवाद)

प्रश्न : तुम्हाला सगळ्यात आवडलेला धर्म ग्रंथ कोणता?

उत्तर : ईशवास्य उपनिषद, त्यातला : 'पूर्णम् इदम्' हा श्लोक 

प्रश्न : का?

उत्तर : 'व्यक्तिमत्त्वामुळे कायम अपूर्णता जाणवत राहील' हा मानवी जीवनातल्या उद्विग्नतेचा ईशावास्याचा बोध आणि त्यावर मुळातच पूर्णता कशी आहे हे त्याने दिलेले उत्तर हा मला मानवी बुद्धीचा अद्वितीय पैलू वाटतो.

प्रश्न : गीते बद्दल तुम्हाला काय वाटते?

उत्तर : गीतेत अनेक मार्ग सांगितले आहेत आणि त्याचे कळलेल्या आणि न कळलेल्या लोकांनी अनेक प्रकारचे अर्थ काढले आहेत  त्यामुळे हाती काहीही न लागण्याची शक्यता जास्त आहे.   

Post to Feedप्रश्न
प्रिय सौरभ : आता हे शेवटचे
लेखातिल
काही ऑनलाइन पुस्तके ...
काही ऑनलाइन पुस्तके ...
१०. काही आध्यात्मिक प्रश्नोत्तरे
प्रश्न

Typing help hide