जुलै २४ २०१०

२४. या निशा सर्व भूतानां

ह्यासोबत

मृत्यू ही मानवी जीवनातली महत्तम घटना आहे. याची दोन कारणं आहेत, एक, मृत्यूची कल्पना फक्त माणूसच करू शकतो आणि दोन मृत्यू हे तुम्ही काय जगलात याची परमावधी आहे. जर तुम्ही अत्यंत कृतज्ञतेनं आणि समग्रतेनं जगला असाल तर एखाद्या निष्णात वादकानं बेहद्द रंगलेली मैफिल संपन्न झाल्यावर सतार खाली ठेवावी तसं शरीर खाली ठेवू शकता.

आता श्लोकः

या निशा सर्व भूतानां, तस्यां जागर्ति संयमी

यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः   (गीता - २/६९)

प्रथम, अर्थ समजण्या करता आणि मुख्यतः हा श्लोक जगण्यासाठी उपयोगी होण्या करता, श्लोकाची मांडणी दुसरी ओळ आधी आणि पहिली ओळ नंतर अशी हवी आहे नाही तर नुसते शब्द आणि निरुपयोगी अर्थ असे होईल. शब्दार्थ भाषातज्ञ लावू शकतील पण अभिप्रेत अर्थ समजण्यासाठी शांत चित्तदशा आणि स्विकृतीचा भाव असलेलं मन हवं. मन वाचू शकतं पण अर्थ तुम्हाला समजतो आणि तो पटला तर जीवनात बदल घडू शकतो. अर्थ पटला नाही तर तुम्ही त्यापेक्षा जास्त विधायक अर्थ जाणता असं होईल आणि तो तुम्ही सुसंबद्धपणे मांडू शकाल मग विवाद न होता विधायकता निर्माण होईल.

 तर प्रथम दुसरी ओळः

यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः

मृत्यूच्या खालोखाल जीवनातली महत्त्वाची घटना झोप आहे. झोप आणि मृत्यू यांच सुख सारखच आहे, 'जीवनातल्या सगळ्या प्रश्नांचं एका क्षणात निराकरण' हे त्या सुखाचं स्वरुप आहे. सगळे प्रश्न जागेपणी आहेत, झोप सर्व प्रश्नांचं काही काळ का होईना निराकरण आहे.

तुम्ही रोज तेचतेच जगत असल्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही की मृत्यू जशी जीवनाची परमावधी आहे तशी झोप ही रोजच्या जगण्याची परमावधी आहे. झोप हा रोज येणारा मृत्यू आहे आणि मृत्यू ही न उघडणारी झोप आहे.

मृत्यू आणि झोपेत एक फार महत्त्वाचा फरक आहे मृत्यू हा एका क्षणात एकवटलेला असल्यामुळे तुम्ही त्या क्षणी सावध असालच याचा काही भरवसा नाही म्हणजे नेहेमी प्रमाणे विचारांचं असं काही काहूर तुम्हाला घेरेल की तुम्हाला शरीर मरतं आहे, आपण नाही हे समजण्याची शक्यता शून्य आहे. त्यात तुमची इतकी कामं आणि इच्छा अपूर्ण असतील की श्वास थांबतोय ही कल्पनाच तुम्हाला सहन होणार नाही त्यामुळे मृत्यूच्या वेळी तुम्ही काहीही प्रयोग करण्याच्या किंवा समजण्याच्या परिस्थितीत नसाल म्हणून जो काही प्रयोग करायचा तो झोपेवर करायला लागेल.

श्लोकाच्या दुसऱ्या ओळीचा अर्थ: 'ज्ञानी दिवसा निद्रेचं सुख उपभोगतो' असा आहे. 

तुमची बुद्धी जर तुम्ही पूर्ण पणाला लावली आणि दिनक्रम असा काही मध्यात आणलात की तुम्ही काम करतांय पण कामाचं ओझं नाही, संसार आहे पण तो असा काही कौशल्यानी सांभाळला आहे की तुम्हाला त्याचा अजीबात लेप लागत नाही, भविष्यकाळाचा विचार इतका शून्य आहे की फक्त वर्तमानच यथार्थ झाला आहे तर तुम्हाला वाटेल की हा दिवस आहे की रात्र, सत्य आहे की स्वप्न!  श्लोकातली दुसरी ओळ ज्ञानी पुरुषाची चित्तदशा अत्यंत प्रभावीपणे वर्णन करते ; 'दिवसा निद्रेचं सुख!'  

बुद्धाचा क्षणवाद त्यामुळेच अत्यंत मोलाचा ठरतो, बुद्ध म्हणतो की तुम्ही एका क्षणाची सावली दुसऱ्यावर पडूच देऊ नका, जिथला हिशेब तिथे संपवत जगा. आता ही काही अर्थ काढण्याची किंवा चर्चा करण्याची गोष्ट नाही, तुम्ही जसे आहात, जिथे आहात तिथे तुमची बुद्धी सर्वतोपरी वापरून असं जगा की वर्तमानातल्या कोणत्याही कृत्यानी भविष्यकाळ निर्माणच होणार नाही.

तुम्ही नीट बघा भविष्यकाळ वर्तमानात केलेल्या विचारामुळे निर्माण होतो. तुम्ही आता जरी उद्या भेटू असं ठरवलं तरी ती फक्त शक्यता असते जोपर्यंत भेटीचा क्षण वर्तमानात येत नाही तो पर्यंत घटना फक्त मनात असते. तुम्ही भविष्यकाळा साठी वर्तमानात काम करू शकता पण मूळ काम हे वर्तमानातच चालू असते भविष्यात नाही.

भविष्यकाळ किंवा पुढचा विचार हेच तर ताणाचं एकमेव कारण आहे आणि त्यामुळे खरं तर तुम्ही दिवसा निद्रेचं सुख उपभोगू शकत नाही. तुम्ही दिवसाचे सगळे हिशेब, सगळी कामं, दिवसा संपवलीत आणि 'उद्या जाग नाही आली तरी चालेल' असे निर्धास्त झोपलात तर रात्री अशी काही गाढ झोप येते की सकाळी सगळं शरीर पुन्हा ताजं झालेलं असतं. शिवाय एक गोष्ट नक्की की एक दिवस असा येईल की ज्याला उद्या नसेल आणि तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी तो दिवस आज देखील सुद्धा असू शकतो!

त्यामुळे दिवसच असा करायचा आहे की जगणं हा एक रिलॅक्स्ड फिनॉमिना झाला पाहिजे तरच तुम्हाला 'यस्यां जाग्रती भूतानां' हा अनुभव येऊ शकेल, निद्रेचं सुख दिवसा उपभोगता येईल आणि खरोखरीच हे जग स्वप्नमय वाटू लागेल. ज्ञानी या जगाला स्वप्न म्हणतात ते या अनुभवामुळे. जग वास्तविक आहे पण तुम्ही त्यापासून मोकळे झालात.

थोडक्यात आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दिवसाच आपण शरीरापासून वेगळे आहोत असं वाटलं आणि हे भान कामात असताना, वावरताना, प्रत्येक प्रसंगात राहिलं तर तुम्हाला दिवस स्वप्नासारखा वाटायला लागेल! हा प्रयोग रात्री होणं अशक्य आहे त्यामुळे श्लोकातल्या दुसऱ्या ओळीचा अनुभव पहिल्यांदा यायला हवा.

आता पहिली ओळ बघू : 'या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ती संयमी'.. क्या बात है!

जर तुम्ही दिवसा शरीरापासून वेगळे झालेले असाल आणि दिवसा निद्रेचं सुख उपभोगलं असेल तर हा अनुभव रात्री येईल : शरीर झोपलं आहे आणि आपण मात्र जागे आहोत!

शरीर झोपलं आहे हे आपल्याला कळतं आहे कारण आपण जागे आहोत. हा बोध जर प्रत्येक रात्रीत सघन होत गेला तर तो मृत्यूच्या वेळी देखील राहील, तुम्हाला साथ देईल, मृत्यू शरीर नेईल आणि तुम्ही जसेच्या तसे रहाल! तुम्ही मृत्यूवर विजय मिळवलेला असेल, तुम्ही अमृत झाला असाल! 

संजय

Post to Feedया निशा सर्व भूतानाम.......
ज्ञान आणि माहिती यात फरक आहे आणि तिथेच सगळी मजा आहे

Typing help hide