ऑगस्ट २०१०

२५. (दोन) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!

ह्यासोबत

झेन पंथात कोअन (Koan) हा मनातून बाहेर पडण्याचा एक मजेशीर मार्ग आहे.

ते एक कोडं असतं, वरकरणी ते सुटेल असं वाटतं पण ते काही केल्या जाम सुटत नाही आणि तुम्हाला परत परत स्वतःकडे ओढत राहतं. असे अनेक दिवस साधक त्या कोअनशी झुंजत राहतो मग एक दिवस त्याला कळतं, (खरं तर दिसतं!), की हे कोअन व्यर्थ आहे ते सुटता सुटणार नाही आणि ज्या क्षणी त्याला हे कळतं त्या क्षणी मनाकडे उन्मुख झालेली त्याची जाणीव स्वतःप्रत येते आणि तो मनापासून मोकळा होतो!  

तुम्हाला एक प्रसिद्ध कोअन सांगतो : एक लहान गूज (बदक) एका काचपात्रात ठेवलं जातं आणि त्याला खायला प्यायला दिलं जातं, हळूहळू ते गूज इतकं मोठं होतं की ज्या काचपात्राच्या मुखातून ते सहज आत गेलं ते काचपात्रच त्याच्यासाठी बंदिशाला होतं, त्या काचपात्रातून त्याला बाहेर पडणं अशक्य होतं! आता कोअन असा आहे की काचपात्र तर फोडायचं नाही आणि गूजला  अपाय होऊ न देता गूज काचपात्रातून बाहेर काढायचं!

साधकाला जेव्हा कोअन दिलं जातं तेव्हा त्याला सांगितलं जातं की याला उत्तर आहे. मग साधक त्यावर विचार करायला लागतो, रात्रंदिवस एकच ध्यास की काचपात्र न फोडता गूज सहीसलामत बाहेर काढायचं. पुढेपुढे त्याला जागोजागी काचपात्र आणि त्यात अडकलेलं गूज दिसायला लागतं.

गीतेतला हा श्लोक :  

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन,

मा कर्मफलेहेतुर्भूर्मा ते संगोSत्स्वकर्मणी... २(४७)

एक कोअन आहे आणि भारत गेली हजारो वर्षे ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. वरकरणी अर्थ अगदी साधा आहे पण तो आचरणात आणायला गेलं की तुम्ही कर्मात अडकता!

तुम्ही या श्लोकावर खूप चिंतन करा : 'तुझा कर्मावर अधिकार आहे, फलावर नाही. कोणताही हेतू न ठेवता आणि कर्माशी संग न होऊ देता कर्म कर!'

तुम्ही नुसते अर्थामागून अर्थ काढत राहाल पण नक्की काय करायचं हे तुम्हाला जाम समजणार नाही. असा अर्थ काढता काढता तुम्ही थकून जाल आणि एक दिवस अचानक तुमच्या लक्षात येईल की आपण असंगच होतो आपण कोणतंही कर्म केलं नाही, कर्म शरीर आणि मन या स्तरावर झालं, ते आपल्याला कळलं पण आपण कोणत्याही कर्मात आणि प्रसंगात जसेच्या तसे राहिलो! आपण निराकार जाणीव आहोत आणि काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा निराळे आहोत!

आता मजा अशी आहे की मी सांगतो आणि तुम्ही मंजूर केलंत तर त्याला अर्थ नाही आणि तुम्ही माझ्याशी वाद घालून ही उपयोग नाही.

तुम्हाला पटलं तर बघा. काम व्यक्तिनिरपेक्ष आहे त्यामुळे फरक तुम्ही काय करताय यानी पडत नाही तर तुमच्या आकलनानं पडतो. कोणत्याही प्रसन्न पहाटे कुणालाही बरोबर न घेता बागेत फिरायला जा, लॉनवर शांतपणे चालताना तुमच्या लक्षात येईल की शरीर चालतंय पण आपण घरी होतो तसेच आहोत आणि कुठेही गेलो तरी तसेच राहू, कर्माचा कोणताही परिणाम आपल्यावर होत नाही, आपण कर्माशी नेहमी असंग राहतो. आता तुम्ही म्हणाल की 'आहो, बागेत फिरताना ठीक आहे, ऑफिसमध्ये ही असंगता कशी साधेल? तिथे फलाची अपेक्षा न धरता कसं काम करता येईल? झालं! तुम्ही परत श्लोकाचा अर्थ काढायला लागलात आणि काचपात्रात अडकलात! अर्थासाठी विचार करावा लागतो आणि विचार करणं हाच तर मनात अडकण्याचा राजमार्ग आहे.

आता आपली ही कर्माशी असंगता मूळची आहे ती आणायची नाही जाणायची आहे आणि त्याचा अर्थ इतका आत्यंतिक आहे की  आपण करू म्हटलं तरी कुठलंही काम करू शकत नाही! हा बोध एखाद्या तीरा सारखा तुम्हाला भिडला की तुम्ही असे काही स्थिर होता की मग फलाकांक्षाच राहत नाही, पहिल्यांदा तुमची कामात अशी काही एकाग्रता साधते की तुम्हाला काम हाच आनंद वाटायला लागतो कारण मनातला गोंधळपूर्णपणे संपलेला असतो, तुमचं काम अनायासे इतकं उत्तम होतं की तुम्हीच थक्क होता, तुम्ही काचपात्रातून गूज बाहेर काढलेलं असतं कारण काचपात्र विचाराच असतं, तुम्हाला कल्पवृक्षाची गरज वाटत नाही कारण कामाचं ओझं नाहीसं झालेलं असतं, काम स्वच्छंद झालेलं असतं.. मग तुम्हाला कळतं की आपण कोअनचा निष्कारण अर्थ काढत होतो!

संजय

Post to Feedधागा पुढे चालू...
शास्त्र सोप्या भाषेत समजाऊन द्या...
अस्तित्व निर्वैयक्तिक आहे
योगप्रभू, जाऊ न द्या.
कर्मसिद्धांत
कर्मसिद्धांत असं काही नाही, कृत्यातली मजा असं म्हणता येईल
कर्म

Typing help hide