ऑक्टोबर ३१ २०१०

३१. (एक) स्मृती

ह्यासोबत

स्मृती या अत्यंत गहन आणि तितक्याच रोचक विषयावर मी आज लिहिणार आहे. मनाच्या महालात प्रवेश आणि त्याच्या रमणीय प्रदेशात हा  प्रवास आहे.

विषय सुरू करण्यापूर्वी एक सर्वमान्य गैरसमज मी दूर करू इच्छितो : विचार आहेत, भावना आहेत आणि या दोहोतून निर्माण होणाऱ्या मनोदशा (मूडस) आहेत पण मन अशी काही चिज नाही किंवा या तिन्हींना मिळून मन अशी सर्वसमावेशक संज्ञा आहे पण या सर्वसमावेषक संज्ञेमुळे मन नक्की काय आहे याचा उलगडा होत नाही.

जेव्हा आपण नैराश्य या मनोदशेचा विचार करतो तेव्हा तो भावना आणि विचार यांचा सर्व शरीरावर झालेला परिणाम असतो. जेव्हा आपण मला आठवत नाही असं म्हणतो तेव्हा तो स्मृतीच्या पुनर्जीवनाचा (रिट्रायव्हल) प्रश्न असतो. जेव्हा आपल्याला भिकाऱ्याकडे बघून दया येते तेव्हा ती भावना असते. या तीन एकमेकात मिसळून गेलेल्या पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

शरीर हा बायो-कंप्युटर मानला तर विचार हा मेंदूशी, भावना ही हृदयाशी आणि मनोदशा ही मेंदू, हृदय आणि सर्व शरीर यांच्याशी संबंधीत घटना आहे आणि हे सर्व जाणणारा एक कर्सर आहे त्याचं नांव आहे जाणीव!

आजपर्यंत मानशास्त्रावरचं जगातलं सर्व संशोधन विचार, भावना आणि मनोदशा या विषयी चर्चा करतं पण जाणीव या अत्यंत महत्वाच्या विषयाचा मानसशास्त्रात कुठेही उल्लेख नाही आणि ते स्वाभाविक आहे कारण मानसशास्त्रज्ञानां जाणीवेची जाणीव नाही.

जाणिवेचा दिवा हातात न घेता मनाच्या महालात प्रवेश म्हणजे सहस्त्र दालनं असणाऱ्या अज्ञात प्रदेशात निशस्त्रपणे केलेली धोकादायक भ्रमंती आहे, केव्हा मन तुम्हाला सैरभैर करेल काही नेम नाही आणि तुमच्या   हाती काही लागेल याची ही निश्चींती नाही.   

तुमच्या एक गोष्ट सहज लक्षात येईल की जोपर्यंत एखादी गोष्ट जाणीवेच्या कक्षेत येत नाही, मग तो विचार असो की भावना की मनोदशा, तोपर्यंत त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही. म्हणजे तुमच्या अत्यंत जवळची व्यक्ती जरी गेलेली असेल तरी तुम्हाला जोपर्यंत ही गोष्ट समजत नाही  तोपर्यंत त्याचा तुमच्यावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे जाणीव>विचार (किंवा स्मृती)>भावना>मनोदशा ही शृंखला अत्यंत महत्वाची आहे.

समजा एखादी व्यक्ती गेलेली आहे आणि घटना तुमच्या समोर आहे पण ती घटना तुमची स्मृती सक्रिय करू शकली नाही ( कारण ती व्यक्ती तुमच्या ओळखीची नाही) तर भावना आणि मनोदशा सक्रिय होण्याची शक्यता नाही (तुम्ही फार संवेदनाशिल असाल तर गोष्ट वेगळी).

तर सांगायचा मुद्दा म्हणजे जाणीव हा आपण आणि मन यातला दुवा आहे.

आता भावना आणि मनोदशा हे विषय बाजूला ठेवून आपण विचार आणि स्मृती काय आहे ते बघू.

स्मृती हा व्यक्त जगात यशाचा, रोजचं जगणं सोपं होण्याचा आणि नवीन काही करता येण्याचा एकमेव मार्ग आहे, स्मृती शिवाय जगणं जवळजवळ अशक्य आहे.

स्मृतीचा अफलातून प्रयोग अल्लारखांनी झाकिर हुसेनवर केलेला आहे आणि झाकिरच्या सर्व यशस्वितेचं रहस्य त्यात सामावलेलं आहे. मी मध्ये झाकिरच्या आठवणी वाचत होतो, त्यानी लिहिलंय की पत्नीला दिवस गेलेत हे समजल्या समजल्या अल्लारखांनी तिच्या कानात वेळी-अवेळी, रात्री-अपरात्री तबल्याचे बोल म्हणायला सुरूवात केली. झाकीरचा जन्म झाल्यावर त्यांनी तोच उपक्रम झकीरवर सुरू ठेवला. त्यानी लिहिलंय की रात्री एक- दिड वाजता अब्बा जेव्हा मैफिल संपवून घरी येत तेव्हा  त्यांनी काय वाजवलं यावर आम्ही चर्चा करत बसायचो. पुढे त्यानी लिहिलंय की हे सगळं आणि कमालीचा रियाज यामुळे त्याचा टाईम सेन्स इतका प्रगल्भ झाला की वयाच्या नवव्या वर्षी त्याची चूक होण्याची शक्यता संपली!

आता याचा मानसशास्त्रिय पैलू असा आहे : म्हणजे किती 'टाइम-स्पॅनमध्ये' आणि 'काय वाजवायचं' हे त्याला एकाच वेळी कळायला लागलं आणि ते तसं वाजायला लागलं! पहिल्या दोन गोष्टी स्मृतीचा भाग आहेत आणि तिसरी गोष्ट शरीर आणि स्मृती यांच्या समन्वयाचा भाग आहे.

जेव्हा एखादा क्रिकेटवीर खेळात निष्णात होतो तेव्हा तीन गोष्टी घडलेल्या असतात : (१) कुठला चेंडू कसा येईल हे त्यानी सरावानी जाणलेलं असतं (हा स्मृतीचाच भाग आहे) (२) तो बॉल कसा मारायचा हे तत्क्षणी त्याच्या स्मृतीतून त्याला उपलब्ध झालेलं असतं आणि (३) शरीर आणि स्मृती यांचा नेमका मेळ जमून तो बॉल हवा तसा मारला जातो!

आपण जर नवे खेळाणारे असू तर या तीन मधली एक ही गोष्ट आपल्याला अवगत नसल्यामुळे आपण आऊट होतो. किंवा निष्णात खेळाडू देखील यातला एक जरी घटक सक्रिय झाला नाही तर आऊट होतो.

स्मृतीचे दोन भाग आहेत : नोंद आणि स्मरण (रेकॉर्ड अँड रिट्रायवल) या दोन्ही गोष्टी पूर्णपणे आवडीशी संबंधीत आहेत कारण ज्याची अपल्याला आवड आहे तिकडेच आपलं लक्ष जातं त्यामुळे एकाग्रता सहज साधते, साधावी लागत नाही. स्मरणाचं ही अगदी तसंच आहे जे आपल्याला आवडतं ते आपल्याला आपसूक आठवतं, प्रयास पडत नाही.

झाकिरची स्मृती त्याला साथ देण्याचं कारण त्याची तबला वादनाची आवड हे आहे. त्याच्या आठवणीत त्यानी लिहिलंय की लहानपणी आपल्या वयाच्या मुलांबरोबर क्रिकेट खेळावं असं त्याला फार वाटायचं पण बोटं सलामत राहावीत म्हणून क्रिकेट न खेळण्याची अब्बांची त्याला सक्त ताकिद होती.

आता समजा झाकिरनी तबल्या एवजी क्रिकेटमध्ये रस घेतला असता तर त्याच्या जन्मापूर्वी पासून संस्कारीत केलेली स्मृती त्याला उपयोगी होऊ शकली नसती.

तुम्हाला जर स्मृती उत्तम ठेवायची असेल तर एक अफलातून प्रक्रिया सांगून हा लेख संपवतो.

विचारची प्रक्रिया एकमार्गी आणि आधी असलेल्या स्मृतीशी अनुसंधान साधत जाणारी आहे. माणसानी विचार करण्याची ही एकच पद्धत युगानुयुगं अवलंबल्यामुळे  असं झालं आहे. संवेदना स्मृती सक्रिय करते आणि मग आधीच्या स्मरणिकेतून जाणीवेचा कर्सर एकमार्गी पुढे सरकत जातो अशी ही नेहेमीची पद्धत आहे.

म्हणजे एखादा आवाज एकला की त्या आवजाशी संलग्न चित्र प्रथम स्मरणपटलावर उमटतं, मग  त्या चित्रातून त्याच्याशी संबधीत कोणतिही घटना (म्हणजे त्या घटनेची चित्रं आणि वाक्यं), मग त्या घटनेशी साधर्म्य असणाऱ्या दुसऱ्या घटनेचं वाक्य आणि चित्र असा स्मृतीपट चालू होऊन जोपर्यंत त्यात व्यत्यय येत नाही तोपर्यंत हे अनिर्बंध पुढे पुढे सरकत राहतं.

आता प्रक्रिया अशी आहे, कोणत्याही क्षणी पूर्णपणे सावध होऊन सध्या चालू असलेल्या स्मृतीचा धागा पकडायचा आणि एकएक करत मागे जायला सुरुवात करायची. तुम्ही पूर्ण एकाग्रता साधून प्रयत्न करत राहीलात तर तुम्हाला जिथे पहिली संवेदना झाली आणि ज्यामुळे तुमची स्मृती सक्रिय झाली तिथ पर्यंत येता येतं आणि तुम्हाला ते कळतं!

एकदा का तुम्ही या प्रक्रियेत माहीर झालात की तुम्ही तुमच्या मनाचे मालक होता मग संवेदनेनी बेसावधपणे स्मृती सक्रिय होऊ शकत नाही, त्यामुळे मग पुढचा सगळा गोंधळ वाचू शकतो म्हणजे भावना आणि मनोदशा यातून ही तुम्ही मुक्त होऊ शकता, प्रत्येक प्रसंग तुमच्यासाठी वस्तुनिष्ठ होतो आणि प्रसंग हाताळायची तुमची क्षमता कमालीची वाढते!

संजय
 
 

Post to Feedवा!
ऊत्तम लेख
अभिनंदन!
छान..

Typing help hide