१६. (एक) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत

अशी कल्पना करा की हे सारे अस्तित्व पाण्याचे बनले आहे. या अस्तित्वात प्रकट होणारी प्रत्येक गोष्ट चंद्र, सूर्य, तारे, पशु, पक्षी, समुद्र, डोंगर, देह, भावना, विचार सगळं काही या पाण्यातूनच प्रकट होतयं आणि पाण्यातच विलीन होतय. आता प्रत्येक आकार  जरी वेगळा भासला तरी मूळात तो पाणीच आहे, तुम्ही प्रत्येक आकाराच्या सुक्ष्मातल्या सूक्ष्म अणूचं विघटन केलंत तरी पाणीच मिळेल. तुम्हाला आकार विलीन होतायत असं जरी वाटलं तरी मूळात पाणीच पाण्यात मिसळतयं. तुम्हाला आपण जरी वेगळे आहोत असं वाटत असेल आणि तुम्हाला कुणीही सांगीतलं नाही तरी मूळात तुम्ही पाणीच आहात. तुम्ही समजा अगर समजू नका सारा खेळ पाण्यातच चालेल आणि पाण्यातच संपेल किंवा पाण्यातच अव्यहत चालू राहील. आकार निर्माण करणं आणि काही कालावधी नंतर ते विलीन होणं ही देखील पाण्याचीच अंगभूत क्षमता असेल. पाणी आणि प्रकट होणारे आकार जरी वेगळे भासले तरी मूळात सगळं पाणीच आहे. सगळं अस्तित्व पाण्याचं असल्यामुळे मृत्यू ही कल्पना असेल कारण पाणी मरून जाणार तरी कुठे? आता थोडा पाण्याच्या बाजूनी विचार करा, पाण्याला जर सगळच पाणी असेल तर आपण पाणी आहोत हे कसं समजेल? जेंव्हा पाण्यात काही तरी निर्माण होईल तेंव्हाच पाण्याला स्वतःची जाणिव होईल.

आता पाणी ही कल्पना सोडून द्या आणि समोर बघा तुम्हाला निराकार दिसेल. हा निराकार या सगळ्या प्रकट जगाचा आधार आणि स्त्रोत आहे. प्रत्येक आकार या निराकाराचाच बनलेला आहे. आपण पाणी ही कल्पना केली म्हणून पाणी कुठे तरी संपेल, किनारा असेल ही शक्यता संपली, कितीही वेध घेतला तरी निराकाराला अंत नाही. संपूर्ण शांतता आणि दिशाहीन अनंतता!

तुम्ही निराकाराचं अस्तित्व नाकारू शकता कारण निराकार निःशब्द आहे. तुम्ही निराकार नाकारलात तरी मूळात तुम्ही निराकारच आहात कारण नकार देण्यापूर्वी नाकारणार हजर हवा. मी नाही म्हणायला देखील मी हवाच.

निराकाराला निराकाराचा बोध होणे म्हणजे मुक्ती.

आता निराकार हा देखील शब्द आहे तो सोडून द्या, काय उरते? एक निःशब्द, अथांग शांतता. या बोधाला कुणी शून्य म्हंटलं आहे तर कुणी पूर्ण पण सर्व शब्द मानव निर्मीत आहेत त्यामुळे अर्थ शब्दात नाही तर अनुभवात आहे. अनुभव मात्र सगळ्यांचा एकच आहे. 

अशा प्रकारे अस्तित्वात द्वैत नाही. आकार आणि निराकारात द्वैत नाही आणि आकार जरी वेगवेगळे भासत असले तरी त्यातही द्वैत नाही कारण अस्तित्व एक आहे. द्वैत हे बोध नसण्यात आहे.

ही अस्तित्वाची एकरूपता लक्षात आली की जगाकडे, जीवनातल्या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टीकोन संपूर्णपणे बदलतो. कोणत्याही प्रसंगात हे योग्य का ते योग्य, या एवजी काय सहज, सोपे आणि आनंददायक होईल असा विधायक दृष्टीकोन नकळत तयार होतो.

महावीरानी अतिशय घनघोर साधना केली असा उल्लेख आहे. सर्व बोधाचं सार म्हणून त्यानी फक्त पाच तत्त्व नमूद केली (पंचशील): अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. ही तत्त्व अनुसरून कुणालाही सहज आनंदानी जगता येईल असं त्याचं म्हणणं होतं. सधकाना कोणतं तत्त्व कुठे वापरायचं याचा प्रश्न पडायला लागला तेंव्हा एका साधकानी महावीराला विनंती केली की तुम्ही एकच तत्त्व असं सांगा की जे आम्हाला बोधाप्रत नेईल. त्यावर महावीर म्हणाले : अहिंसा परमो धर्मः , अहिंसा या एका आणि फक्त एकाच तत्त्वानी तुम्ही बोधाप्रत (म्हणजे आपण निराकार आहोत या अनुभवाप्रत) पोहोचू शकता. साधकांना इतकी सोपी गोष्ट मान्य नव्हती पण अहिंसा हे एकच निर्विवाद तत्त्व महावीरानी सांगीतल्यामुळे त्यांचाही इलाज चालेना. कारण तत्त्व पूर्णपणे ग्राह्य मानून आचरणात आणणं यापेक्षा तत्वंच कसं चूक आहे किंवा गैरलागू आहे हे शोधण्यात सगळ्यांना धन्यता वाटत होती. साधकांना सगळी अध्यात्मिक सूत्रं पाठ होती त्यामुळे वाद घालायला भरपूर वाव होता. एका बुजुर्ग साधकानी सखोल विचार करून असा मुद्दा शोधला की महावीर अडचणीत येईल : साधकांच्या सभेत प्रश्नोतारांच्या वेळी तो महावीराला म्हणालाः  "तुम्ही म्हणता की अहिंसा परमतत्व आहे म्हणजे हिंसा होण्यासाठी तुम्ही द्वैत मानता (म्हणजे एक हिंसा करणारा आणि दुसरा ज्याच्यावर हल्ला होतोय तो) पण सगळे ज्ञानी म्हणतात की अस्तित्व एक आहे हे कसं?"

त्याला वाटलं आपण महावीराला काय अडचणीत आणलाय, कारण आता एक तर तत्त्व तरी बाद किंवा अस्तित्व एक आहे या मूळ वस्तुस्थितीलाच शह. महावीरानी हसून त्या साधकाकडे पाहीलं आणि ते म्हणाले "दोन्ही ही बरोबर आहे, अहिंसा हा परम धर्म आहे आणि अस्तित्व ही एक आहे". साधकानी विचारलं " ते कसं?" त्यावर महावीर म्हणाले : "अस्तित्व एक आहे म्हणजे, तुम्हाला कळो अगर न कळो सगळीकडे तुम्हीच आहात आणि अहिंसा या तत्त्वाचा अत्यंतिक अर्थ तुम्ही स्वतःला दुखवू नका असा आहे! "  तुम्ही बघा, दुसरा काय करतो हे महत्त्वाचं नाही, त्याच्या कृत्यानी तुमच्या मनात काय भाव निर्माण होतो यानी तुमचं कृत्य ठरतं.  मानवी स्वभाव मोठा मजेशीर आहे स्वतःच्या कृत्याची जवाबदारी स्वतःवर घेण्यापेक्षा तो दुसऱ्यावर ढकलून मोकळा होतो. एकदा ही सवय लागली की मग स्वतःचं अयोग्य वागणं हे कसं योग्य होतं हे दाखवण्यासाठी त्याला भरपूर मेहेनत करावी लागते. निती-अनिती, योग्य-अयोग्य, धर्म-अधर्म, स्वजन-इतरेजन, नैसर्गिक-अनैसर्गिक अशा अनेक कल्पना निर्माण कराव्या लागतात. अहिंसा या साध्या सोप्या तत्त्वावर ग्रंथच्या ग्रंथ लिहीले जातात आणि हिंसा मात्र कायम राहते. तुम्ही कधीही उद्विग्न झालात तर फक्त "एक" हा भाव मनात आणा, तो हृदयस्थ करा, सगळं एकदम शांत होईल. जीवन सहज आणि सोपं होईल. जिथे सगळे मार्ग संपले असं वाटत होतं तिथे मार्ग दिसू लागेल.

संजय