मिठाई

विचार आला पुन्हा जुना तो, जुनी धिटाई तशीच आहे
"बघा झटकले!" अशी आमची जुनी बढाई तशीच आहे!

जरी पुढारी हसून सांगे - "जवळजवळ संपलीच समजा! "
घरात दारात पोचलेली सुरू लढाई तशीच आहे

अजून झुकतात मेघ काही, अजून झरतात थेंब थोडे
अजून माझ्या नभातली सावळी निळाई तशीच आहे

"उद्यातरी फेकतील... " म्हणती भुकेजलेली भिकार पोरे
"किती दुकानातली कधीची शिळी मिठाई तशीच आहे

कितीक दिंड्या, किती पताका... अजून कल्लोळ होत नाही!
अजून बिलगून या विटेवर उभी विठाई तशीच आहे...