इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी -५

चुडामणींच्या केबिनमध्ये इन्स्पेक्टर (अर्थातच) प्रधान, चुडामणी आणि शिक्षण संस्थेचे आणखी एक दोन पदाधिकारी सचिंत मुद्रेने बसले होते. सगळ्यांच्या मनात काळजी, भीती आणि खेद होता - जो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. एक दीर्घ सुस्कारा टाकून चुडामणींनी खिडकीतून बाहेर नजर टाकली. इन्स्टिट्यूटचं आवार तिथून स्पष्ट दिसत होतं. निम्मा अधिक इमारतीचा भाग जळालेल्या अवस्थेत होता. उरलेल्या भागाचं प्रचंड नुकसान झालेलं कळत होतं. काचा फुटून शतशः विदीर्ण झालेल्या, बाकं बाहेर आणून उलटी फेकलेली. इतर शैक्षणिक साहित्यही संपूर्ण विल्हेवाट लावलेल्या अवस्थेत बाहेर फेकलं गेलेलं दिसत होतं. पुस्तकं अस्ताव्यस्तपणे बाहेर पसरली होती. पार कंपांउंडपर्यंत मोडतोड झालेली होती. उद्विग्नपणे चुडामणींनी नजर दिवेकर सरांकडे वळवली. मारहाणीत त्यांच्या डोक्याला टाके पडून बांधलेलं बँडेजही रक्ताळलं होतं. हात प्लास्टरमध्ये होता आणि डोळा सुजलेला होता. इतकं सगळं होऊनही फक्त त्यांचा चेहरा मात्र विलक्षण शांत होता. इतकंच काय, त्यावर एक अस्फुट स्मित आणि समाधानाची भावना होती.
"बसलाय काय शांत तुम्ही सर? कंप्लेंट लिहायला घ्या. " शिक्षणचुडामणींना राहवलं नाही. इन्स्पेक्टरपासून सगळ्या उपस्थितांच्या नजरा दिवेकर सरांवर खिळलेल्या होत्या.

पण दिवेकर सरांनी फक्त नकारार्थी मान हलवली‌. संथ पण खंबीर आवाजात ते म्हणाले, "परीक्षेत कॉपी करू दिली नाही, म्हणून विद्यार्थ्यांनी मला मारहाण केली. कॅंपसची नासधूस केली, प्रचंड प्रमाणात केली. पण हेच, मला वाटतं कोर्सचं यशही आहे. मारहाणीच्या वेळची त्यांची भाषा, मोडतोड करतानाचा त्यांचा त्वेष, आवेश, हे सगळं मी एका तटस्थ बारकाईनं निरखत होतो. नाहीतरी पुढे जाऊन, चुकीच्या हातांमध्ये पडून, नाही त्या नेतृत्वाच्या कच्छपी लागून ही मुलं असलंच काहीतरी करणार होती. मी निदान त्यात शंभर टक्के व्यावसायिकता आणू शकलो. "

समाधानी नजरेने त्यांनी सर्वांकडे नजर फिरवली. "दुसरी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? आज गुरुपौर्णिमा आहे.  आपण किती व्यावसायिक पावटे बनलो आहोत , हे दाखवून माझ्या शिष्यांनी मला दिलेली ही गुरुदक्षिणाच आहे असं मी मानतो. त्यामुळे पोलिसांत तक्रार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही... मी... मी कृतार्थ आहे. "

(संपूर्ण)
२००४ च्या 'साप्ताहिक सकाळ' कथास्पर्धेमधील दुसरे पारितोषिक विजेती कथा. या कथेवर आधारित एकांकिकाही बक्षीसपात्र.