महाजालावरील मराठीचा इतिहास-३

महाजालावरील मराठीचा इतिहास-३: "शब्दबंध-२००९"

महाजालावर अनेक लोक मराठीत (खरे तर देवनागरीत) अनुदिन्या लिहू लागले त्यामुळे महाजालावरील मराठीच्या इतिहासात नवे पर्व सुरू झाले. मायबोलीवर रंगीबेरंगी सदरात लोक आपापले अनुभव ग्रथित करू लागले. दिनेश व्ही.एस‌. यांच्या लेखनाने वनस्पती जगताचा जणू चालता-बोलता महाग्रंथच सादर केला. तर विनय देसाई यांनी रंगीबेरंगीमध्ये लिहिलेल्या प्रवासवर्णनांचे पुढे 'परदेसाई' नावाचे सुंदर पुस्तक तयार झाले. वर्डप्रेस व नंतर गुगल ब्लॉगस्पॉटवर अतिशय समृद्ध अनुदिन्या प्रकट होऊ लागल्या. मराठी ब्लॉगविश्वावर त्यांच्या नोंदी व्यवस्थित होऊ लागल्या. एकमुस्त, एका जागी संदर्भसाधन तयार झाले. मात्र अनुदिन्यांचे वाचन लेखकांच्या मित्रमंडळींतच सीमित राहत होते. परस्परांत कवितांच्या भेंड्यांसदृश खो-खो चे खेळ खेळून अनुदिनीकारांनी वाचकवर्धनाचे प्रयत्न चालवले होते.

२००८ मध्ये प्रशांत मनोहर यांनी अनुदिनीकारांच्या महाजालावरील ई-सभेची संकल्पना मांडली 'शब्दबंध-२००८' च्या रूपाने. यात जगभरातील निरनिराळ्या कालक्षेत्रांतील (टाईमझोनमधील) दहा लोकांनी सहभाग घेऊन एक अनोखा पायंडा पाडला. यात त्यांच्या अनुदिन्यांवरील लेख/कविता यांचे ऑनलाईन अभिवाचन करण्यात आले होते. या वर्षीही ६ व ७ जून रोजी 'शब्दबंध-२००९' चा संकल्प सोडण्यात आलेला होता. याकरता सदस्यनोंदणी करण्यात आली होती. शब्दबंध-२००९ या दुव्यावर त्यासंबंधीची उद्घोषणा पाहता येईल.

त्यात असे म्हटले होते की, "देशांतल्या/देशसमूहांतल्या/सत्रांतल्या सहभागी ब्लॉगकारांच्या संख्येनुसार सत्राच्या वेळा व सत्र भरवण्याचं माध्यम ठरवावं लागेल. स्काईप (www.skype.com)च्या मेसेंजरवर एका वेळी २५ सदस्य सभेमध्ये सहभागी होऊ शकतात. समांतर सत्रे ठेवायची असल्यास स्काईपचा विचार करता येईल, पण त्यापेक्षा अधिक चांगलं माध्यम असल्यास जास्त सोयीस्कर असेल. डिमडिम (www.dimdim.com) द्वारे एकावेळी १००० सदस्य सहभागी होऊ शकतात. अर्थात, याबद्दल चाचणी घेणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अमेरिकेत व काही देशांमध्ये निःशुल्क टेलिकॉंफरन्सिंगची सोय आहे. या माध्यमांपैकी काहींचा आपल्याला निश्चित उपयोग होऊ शकतो. अर्थात, आणखी माध्यमं उपलब्ध असल्यास त्याची माहिती अवश्य द्या. अधिकाधिक लोकांना सहभागी होता आलं, तर आपल्या सत्राप्रमाणेच इतर सत्रांतल्या सदस्यांचं अभिवाचन ऐकण्याचा आस्वादही सर्वांना घेता येईल. या सत्रांच्या सूत्रसंचालन करण्याची तुमची तयारी असेल तर अवश्य कळवा."

म्हणजे आजवरच्या सर्वात प्रगत माध्यमांचा वापर करून महाजालावरच, महाजालावर अनुदिन्या लिहिणाऱ्यांचे अधिवेशन भरवण्याचा विचार होता हा. अविश्वसनीय पण शक्य कोटीतला. अशाप्रकारे महाजालावर मराठीचा वावर निव्वळ लिखित स्वरूपात न राहता श्राव्य स्वरूपात सुरू होणार होता. मीही या सभेकरता नाव नोंदवले. ही सभा यथानियोजित, यथासांगपणे सुरळीत पार पडली. यात अभिवाचन करणाऱ्या शब्दबंध-२००९: सभासदांची सूची प्रसिद्ध करण्यात आली. पण श्रोते म्हणूनही अनेकांनी हजेरी लावली होती. तर या उपक्रमात नाव नोंदवणाऱ्या मराठी ब्लॉगकारांची संख्या ६३ पर्यंत जाऊन पोहोचली. सभा सतत पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत गेल्यामुळे या सभेवर, ती संपेस्तोवर सूर्य मावळला नाही. आता इतिवृत्त, आणि सभासदांचे प्रत्यक्ष अनुभव यथावकाश प्रसिद्ध होतीलच. पण महाजालावरील मराठीच्या इतिहासात यामुळे नवा अध्याय उघडला गेलेला आहे यात कसलाही संशय नाही.