ऐतरेय महिदास(५)

      बारा वर्षे उलटली. आणि एके वर्षी राज्यात घोर दुष्काळ पडला. पाऊस पडेना. पाणी मिळेना. प्रजा अगदी हवालदिल झाली. एक वर्ष उलटले. दोन वर्षे उलटली... पावसाचे नाव नाही. चिंतित राजसभेलाही काही उपाय सापडेना. घरोघरी उपासना,यज्ञयाग झाले. जो सुचेल तो उपाय करून झाला पण पाऊस काही पडेना... तशातच एक दिवस गुप्तचरांनी वार्ता आणली.... नगराबाहेर घोर अरण्याचा प्रदेश आहे. तिथे सगळी हिरवाई आहे. पाऊस नियमित पडतो. वनस्पती तरारलेल्या आहेत. पाण्याचे झरे अखंड वाहतात. पण त्या क्षेत्राची सीमा संपली की ते झरे जमिनीत गुप्त होतात. त्या क्षेत्रात एक आश्रम आहे. तिथे एक तपस्वी तपश्चर्या अंगिकारून आहेत. महाराज जानकीर्ती हे ऐकून अत्यंत आश्चर्यचकित झाले. त्यांनी दूताकरवी अत्यंत सन्मानाने तपस्वींना राजसभेत येण्याची प्रार्थना केली.


      इतरामातेच्या आज्ञेने महिदास राजसभेत आले. त्यांनी नम्रपणे सभेला वंदन केले. आणि ते बोलू लागले, " हे राजा, तुझ्या राज्यात धरित्रीची अबाळ झाली. त्याने ती कोपली आहे. म्हणून पाऊस पडत नाही." राजा जानकीर्तीने महिदासांना हात जोडून विनंती केली की या संकटावर काही उपाय सांगा. तुमच्या आश्रमस्थानी तुम्ही केलेल्या प्रयोगांचा लाभ माझ्या प्रजेला मिळू द्या. आमच्याकडून कळत नकळत झालेल्या अपराधांबद्दल आम्ही सगळेच धरेची क्षमा मागतो आहोत. राजाच्या या विनंतीला मान देऊन महिदासांनी आपले सगळे संशोधन जनतेसाठी खुले केले. दरणीचा कोप दूर झाला. रुसलेला पाऊस पुन्हा बरसू लागला. राज्यावरची आपत्ती दूर झाली. अतिशय कृतज्ञतेने महाराज जानकीर्तींनी महिदासांना पुन्हा एकदा आपल्या राजसभेत पाचारण केले. त्यांचा मोठा सन्मान केला. सत्कारसमारंभ झाल्यावर महिदास उठून उभे राहिले. क्षणभर त्यांनी इतरामातेचे स्मरण केले आणि ते म्हणाले "माझी आई आणि ही धरित्री या दोघी माझ्या गुरू आहेत. त्यांनीच दिलेले हे ज्ञान सर्वांच्या उपयोगासाठी सूत्ररूपाने मी ग्रंथबद्ध केले आहे. माझ्या वडिलांनी त्यांचे नाव न सांगण्याची मला पूर्वीच आज्ञा दिली आहे. ते आज या स्थळी उपस्थित आहेत. पण त्यांची आज्ञा मला शिरसावंद्य आहे.  धरेचा दास म्हणून महिदास आणि इतरेचा पुत्र म्हणून ऐतरेय अर्थात ऐतरेय महिदास याच नावाने ही ग्रंथरचना ओळखली जाईल. हे ऐतरेय ब्राह्मण, ऐतरेय आरण्यक आणि ऐतरेय उपनिषद मी आज सर्वांना अर्पण करतो".....


(ऐतरेय ब्राह्मण,आरण्यक आणि उपनिषद हे ग्रंथ आजही आस्थेने अभ्यासले जातात. ऐतरेय उपनिषदाला अत्यंत महत्त्वाच्या आणि सुरुवातीला लिहिल्या गेलेल्या अशा अठरा उपनिषदांमधे स्थान प्राप्त करण्याचा मान मिळालेला आहे.)