जोहार

रोज माझ्यावर नवे एल्गार होते
उमलण्याचे नितनवे जोहार होते

बोलली उद्विग्न सुमने विखुरलेली
शेवटी कोणीतरी खुडणार होते

वेचते ज्यातून मी थोडा जिव्हाळा
ते सुखाचे रोकडे व्यवहार होते

आज मुजऱ्याचा कसा बेरंग झाला
पाहणारे रोजचे दिलदार होते

हीच आळंदी असावी चोरट्यांची
या इथे सारे खिसे बेजार होते

जा, क्षमा केली तुम्हाला मृण्मयीने
मायमातीचे तसे संस्कार होते