माझ्या वाचनात "तिख न्हात हान" या विएतनामी बौद्ध भिक्षूंनी सांगितलेली एक कथा आली ती या विषयाशी थोड्यफार प्रमाणात संबंधीत आहे.
बौद्ध तत्वज्ञानात अहिंसा या गोष्टीला महत्त्व दिले गेले आहे. एकदा बुद्धाला एका शिष्याने विचारले की जर मांसाहार केला तर हिंसा केल्या सारखेच आहे. मग अहिंसा तत्वाचे पालन करण्या करिता मांसाहार वर्ज्य करावा का?
बुद्धाने त्याला समजावले की तू समजा जंगलात हरवला आहेस व रात्रीच्या अंधारात उत्तर दिशा शोधतो आहेस... अशावेळी ध्रूव ताऱ्याच्या दिशेने गेलास तर तू निश्चित उत्तरेला जाशील. पण तू ध्रूव ताऱ्याच्या दिशेने जातोस तेव्हा ध्रूव ताऱ्यावर पोचण्याची अपेक्षा नसते. उत्तर दिशेला जे काही तुझे ध्येय आहे तिथे पोचणे अभिप्रेत आहे. त्याच प्रमाणे अहिंसा तत्त्व हे तुझ्या निर्वाण मार्गातले एक दिशा दर्शक आहे. या जगात कोणीही १०० % अहिंसा पालन करू शकत नाही. म्हणून स्वप्रवृत्ती नुसार व स्वशक्ती प्रमाणे अहिंसा पालन कर. जो या दिशा दर्शकांचे जितके जास्त पालन करेल त्याची प्रगती जास्त होईल. ध्रूव ताऱ्याच्या दिशेने न चुकता गेलास तर धेया प्रत निश्चित पोचशील. पण ध्रूव ताऱ्यावरच जाण्याचा प्रयत्न केलास तर ध्येय प्राप्ती न होता अपयशच येईल.
स्वतः बुद्धाने भिक्षेत मिळालेले सामिष अन्न खाल्ले होते व ते भिक्षूंना वर्ज्य केले नव्ह्ते असे वाचनात आले. मला वाटते की मनोगत वरील "शाकाहार वि. मांसाहार" इत्यादी चर्चां मध्ये हा दृष्टीकोन सर्वांना थोडी मदत करू शकेल.
(खुलासाः मी स्वतः सर्व प्रकारचे सामिष अन्न अनेक वर्षे खात होतो (गोमांस सुद्धा). आता मात्र पूर्ण शाकाहारी आहे)