चांदण्याचा सोस नाही
तारकांची आस नाही
ही सरू दे अमावास्या
हा हट्ट ना ध्यास नाही।
केवड्याची मोगऱ्याची
गंधगाथा दूर गेली
उरातल्या भावनांची
रोज झाली पायमल्ली।
दाटली अभ्रे तरीही
तल्लखी ती तो उन्हाळा
रुक्ष वैराण माळांचा
फक्त दिसला उमाळा।
करपली दाट राने
करपल्या मुग्ध वेली
शुष्क पाने गाळलेली
वादळाने स्वैर नेली।
थेंब साधा दवाचाही
दिठीला लाभला नाही
एकही अश्रू उषेचा
नभाने गाळला नाही।
अशी गेली सात वर्षे
त्यांचा काही माग नाही
आता चंद्रावर तसा
दिसेलसा डाग नाही।
चांदण्याचा सोस नाही
तारकांची आस नाही
ही सरू दे अमावास्या
हा हट्ट ना ध्यास नाही।
संपदा
२० सप्टेंबर ०६