तुझी दृष्टि का रुष्ट झाली असे?

नायक : तुझी दृष्टि का रुष्ट झाली असे?
क्षमा कर अगर चूक झाली असे.
नायिका : न काही असे हेतु माझ्या मनी
चुकीला तुझ्या दंड झाला असे! ।ध्रु।
नायक : घडो दंडही, आजला तीच प्राप्ती
असे त्यातुनी देत चाहूल प्रीती
पुढे प्रीतिचे जे घडे ते घडो
कृपा बोलण्याचीच झाली असे ।१।
नायिका : प्रतिष्ठा तुला का अशी बोलण्याची?
कशी वेळ आली अता अनुनयाची!
सवय आर्जवाची कुठे लागली?
सतावायचे शिकवले का असे? ।२।
नायक : सतावू नको तर कसा येउ मागे?
जुळावे तुझ्याशी कसे सांग धागे?
दिसाचेच ह्या स्वप्न होते मनी
मनोकामना पूर्ण झाली असे! ।३।

टीपा:

१ पाठभेद :
तुझी दृष्टि का कोपलेली दिसे?
किंवा
तुझ्या नयनि का राग आला असे?

पाठभेद :
जसे व्हायचे प्रीतिचे, होउदे
किंवा
मिळो फळ अता प्रीतिला काहिही

 पाठभेद :
दिसाचेच ह्या, स्वप्न प्रीती बघे

चाल : मूळ गाण्याचीच!  (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )
ध्रुवपद - लगागा लगागा लगागा लगा
कडवी - लगागा लगागा लगागा लगागा (ओळ १ आणि २) (मनाचे श्लोक?)
लगागा लगागा लगागा लगा (ओळ ३ आणि ४)

विनंती :


१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. ह्यावेळेला कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे (सूचनांबद्दल मेघना नरवणे आणि सागर लिमये, धन्यवाद) रोजचे प्रतिसाद पाहून आणखी शोधसूत्रे देईन. शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.

३. प्रशासक, प्लीज, बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )