सेमी इंग्लिश.

माझा मुलगा आज सातवीमधून आठवीत गेला तसे अनेक मुले उत्तीर्ण झालेलीच होती. त्याला आणि त्याच्या आईला एक काळजी लागली होती की त्याला आठवीपासून सेमी इंग्लिश मिळेल का? यात विज्ञान आणि गणित ही विषये मराठी माध्यम असली तरी इंग्लिशमध्ये असतात. माझे असे मत आहे की आपण जाणीवपूर्वक मराठी माध्यम घेतले आहे तर मध्येच हे इंग्लिशचे भूत कशाला? त्यांचे त्यावर असे प्रतिपादन होते की आज नाही तर उद्या इंग्लिश मध्ये शिकावे लागणार आहे तर अकारणच उशीर कशाला? मग त्यावर मी गुणवंत मुलांची यादी दाखविली आणि विचारले की या मुलांना कोणत्याही माध्यमाचा काही फरक पडेल काय? तर त्यांचे म्हणणे, की त्यांची आई वडील त्यांचा अभ्यास घेत असतात. माझे उत्तर की माझ्या वडीलांना मी कोणत्या इयत्तेत आहे हेही माहित नसायचे. शेवटी बराच वादंग झाला आणि कोणाचेही समाधान होईना.

शेवटी शाळेनेच कोणाला मराठी आणि कोणाला इंग्लिश माध्यम द्यायचे यावर निर्णय घेतला आणि विषयाला पूर्णविराम मिळाला. यात ज्यांची इच्छा आहे आणि त्यांना असे सेमी इंग्लिश माध्यम मिळणार नाही त्यांच्या मनावर काय परिणाम होईल याचाही विचार केलेला दिसत नाही.

आपल्या शासनाने आणि आमच्यासारख्या पालकांनी मराठीचे शिरकाणच करायचे आहे असा विडा उचललेला दिसतो. शासनाने यावर दहावी मध्ये एखादी पुस्तिका ठेवावी आणि अकरावी मध्ये आवश्यकता असेल तर मार्गदर्शन करावयाला हवे.

आपले काय मत आहे?