माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-४

१८ ऑक्टोबरला रात्री ८. ४० ची पुण्याची बस होती. सुदैवाने बस सुटण्याचे ठिकाण आमच्या कंपनीच्या बसेस जिथे थांबत तिथेच होते. आम्ही १८ तारखेला प्रशिक्षण संपवून ६. ४५ च्या बसने सामान घेऊन निघालो. तशी मी पहिल्यांदाच असा एकटीने प्रवास करत होते. पण माझ्या बरोबर माझा १ पुण्याचा सहकारी होता. ७. ४५ वाजता आम्ही कंपनीच्या बसमधून उतरलो. आणि जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेलो. पण पुण्याला येण्याच्या आनंदात मला काही जेवण गेलेच नाही. ८. ३० वाजता आम्ही पुण्यासाठीच्या बसच्या स्टॉपवर येवून उभे राहिलो. बस ८. ४० ची होती पण ती ९. ३० ला आली. आणि ९. ४५ ला निघाली. गाडीत हिंदी चित्रपट लागला होता. तो बघता बघता कधी झोप लागली कळलेच नाही.

रात्री १. ३० वाजता बस एका ढाब्यावर थांबली. तिथे आम्ही चहा घेतला व पुन्हा बसमध्ये गाढ झोपी गेलो. सकाळी जाग आली ती फोनच्या आवाजानेच. तो केदारचा फोन होता. बस कुठपर्यंत आली आहे असे तो विचारत होता. मी बाहेर पाहिले तर हडपसर आले होते. मी त्याला तसे सांगितले. थोड्याच वेळात बस जहांगिर हॉस्पिटल येथे आली. आणि मी सामान घेऊन उतरत असतानाच समोर केदार दिसला आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. आम्ही १९ दिवसांनी एकमेकांना भेटत होतो आणि नविनच लग्न झाले असल्याने ते १९ दिवस आम्हाला खूप वाटले होते.

घरी पोचलो तेव्हा सकाळचे ९ वाजले होते. घरचे सर्व जण मला भेटून खूष झाले. त्या दिवशी आमचा पहिला दसरा असल्याने आम्हाला आईकडे जेवायला बोलावले होते. आम्ही आवरून मग आईकडे गेलो. मग जेवण वगैरे आटोपून घरी येईपर्यंत दुपार होऊन गेली होती. बरेच दिवसांनी घरचे जेवण जेवून मला खूप बरे वाटले. पुढचे २ दिवस भुर्रकन कसे उडून गेले कळलेच नाही. मी आणि केदारने हे दोन्ही दिवस एकमेकांच्या सहवासात, आनंदात  घालविले. आणि मग पुन्हा हैदराबादला निघायची वेळ आली . ह्या वेळी निघताना एवढे जाणवले नाही कारण  केदार माझ्या हट्टापायी मला सोडायला हैदरबादला येणार होता आणि दुसऱ्या दिवशी विमानाने परतणार होता. मी मजेत केदारबरोबर निघाले.

दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही बेगमपेटवर उतरलो. आणि मग कंपनीच्या बसने सकाळी ७ वाजताच कंपनीच्या प्रवेशद्वाराशी येवून पोचलो. पण त्या दिवशी सोमवार असल्याने केदारला आत येण्याची परवानगी मिळाली नाही. (ह्याची कल्पना आम्हाला होतीच पण किमान मी कुठे राहते हे तरी बघता येईल म्हणून तो माझ्याबरोबर आला होता). त्याचे परतीचे विमान २ वाजता होते. आम्ही सिक्युरिटी गार्डला विनंती करून पाहिली थोडा वेळ आत येऊ देण्यासाठी. पण त्याने त्याचे कर्तव्य चोख बजावले आणि आम्हाला गोड शब्दात परवानगी नाकारली.त्याने केदार बाहेर रिसेप्शनमध्ये बसू शकतो असे सांगितले. मग त्याला तिथे बसायला सांगून मी आत गेले. रूमवर जाऊन फ्रेश होऊन लगेचच कॅफेटेरिआत गेले. तिथून एका डब्यामध्ये इडली सांबार घेतले, चहा घेतला व पुन्हा केदार होता त्या ठिकाणी गेले. आम्ही तिथेच बसून नाश्ता केला व चहा घेतला. त्या वेळी आम्ही दोघे खूप दुःखी झालो होतो कारण आता पुन्हा आम्हाला एकमेकाला सोडून जायचे होते. मला तर वाटत होते की असेच केदारबरोबर पुन्हा पुण्याला परत जावे. पण त्याने माझी समजूत काढली आणि मला रूमवर जायला सांगितले. कारण मला प्रशिक्षणासाठी जायचे होते. तो तिथेच रिसेप्शनमध्ये बसून ११. ३० च्या बसने परत जाणार होता. पण माझा काही पाय निघेचना. शेवटी कसातरी मी त्याचा निरोप घेतला.... मनाला समजावत की आता २० च दिवसांनी दिवाळीला जायचेच आहे पुण्याला.....