माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-८

एके दिवशी रात्री मी नाओला सांगितले की मी दुसऱ्या खोलीत शिफ्ट होत आहे. पण आपली मैत्री तशीच चालू ठेवण्याची माझी इच्छा आहे. आपल्यातले मतभेद आपण विसरून जाऊ. तीसुद्धा हो म्हणाली. मग मी माझ्या त्या स्त्री सहकाऱ्याला (तिला आपण क म्हणूया) सांगायला गेले की तू म्हटल्याप्रमाणे मी आजपासून तुझ्या खोलीत शिफ्ट होत आहे. मला वाटले होते की क हसून माझे स्वागत करेल. पण कसनुसे हसत ती हो म्हणाली. माझ्या डोक्यात मग विचार घोळू लागला की हिने अशी प्रतिक्रिया का दिली? पण तो दूर सारून मी माझे सर्व सामान तिच्या खोलीत नेऊन ठेवले. ती एकटीच राहत असल्यामुळे तिचे दोन्ही बाजुंना सामान ठेवलेले होते. ती मला म्हणाली की मी उद्या सकाळी तुला तुझ्या बाजूची कपाटे मोकळी करून देते. मी म्हटले, 'ठीक आहे'. तेव्हा रात्र झाली होती व ती लॅबमध्ये अभ्यासाला जाणार होती.  त्याप्रमाणे ती गेली व त्या नव्या खोलीत मी एकटीच झोपले. मला मुळीच झोप लागली नाही कारण क चे वागणे मला बरोबर वाटत नव्हते.क कधीतरी पहाटे ४ वाजता परत आली.

 तुम्ही जर खोली बदलली तर तसे स्वागत कक्षात सांगणे आवश्यक असे. तर ते मी त्या दिवशी सकाळी सांगणार होते. पण क मला म्हणू लागली की तू इतक्यात सांगू नकोस. ३-४ दिवसांनी सांग. मला कळेचना की ही अशी का म्हणत आहे? मग मला असेही म्हणू लागली की मी रात्री बऱ्याचदा वाचत वगैरे बसते त्याचा तुला त्रास तर नाही ना होणार? मी म्हटले नाही होणार. कारण दोन्ही बाजूंना वेगवेगळे दिवे आहेत. त्यामुळे मी माझ्या बाजूचा दिवा बंद करून झोपू शकेन. क चे वागणे खूपच विचित्र असे होते. खरेतर तिनेच आमच्या इतर सहकाऱ्यांना जाऊन सांगितले होते आनंदाने की आता ही माझ्याबरोबर राहणार आहे. एवढेच नाही तर तिने मला माझे सामान माझ्या खोलीत नेऊन ठेवायला मदतही केली होती. कधी ती मला म्हणे की बरे झाले आता तू आली आहेस. मला आता कंटाळा येणार नाही. पण त्यानंतर थोड्याच वेळात ती म्हणत असे की तू पूर्ण विचार केला आहेस ना माझ्या खोलीत शिफ्ट होण्याआधी?  तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना?  शेवटी मला शंका आली व मीच तिला विचारले की तुला नाही ना काही प्रॉब्लेम माझ्या इथे येण्याने? तर तिने थोडा वेळ विचार केला व म्हणाली की नाही काही प्रॉब्लेम नाही. तेवढ्यात मला केदारचा फोन आला. मी बराच वेळ त्याच्याशी बोलत बसले. त्यालाही क चे विचित्र वागणे सांगितले. तो मला म्हणाला की आता काहीही झाले तरी तू क च्या खोलीतून हलू नकोस. मी त्याच्याशी फोनवर बोलत असतानाच क ने मला खुणेने सांगितले की 'मला तुझ्याशी बोलायचेय.' तेव्हाच मी समजून चुकले होते की ही मला काय सांगणार. आणि माझा अंदाज खरा ठरला. फोन ठेवल्यावर क मला म्हणाली, 'सॉरी. पण तू नको शिफ्ट होऊ माझ्या खोलीत.' माझ्या पायाखालची जमीनच सरकली......

मी क ला म्हणाले की मग तू मला म्हणालीसच का की तू कोणत्याही क्षणी माझ्या खोलीत येऊ शकतेस. आणि मग असेच होते तर मी काल तुला सांगायला आले तेव्हाच नाही म्हणायचेस..... पण ह्यावर तिच्याकडे काहीही उत्तर नव्हते. ती उगीचच सारवासारव करू लागली. तिच्या बोलण्यात काहीच तथ्य नव्हते. शेवटी मी 'ह्या विचित्र बाईबरोबर राहण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करून माझ्या आधीच्या खोलीत शिफ्ट झाले. ' अशा तऱ्हेने आदल्या दिवशी रात्री गेलेली मी पुन्हा दुसऱ्या दिवशी दुपारी माझ्या आधीच्या खोलीत आले. आत्ता लिहिताना सोपे वाटत असले तरीही तेव्हा माझ्या मनाची काय अवस्था झाली होती हे सांगण्यासाठी मला शब्द अपुरे पडतील.

माझी इतकी विचित्र अवस्था झाली होती की मला काहीही सुचत नव्हते. नाओचे आणि माझे बोलणे पण पहिल्यासारखे होत नव्हते. आणि क शी तर आता मी बोलणेच शक्य नव्हते. तेवढ्यात केदारचा चौकशी करण्यासाठी पुन्हा फोन आला आणि माझा बांध फ़ुटला.