माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-१०

अशा तऱ्हेने मी उत्साहात २००८ सालाचा पहिला दिवस सुरू केला.

 इथे येऊन ३ महिने पूर्ण झालेले होते आणि तरीही प्रशिक्षण काही संपण्याचे नाव घेत नव्हते. आधीच्या प्लॅनप्रमाणे ते जानेवारी च्या शेवटी संपणे अपेक्षित होते पण तसे होण्याची कोणतीही लक्षणे नव्हती. साधारण फेब्रुवारीचा मध्य तरी उजाडेल असे वाटत होते. पण काही इलाज नव्हता. प्रशिक्षण संपल्याशिवाय काही जाता येणार नव्हते.

डिसेंबर महिन्यात इकडे पुण्याला आम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट घडली होती. आमच्या नवीन फ्लॅटचा ताबा मिळाला होता. पण मी पुण्यात नसल्यामुळे केदार तिथे रहायला जाऊ शकत नव्हता. त्यामुळे आम्हाला प्रशिक्षण कधी संपते असे झाले होते. ५-६ जानेवारीच्या वीकेंडला मी पुण्याला जाऊन आमचे स्वतःचे नवे घर बघून आले. (आधी अनेक वेळा पाहिलेले होतेच पण सर्व काम पूर्ण झाल्यावर व ताबा मिळाल्यावर बघण्यात एक वेगळाच आनंद होता). मग आमचे १९ जानेवारीला घराचा गृहप्रवेश करून घेण्याचे ठरले. म्हणून मी पुन्हा त्या वीकेंड ला पुण्याला गेले. गृहप्रवेश छान झाला. तेव्हा माझी पहिली संक्रांत असल्याने माझे संक्रांतीचे हळदीकुंकूही करायचे होते. पण वेळेअभावी ते जमले नाही. ह्याची आम्हाला सर्वांनाच रुखरुख लागली. २१ ला सकाळी नेहेमीप्रमाणे मी हैदराबादला परत आले. त्या दिवशी प्रशिक्षणास गेल्यावर एक आनंदाची बातमी कळली. आम्हाला काही कारणाने २५,२६,२७ जानेवारी अशी जोडून सुटी मिळणार होती. ही बातमी ऐकून सर्व मित्र-मैत्रिणिंनी भराभर आपापल्या घरी जाण्याचे बेत ठरवले. मी नुकतीच घरी जाऊन आलेली असल्याने मला काय करावे कळत नव्हते. पण विचार करून मीही पुन्हा पुण्याला जायचे ठरवले. कारण ३ दिवस करण्यासारखे काहीच नव्हते. मग पुन्हा एकदा २४ जानेवारीस मी पुण्याला जायला निघाले. मला सुटी मिळत आहे म्हटल्यावर आम्ही लगेचच माझा हळदीकुंकवाचा कार्यक्रम २५ तारखेला ठरवला. २६ ला माझ्या पुतणीचे बोरन्हाण पण होते. असे दोन्ही दिवस माझे मजेत गेले. २७ ला थोडेफार फिरून आणि आईकडे वगैरे जाऊन मी पुन्हा हैदराबादच्या गाडीत बसले. आता ह्या गोष्टीची मला सवय झाली होती. खरेच ह्या प्रशिक्षणाने मला खूप काही शिकवले होते.

 २८ ला सकाळी मी डॉर्मिटरीवर पोचले. आमचे हे ठिकाण गावापासून खूप लांब असल्याने बसमधून उतरून डॉर्मिटरीवर पोचणे हेही एक मोठे दिव्य असे. कंपनीची बस सकाळी ८ वाजता असे. पण पुण्याहून येणाऱ्या बसला उशीर झाला तर ही बस चुकत असे. माझ्या दुर्दैवाने मला ही बस कधीच मिळाली नाही. पुढची बस १२ वाजता असल्याने रिक्षा किंवा सिटी बस हे दोनच पर्याय उरत असत. पण सिटी बससुद्धा आमच्या कंपनीपर्यंत नव्हती. त्याच्या बरेच अंतर अलीकडेच त्याचा शेवटचा थांबा होता. तिथून पुढे चालत किंवा शेअर रिक्षाने जावे लागे. म्हणून मी थेट रिक्षानेच जात असे. पण तसे जातानाही नेहेमीच मनात एक धाकधूक राहत असे. कारण गावातून कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याचा बराचसा भाग हा अगदी निर्जन नसला तरी कमी लोकवस्तीचा होता. म्हणून मला नेहेमीच पुणे हैदराबाद ह्या १०-११ तासांच्या प्रवासापेक्षा हा रिक्षाचा प्रवासच अधिक कंटाळवाणा व तणावपूर्ण वाटत असे. पण माझ्या सुदैवाने मला सर्व रिक्षावाले चांगले भेटले. फक्त ते पैसे जास्त मागत असत. कारण एक तर हे ठिकाण बरेच लांब होते आणि कंपनी खूपच नावजलेली असल्याने तिचे कर्मचारी एवढे पैसे नक्कीच देऊ शकतील असा ठाम विश्वास त्यांना असे. :-)

ही माझी पुण्याहून हैदराबादला येण्याची शेवटची वेळ होती. कारण ह्यानंतर ८ फेब्रुवारीला आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला केदारच हैदराबादला येणार होता आणि त्यानंतर मी प्रशिक्षण संपवून, चंबू गबाळे आवरूनच पुण्याला जाणार होते. पुन्हा कधीही न येण्यासाठी. :-)

(क्रमश:)