माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-२

त्या दिवशी रविवार असल्याने कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर लोकांनाही कंपनी कँपसमध्ये प्रवेश करण्याची परवानगी होती. मग बाबा व काका माझ्याबरोबर विजिटर्स पास काढून आत आले. आत थोडे अंतर पुढे गेल्यावर डॉर्मिटरीचा स्वागत कक्ष होता. तिथे मी माझे नाव व डिपार्टमेंट सांगून रूम बुकिंग आहे असे सांगितले. रिसेप्शनिस्टने थोडा वेळ शोधून अशा नावाचे कुठलेच बुकिंग नाही असे उत्तर दिले. माझ्या पोटात गोळाच आला. पण तरीही धीर एकवटून मी 'असे होणार नाही. आमच्या मॅनेजरने आमचे बुकिंग केलेले आहे' असे सांगत त्याला इमेल प्रिंट आउट दाखवली. (खबरदारी म्हणून ती मी नेलेली होतीच). मग त्याने पुन्हा नीट पाहिल्यावर त्याला एकदाचे माझे नाव दिसले. त्याआधी जपानहून माझे ६ सहकारी दाखल झालेले होते. ५ मुले व १ मुलगी होती. डॉर्मिटरीच्या खोल्या ह्या ट्वीन शेअरिंग पद्धतीच्या असल्याने जपानी मुलीच्या खोलीतिल जागा रिकामी होती. त्या रिसेप्शनिस्टने मला 'तू नाओ बरोबर रहाशिल का? ' असे विचारले. मी क्षणभर विचारात पडले पण जपानी मुलीबरोबर राहण्याचा एक वेगळा अनुभव येईल आणि आपले जपानी पण सुधारेल ह्या विचाराने लगेचच हो म्हणून टाकले.

त्या वेळी नाओ बाहेर गेली होती. रिसेप्शनिस्टने आम्हाला सांगितले की खोलीच्या २ किल्ल्या असतात. त्यातील १ कायम साफसफाई करणाऱ्या लोकांजवळ असते व दुसरी रूम पार्टनर्सनी शेअर करायची असते. आणि बाहेर जाताना ती स्वागत कक्षात ठेवून जायची असते. पण नाओ किल्ली घेवून बाहेर गेली होती. त्यामुळे रिसेप्शनिस्टने आम्हाला दुसऱ्या किल्लीने खोली उघडून देण्याची सोय केली. मला पुन्हा टेंशन आले की ही मुलगी जर नेहेमीच अशी वागत राहिली तर माझी पंचाइतच होईल. पण तो विचार दूर सारून मी खोलीत प्रवेश केला. सर्व सामान तिथे टाकले आणि आम्ही चहा प्यायला गेलो. बाबा व काकांना परत जाण्यासाठी ५. ३० ची बस होती. ही बस कंपनीची होती पण त्यातून नातेवाइकांनाही प्रवास करण्याची परवानगी असे. तेव्हा ४ च वाजले असल्याने आमच्याकडे बराच वेळ होता. मग आम्ही कंपनीच्या कँपसला १ फेरफटका मारून आलो. तेव्हा माझ्या मनात खूप संमिश्र भावना होत्या. प्रशिक्षणाबद्दल उत्सुकता तर होतीच पण आता १-१. ५ तासातच बाबा-काका परत जातील आणि त्यानंतर आपल्याला इथे एकटेच रहायचे आहे असे सारखे मी मनाला समजावत होते. कँपसमध्ये कुठे कुठे काय काय आहे हे आम्ही बघून ठेवले. शॉपिंग मार्ट, दवाखाना इत्यादी. मग पुन्हा खोलीवर येवून थोडा आराम केला आणि ५. १५ च्या सुमारास बस स्टॉपवर जाऊन थांबलो. थोड्याच वेळात बस आली. बसमध्ये चढताना बाबांच्याही डोळ्यात पाणी आले.... मुलीला एकटे सोडून जाताना....पण आम्ही मन घट्ट केले आणि एकमेकांचा निरोप घेतला. मग मी जड पावलांनी रूमवर येऊन बसले. त्याच्या थोडाच वेळ आधी नाओ बाहेरून परत आली होती. मी तिच्याशी ओळख करून घेतली आणि सांगितले की मी आजपसून तुझी रूम पार्टनर आहे. तिने माझे हसून स्वागत केले. आणि हळूहळू आम्ही एकमेकिंची माहिती करून घेत गप्पा मारायला सुरुवात केली. ह्या आधी जपानीच्या क्लासमध्ये ३-४ वेळा जपानी व्यक्तीशी बोलायची संधी मिळाली होती. पण एखाद्या जपानी व्यक्तीशी इतक्या  जवळून संवाद साधण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. म्हणून मनात जरा धाकधुक होतीच की ही कशी असेल, आपले जमेल का इत्यादी. मग तिने मला तिच्या जवळचे चॉकोलेट दिले. आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. त्या दिवशी माझ्या जवळ सासुबाईंनी दिलेल्या तिखट मिठाच्या पुऱ्या असल्याने मी जेवायला गेलेच नाही. म्हटले, उद्यापसून खायचेच आहे इथले.... आज तरी घरच्या जेवणाचा आस्वाद घ्यावा.

दुसऱ्या दिवशी ९ वाजता प्रशिक्षण सुरू होणार असल्याने जेवून लगेच झोपले. पण मला काही केल्या झोपच येइना. सारखे केदारच्या, घरच्यांच्या आठवणीने रडूच येऊ लागले.

(क्रमशः)