माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-१४

काही दिवस शिक्षक गैरहजर राहिल्याने व इतर काही कारणांमुळे आता प्रशिक्षण संपण्याची तारीख १० मार्चच्या पुढे गेली होती. आणि नक्की कोणत्या दिवशी संपेल हेही कोणी सांगत नव्हते. मी आता ह्या गोष्टीचा विचार करणे सोडून दिले होते. केदार मला आणायला येणार होता. त्यालाही तिकीट काढता येत नव्हते. कोणतेही बेत करता येत नव्हते.

मी मात्र हळूहळू सर्व सामान एकत्र करायला सुरुवात केली होती. एकीकडे परतण्याचे वेध लागले होते व दुसरीकडे प्रशिक्षणातील शेवटचे १० दिवस महत्त्वाचे होते. आत्तापर्यंत शिकलेली सर्व तंत्रे वापरून आम्हाला एक प्रकल्प पूर्ण करायचा होता. आणि त्यावर आमचे गुण ठरणार होते. आम्हाला गटांमध्ये काम करायचे होते. एकदाचे सर्व शिकवण्याचे विषय संपले आणि आम्ही प्रकल्पाच्या कामाला लागलो.  

प्रकल्पाचे १० दिवस कामात कसे संपले कळलेच नाही. आम्ही खूप कष्ट करून १०व्या दिवशी प्रकल्प पूर्ण केला. ११व्या दिवशी त्याचे गुणांकन होते. तो दिवस होता १२ मार्च २००८. आमचा प्रकल्प परीक्षकांना आवडला. आम्हा सर्वांची तोंडी परीक्षापण छान झाली व आम्ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. मला खूप आनंद झाला. केलेल्या कष्टांचे चीज झाले.

त्या दिवशी मी खूप आनंदात होते. कारण प्रशिक्षण संपले होते. आता फक्त निरोप समारंभ व्हायचा बाकी होता. माझी अशी कल्पना होती की आता १३ तारखेला निरोप समारंभ असेल. पण त्या दिवशी प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षांना वेळ नसल्यामुळे तो १४ तारखेस होईल असे सांगण्यात आले. मग मी केदारला कळविले की तू १५ तारखेच्या सकाळी ये. त्याप्रमाणे त्याने लगेचच तिकीट काढले. मला खरेतर निरोप समारंभात अजिबात रस नव्हता पण एक शिष्टाचार म्हणून त्याला उपस्थित राहणे आवश्यक होते. १४ तारखेला निरोप समारंभ झाला आणि प्रशिक्षण रीतसर संपले. मला खूप आनंद झाला होता. आता मला पुण्याला परतण्यापासून कोणीही अडवू शकत नव्हते.

शेवटच्या दिवशी तेथील मराठी, जपानी व इतर काही  मित्र-मैत्रिणिंचा निरोप घेण्यासाठी सर्वांना इमेल पाठवली. ती लिहिताना,  येथील ५.५ महिन्यांच्या वास्तव्यातील त्यांची निरपेक्ष  मैत्री आणि  त्यांनी  वेळोवेळी केलेली मदत आठवून डोळे भरून आले. मी सर्वांचे आभार मानले व  आम्ही  इथून पुढेही संपर्कात राहण्याचे ठरविले. त्या दिवशी आम्ही भरपूर छायाचित्रेही काढली. सर्वांना भेटून शेवटी जड पावलांनी खोलीवर आले. केदार दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ तारखेला सकाळी येणार होता आणि १५ लाच रात्री आम्ही पुण्यासाठी निघणार होतो. माझी थोडी सामानाची बांधाबांध करायची होती . ती केली व शांतपणे झोपून गेले. इतकी शांत झोप मला त्या ५.५ महिन्यांत कधीच लागली नव्हती.

दुसऱ्या दिवशी उठून केदारला आणायला गेले. तिथे नाष्टा करून आम्ही थोडी खरेदी केली. हैदराबादची सुतरफेणी, सांबार मसाला, कराची बिस्किटे इ.. मग डॉर्मिटरीवर आलो. एकदा शेवटची थोडी आवराआवर केली. केदार बरोबर सर्व कँपस फिरून आले. इतके दिवस त्या कँपसमध्ये फिरताना कधी एकदा इथून सुटका होतेय हा एकच विचार मनात येत असे. पण ह्या वेळी मात्र सर्व कँपस व तेथील सौंदर्य मनात साठवून घेत असताना आपण पुन्हा इथे लवकर येणार नाही किंवा कदाचित कधीच येणार नाही ह्या विचाराने मन भरून आले. डोळ्यात पाणी दाटले. उगीचच कॅफेटेरियाच्या इथे पावले घुटमळू लागली. पण शेवटी निघण्याची वेळ झाल्याने खोलीवर परतावे लागले.

सर्व सामानाची बांधाबांध करून आम्ही न्यायला येणाऱ्या गाडीची वाट बघत बसलो होतो. नाओ २ दिवसांपूर्वीच  तिच्या मित्राला भेटायला बंगळुरूला गेली होती. पण ती व तिचा मित्र १५ तारखेला सायंकाळी हैदराबादला परतणार असल्याने 'मी तुला निरोप द्यायला पुण्याच्या बस स्टँडवर येईन' असे तिने मला सांगून ठेवले होते.

ठरल्याप्रमाणे ४ वाजता आम्हाला घेऊन जाणारी गाडी आली. स्वागत कक्षातून तसा फोन आला. मग आम्ही सामान बाहेर नेऊन ठेवले. मी एकदा माझ्या खोलीत सभोवार नजर फिरवली. काही राहिले नाही ना ह्याची खात्री केली. माझा झोपण्याचा पलंग, अभ्यासाची टेबल खुर्ची, कपडे ठेवण्याचे कपाट, इतकेच नाही तर माझा पाणी पिण्याचा जगसुद्धा मला तिथे घालविलेल्या क्षणांची आठवण करून देत होता. प्रत्येकाशी माझ्या काही ना काही आठवणी निगडित होत्या. फार काळ डोळ्यात पाणी अडवून धरू न  शकल्याने मी अश्रूंना वाट करून दिली आणि  पुन्हा एकवार माझ्या  सर्व  सोबत्यांवर  हात  फ़िरवून शेवटी जड पावलांनी खोलीबाहेर पडले.

कुलूप लावून किल्ली स्वागत कक्षात दिली. आणि चेक-आउट रकान्याखाली १५ मार्च  २००८ ही तारीख टाकून सही केली. चेक-इन ची तारीख होती ३० सप्टेंबर २००७. बरोब्बर ५.५ महिन्यांचे तेथील वास्तव्य संपले होते. आनंद व दुःख अशा संमिश्र भावना घेऊन मी गाडीत बसले. चालकाने सर्व सामान गाडीत चढवले व गाडी सुरू झाली.

(क्रमशः)