माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-५

मग मी रूमवर येवून आवरून प्रशिक्षणासाठी गेले. नाओला मी आल्यामुळे आनंद झाला. मी नसताना ३ दिवस तिला कंटाळा आला होता. त्या दिवशी काही माझे लक्षच लागले नाही वर्गात. पण पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून रुटीन सुरू झाले.

प्रशिक्षणामध्ये आम्हाला पहिला १ महिना ओरिएंटेशन होते. संगणकाची माहिती आणि  'सी' भाषा इत्यादीची ओळख. मी अभियांत्रिकीला असताना हे शिकले असल्याने मला आधीच ते येत होते. नाओ हे पहिल्यांदाच शिकत होती. त्यामुळे ती मला खूप वेळा शंका विचारत असे. मी त्याचे माझ्या परीने निरसन करत असे.

ह्या वेळेला पुण्याहून येताना मी लॅपटॉप घेवून आले होते. त्यामुळे मला आता त्यावर सराव करता येत होता. तसेच त्यावर मी गाणी ऐकणे, चित्रपट बघणे आदी गोष्टीही करत असे. त्यामुळे थोडी करमणूक होत असे. नाओकडेही तिचा लॅपटॉप होता. बऱ्याचदा आम्ही एकत्रही चित्रपट बघत असू. आम्ही हिंदी चित्रपटही पाहिले. डी.वी.डी. वर येणाऱ्या इंग्रजी भाषांतरामुळे नाओला हिंदी समजण्यात अडचण येत नसे.

मी रोज रात्री घरच्यांना फोन करते ह्याचे नाओला खूप आश्चर्य वाटे. ती मला विचारे, 'तू रोज घरच्यांशी काय बोलतेस फोनवर? '. मी म्हणे, 'दिवसभर काय केले हे सांगते. तेही चौकशी करतात माझी.सर्व ठीक आहे ना' इत्यादी. ह्यावर तिचे असे म्हणणे असे की 'इथे कंपनी कँपसमध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत. आपल्याकडे पैसे आहेत. आपल्याला खाणे पिणे व्यवस्थित मिळत आहे. मग घरच्यांना काळजी वाटायचे कारणच काय आहे? ' इथे मला त्यांच्या व आपल्या संस्कृतीतला फरक जाणवत असे. ती तिच्या घरच्यांना जपानला महिन्यातून एकदा फोन करत असे. आणि घरचे जर कामात व्यस्त असतिल तर त्यांना तसदी दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असे.

तिचे आई वडिल तिला जपानहून काही खाद्यपदार्थ पाठवत असत. मी शाकाहारी असल्याने ती मला त्यातले शाकाहारी पदार्थ शोधून आवर्जून देत असे. मीही तिला कधी माझ्याकडचे आईने दिलेले लाडू व इतर खाऊ देत असे. तिला आपल्याकडचे बाकरवडी, शेव, कच्छी दाबेली हे पदार्थ खूप आवडत असत.

नाओ धूम्रपान व मद्यपान करत असे. जपानमध्ये हे खूप नॉर्मल मानले जाते. तिने मला पहिल्या दिवशीच हे सांगितले होते. आणि त्याचबरोबर त्याचा तुला काही त्रास होणार नाही ह्याची मी खबरदारी घेईन हेही सांगितले होते. हे ऐकून पहिल्यांदा मी जरा घाबरले होते. पण म्हटल्याप्रमाणे तिच्या ह्या सवयीचा तिने मला कधीही त्रास होवू दिला नाही. तिने मला एकदा विचारले की तू का नाही बिअर पीत? मी म्हणाले, भारतात ते चांगले समजले जात नाही. शिवाय ते तब्येतीलाही हानीकारक असते. तर तिने मला सांगितले की जपानमध्ये हे तब्येतीसाठी चांगले मानले जाते.ती जपानी पद्धतीप्रमाणे रात्री आंघोळ करत असे. भारतीय लोक सकाळी आंघोळ करतात हयाचेही तिला आश्चर्य वाटे.

असा आम्हा दोघींमध्ये सांस्कृतिक फरक बराच असूनही त्याचा आमच्या मैत्रीवर कोणताही परिणाम झाला नाही.

असे करता करता १ महिना झाला. नोव्हेंबर महिना सुरू झाला व दिवाळीसाठी मी पुण्याला जाण्याची तयारी केली. पहिल्यांदा सुटी मिळणार की नाही ह्याची शंका होती. पण सुदैवाने ती मिळाली आणि मी दिवाळीसाठी पुण्याला जाऊ शकले.

(क्रमशः)