माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-३

  पुण्याहून येताना मी 'मृत्युंजय' पुस्तक घेऊन आले होते. मग मी ते वाचायला घेतले. (आधी एकदा वाचलेले होतेच). मग जरा वेळ बरा गेला. आणि मग कधीतरी झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता आवरून ट्रेनिंग रूममध्ये जाऊन बसलो. बरोबर नाओ होतीच. त्याच दिवशी सकाळी माझे पुण्याचे सहकारी तसेच चेन्नईचे १ सहकारीही आलेले होते. मग हळूहळू ५ जपानी व १ चेन्नईचे सहकारी ह्यांच्याशी ओळख करून घेतली. पुण्याच्या सहकाऱ्यांशी एकत्र काम केल्यामुळे माझी आधीच ओळख होती.

पहिल्या दिवशी फारसे काही शिकवले नाही. फक्त इथून पुढचे वेळापत्रक कसे असेल हे सांगण्यात आले, शिक्षकांशी ओळख झाली आणि आम्हाला लवकर सोडून देण्यात आले. मी पुण्यात असताना जर कधी ऑफीसमधून लवकर घरी जाता आले किंवा कॉलेजमध्ये असताना कधी कॉलेज लवकर सोडले तर मला खूप आनंद होत असे. कारण घरच्यांबरोबर वेळ घालवता येत असे किंवा बाहेर फिरायला जाता येत असे. पण इथे असे लवकर सोडल्यावर मला मुळीच आनंद झाला नाही. कारण एक तर मला प्रशिक्षण लवकर संपवून पुण्याला परतण्याची घाई होती. आणि लवकर सोडले म्हणजे प्रशिक्षणाचा तेवढा वेळ वाया. म्हणजेच तेवढे ते पुढे जाणार. दुसरे म्हणजे हे ठिकाण खूपच गावाबाहेर असे होते. गावात जायला यायला कंपनीच्या फक्त  ठराविक वेळेला बसेस होत्या. तसेच जवळपास विरंगुळ्याचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. त्यामुळे आता रात्रीपर्यंत काय करायचे असा प्रश्न माझ्यापुढे आ वासून उभा राहिला.

शेवटी मी व माझ्या २ सहकाऱ्यांनी बसने गावात जायचे ठरविले. हैदराबादचे लोकल सिम कार्ड घ्यायचे होते. म्हणून आम्ही ६. ४५ च्या बसने गावात गेलो. गावात बसमधून उतरताना आम्ही बसचालकास विचारले असता त्याने परतायला ९ वाजता बस आहे असे सांगितले. तेव्हा ७. ४५ वाजले होते. आम्ही विचार केला कि १. १५ तासात आपले काम आरामात होईल व ९ च्या बसने आपण परतू शकू. मग आम्ही सिम कार्ड घेणे व इतर खरेदी उरकली, थोडा फेरफटका मारला व ८. ४५ लाच बस स्टॉपवर येवून उभे राहिलो. अर्धा तास झाला तरी बसचा पत्ताच नाही....मला खूप भीती वाटू लागली... आता बस आलीच नाही तर कसे जायचे?....मी मनाची तयारी केली की बस आलीच नाही तर काकाच्या घरी जायचे.... तेही काही जवळ नव्हते. पण सुरक्षित होते. बाबा अजूनही काकाकडेच होते त्यामुळे तशीच वेळ आली असती तर ते दोघे आलेच असते मला न्यायला. पण सुदैवाने तशी वेळ आली नाही. डॉर्मिटरी रिसेप्शनला फोन केल्यावर असे कळले की १०. १५ ला बस आहे. बाबा व केदार सारखे काळजीने फोन करत होते. शेवटी एकदाची १०. १५ ची बस आली आणि ११. ०० वाजता आम्ही डॉर्मिटरीवर पोचलो. त्यानंतर कानाला खडा लावला की बसच्या वेळा व्यवस्थित माहीत असल्याशिवाय बाहेर पडायचे नाही. खरेतर डॉर्मिटरी स्वागत कक्षात बस वेळापत्रक लिहून ठेवले होते पण आम्हीच ते पाहिले नव्हते. मग मी लगेचच दुसऱ्या दिवशी ते माझ्याकडे लिहून घेतले.

अशा तऱ्हेने हळूहळू माझे रुटीन सुरू झाले. मी केदारला रोज रात्री फोन करत असे आणि आम्ही कमीत कमी १ तास बोलत असू. ९ ते ६ प्रशिक्षण असे. त्यानंतर थोडा अभ्यास, मग ८. ३० लाच जेवण करून फोनवर बोलून झोपणे असा साधारण दिनक्रम होता. कारण बाकी करण्यासारखे काही नसायचेच. डॉर्मिटरी मध्ये टी. व्ही. होता पण तो पहिले काही दिवस बंदच होता. नंतर माझ्या काही सहकऱ्यांनी खटपट करून तो सुरू करून घेतला. कधी झोपण्याआधी मी मृत्युंजय वाचत असे, कधी मी व नाओ गप्पा मारत असू, कधी मी डायरी लिहीत असे. केदारशी फोनवर बोलणे हा माझा दिवसातला सगळ्यात मोठा आनंद असे. आम्ही दोघे त्याच क्षणाची वाट पाहत दिवस घालवत असू. पहिले काही दिवस घरच्या आठवणीने रडूच येत असे. मग हळूहळू त्या वातावरणाची सवय झाली आणि मी तिथे रुळले.

नाओपण चांगली होती. साधारण माझ्याच वयाची होती.तिची व माझी दोस्ती व्हायला वेळ लागला नाही. ती माझ्याशी इंग्रजीतून व मी तिच्याशी जपानीतून बोलत असे. तिला तिचे इंग्रजी व मला माझे जपानी सुधारायचे होते. त्यामुळे आम्हाला ही सुवर्णसंधीच होती. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचे आम्ही ठरविले. माझे लग्न झाले आहे हे जेव्हा मी तिला सांगितले तेव्हा तिला खूप आश्चर्य वाटले. त्या मानाने मी खूप लहान दिसते असे तिचे म्हणणे होते. तिने उत्सुकतेने आपल्याकडच्या 'ऍरेंज मॅरेज' पद्धतीबद्दल जाणून घेतले. आई वडील आपल्या मुला/मुलीसाठी जोडीदार शोधतात ह्याचे तिला खूप कौतुक वाटे. त्याचबरोबर जपानमध्ये अशी पद्धत अस्तित्वात नाही ह्याचे वाइटही.

असे १५ दिवस गेले. १९ ऑक्टोबरला दसरा होता आणि १९, २०, २१ असा लाँग वीकेंड सुट्टी आहे असे आम्हाला कळले. मग लगेचच मी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. तिकीट काढून आणले आणि निघण्याच्या दिवसाची वाट पाहू लागले. कारंण तो माझा लग्नानंतरचा पहिला दसरा होता.