माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-१३

ही २ नवीन तंत्रे अत्ताच अस्तित्वात यायला हवी होती का असे मला राहून राहून वाटले. पण मी काहीही करू शकत नव्हते.माझे अवसान अक्षरशः गळाले होते. घरचेही आता कंटाळले होते. माझे प्रशिक्षण कधी संपतेय ह्याची सगळे चातकासारखी वाट पाहत होते. सध्याची प्रशिक्षण संपण्याची तारीख ६ मार्च होती. मी इतकी वैतागले होते की सरळ नोकरी सोडून निघून जावे इथून असेच वाटू लागले होते. पण मला घरच्यांनी समजावले की इतके दिवस काढले आहेस तर आता अजून थोडे दिवस कळ काढ. मलाही ते कळत नव्हते असे नाही पण मला कंटाळा आला होता एवढे खरे.

पुन्हा सारे अवसान गोळा करून मी ६ मार्चची वाट पाहू लागले. एकीकडे अभ्यासही चालू होताच. आता नाओची अन माझी पुन्हा पहिल्यासारखी मैत्री झाल्याने तो ताण मनावर नव्हता.

नाओ प्रशिक्षण संपल्यावर जपानला परत जाणार होती. तिला तिच्या आई व बहिणीसाठी मोत्याचे दागिने घ्यायचे होते. (हैदराबादमधील मोती प्रसिद्ध आहेत हे सर्वश्रुत आहेच). तिने मला तिच्याबरोबर येण्याची मैत्रीपूर्ण विनंती केली. मलाही माझ्या नातेवाइकांसाठी खरेदी करायची होतीच. त्यामुळे एके रविवारी आम्ही सकाळीच बाहेर पडलो.

अमीरपेठ येथील एका प्रसिद्ध दुकानात गेलो. सर्वजण नाओकडे आश्चर्याने बघत होते. आम्हाला दागिने दाखवणाऱ्या स्त्रीने मला विचारले की ही नेपाळी आहे का? मी म्हटले नाही ती जपानी आहे. मी नाओ व त्या स्त्री मधील दुभाषाचे काम करत होते. नाओ ने व मी बरीच खरेदी केली. त्या स्त्रीला नाओबद्दल फारच कुतूहल वाटत होते. ती मला नाओबद्दल विविध प्रश्न विचारत होती. 'तिचे लग्न झाले आहे का' ह्या तिच्या प्रश्नाला मी 'नाही' असे उत्तर देताच तिच्या चेहेऱ्यावर 'आता करायला हवे लग्न! ' ह्या अर्थाचे भाव मला दिसले.

आमच्या कंपनीचे आय-कार्ड दाखविल्यावर आम्हाला ५०% सूट मिळत असे. ती व घासाघीस करून अजून थोडी सूट मिळवून आम्ही बरीच स्वस्तात खरेदी उरकून दुकनाबाहेर पडलो. केवळ माझ्यामुळेच एवढी स्वस्तात खरेदी शक्य झाली म्हणून नाओ माझे सारखे आभार मानत होती. (भाषेच्या अडचणीमुळे तिला एकटीला ते शक्य झाले नसते असे तिला वाटले).

आम्ही खरेदी करून मजेत डॉर्मिटरीवर परत आलो. नाओने इतकी खरेदी केली होती की आल्यावर तिने आणलेले सर्व दगिने एकत्र मांडले तर तेच एक मोत्यांचे दुकान आहे असे वाटत होते.  मग आम्ही त्याची खूप छायाचित्रेही काढली. मी एक कानातले नाओसाठीही घेतले होते. तिच्या नकळत तिच्या पसंतीनेच घेतले होते. मग लगेचच ते मी तिला भेट दिले. माझी एक आठवण म्हणून. तिला खूपच आनंद झाला. तिने लगेचच ते घालून पाहिले. आणि त्या बॉक्सवर माझे नाव घालून(माझ्याकडून मिळालेली भेट ह्या अर्थी) आपल्या बॅगमध्ये ठेवून दिले.

(क्रमशः)