माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-७

केदार गेल्यावर मी कंपनीच्या बसने पुन्हा डॉर्मिटरीवर आले. मला काहीच सुचत नव्हते. आता जानेवारीत पुण्याला जायचे असा विचार करत करत झोपी गेले.दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा रुटीन सुरू झाले. केदारचा पुण्याला पोचल्याचा फोन आला.

काही दिवसांपूर्वीच माझी डॉर्मिटरीमधल्या काही मराठी मुलींशी ओळख झाली होती. त्या वेगळ्या डिपार्टमेंटतर्फे प्रशिक्षणासाठी आल्या होत्या. साधारण माझ्याच वयाच्या असल्यामुळे माझी त्यांच्याशी गट्टी जमली. त्यातील एक मुलगी एकदा माझ्या खोलीत गप्पा मारण्यासाठी आली आणि माझ्या हैदराबादमधील सर्वात वाईट आठवड्याला सुरुवात झाली. 

ती आल्यावर मी तिची आणि नाओची ओळख करून दिली व आम्ही दोघी माझ्या बाजुस असलेल्या पलंगावर बसून गप्पा मारू लागलो. नाओ तेव्हा तिच्या लॅपटॉपवर चित्रपट बघत होती व तिने कानाला हेडफोन लावलेले होते. आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो..... रात्रीचे १२ कधी वाजले कळलेच नाही. मग माझी मैत्रिण तिच्या खोलीत निघून गेली. मीही झोपले. दुसऱ्या दिवशी उठल्यावर नाओ मला म्हणाली की 'तू तुझ्या मराठी मैत्रिणिंना इथे आणत जाऊ नकोस. मला तुमच्या गप्पांचा त्रास होतो. ' मला खूप वाईट वाटले कारण ३ महिन्यात पहिल्यांदा मी असे कोणालातरी रुमवर आणले होते. आणि ही खोली माझीही होतीच. त्यामुळे माझा तेवढा हक्क नक्कीच होता.  आणि नाओने कानाला हेडफोन लावल्याने तिला त्रास होण्याचे काहीच कारण नव्हते. आणि झालाच असेल तरी लगेच बोलायची काहीच गरज नव्हती असे मला वाटले. मी तिला तसे सांगितले. शिवाय बरेचदा ती आमच्याबरोबरच्या इतर जपानी पुरुष सहकाऱ्यांना अभ्यासाच्या काही शंका विचारण्यासाठी खोलीत बोलावत असे हे मलाही आवडत नाही हेही मी तिच्या लक्षात आणून दिले.त्यावरून आमचा थोडा वाद झाला. मी खूपच अस्वस्थ झाले. आमची चांगली मैत्री तुटू नये असे मला वाटत होते. पण माझ्या मराठी मैत्रिणी कधी ना कधी माझ्या खोलीत येणार हेही खरे होते. काय करावे कळत नव्हते. त्यातच ही गोष्ट आमच्या एका स्त्री सहकाऱ्याच्या कानी गेली. ती तिच्या खोलीत एकटीच राहत असे. ती मला म्हणाली, ' काही अडचण असेल तर कोणत्याही क्षणी तू माझ्या खोलीत शिफ्ट होऊ शकतेस'. म्हणून मग मी तिच्या खोलीत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. पण तो किती चुकीचा होता हे मला नंतर कळले....