माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-९

त्याला साधारण कल्पना आली होती की काय घडले असेल म्हणूनच त्याने फोन केला होता. मी त्याला रडत रडतच सारी हकीकत सांगितली. त्यालाही खूप वाईट वाटले. माझ्या मनाची तर इतकी वाईट अवस्था झाली होती की मी त्याला म्हणाले की मी प्रशिक्षण सोडून पुण्याला येते. नोकरी गेली तरी चालेल पण मला इथे रहायचे नाही. मला तिथे खूपच असुरक्षित वाटू लागले होते. पण केदारने मला समजावले व तो अमेरिकेत असताना त्यालाही अशाच प्रकारचे अनुभव आल्याचे व त्याने त्यावर मात करून एम. एस. पूर्ण करूनच आल्याचे सांगितले. त्याच्याशी बोलून माझे मन जरा शांत झाले.

त्या दिवशी मग मी आवरून प्रशिक्षणासाठी गेले खरी पण अजिबातच माझे लक्ष लागले नाही. असाच १ आठवडा गेला. नाओ व मी कामापुरतेच बोलत होतो. त्यात आधीसारखे मैत्रीचे संवाद नव्हते. आणि त्याचाच मला खूप मानसिक त्रास होत होता. मी हळूहळू तिच्याशी नेहेमीसारखेच बोलण्याचा प्रयत्न करत होते. तीही करत असावी. पण म्हणतात ना की तोडणे फार सोपे असते पण जोडणे तितकेच अवघड. तसेच आमचे झाले होते. मैत्री तोडायची इच्छा मलाही नव्हती आणि तिलाही. पण वेळ तर लागणारच होता. क शी तर मी मुळीच बोलत नव्हते. तिचे वागणे मी इतक्या लवकर विसरणे शक्य नव्हते. ती मात्र मी दिसेन तेव्हा मला येऊन सॉरी म्हणत असे व बोलण्याचा प्रयत्न करत असे. अशातच ३१ डिसेंबर उजाडला. कंपनीने न्यू इयर पार्टी आयोजित केली होती. मी काही सहकाऱ्यांसमवेत तिथे गेले. नाओ तिच्या मित्राबरोबर बाहेर दारू पिण्यासाठी गेली होती. आम्ही पार्टीहून परत आलो तेव्हा १२ वाजण्यास १५-२० मिनिटे होती. आमच्या ग्रुपचे असे ठरले की डॉर्मिटरीच्या गच्चीवर जाऊन बरोबर १२ वाजता नवीन वर्षाचे स्वागत करायचे. त्यासाठी म्हणून मी निघणार तेवढ्यात नाओ बाहेरून परत आली. मी उत्साहाच्या व आनंदाच्या भरात तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तिनेही त्याचा हसून स्वीकार करून मलाही शुभेच्छा दिल्या. खूप दिवसांनी आम्ही एकमेकींकडे बघून हसलो होतो. ही आमची मैत्री पूर्ववत होण्याची पहिली पायरी होती.

मग मी तिला सांगितले की सर्व जण गच्चीत जमणार आहेत व तिलाही यायला सांगितले. तिने लगेचच होकार दिला आणि माझ्याबरोबर गच्चीत आली. बरोबर १२ वाजता आम्ही हॅपी न्यू इयर असे ओरडून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. छायाचित्रेही काढली. तिथे क ही होतीच. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सर्व झाले गेले विसरून जाऊ असा विचार करून मी क लाही माफ करून टाकले. अर्थात इथून पुढे आयुष्यात कधीच मी तिचे वागणे विसरू शकत नाही. पण किमान मी तिच्याशी मोजके का होईना पण बोलायला सुरवात केली. आता मला खूप बरे वाटू लागले होते. कारण आता माझे जगात कोणाशीही भांडण नव्हते व कोणाशी अबोलाही नव्हता. सरत्या वर्षाच्या शेवटच्या सूर्याबरोबरच आम्ही आमच्यातल्या गैरसमजांनाही निरोप दिला व मैत्रीच्या नव्या पहाटेचे स्वागत केले.