माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-११

जानेवारीत मी ३ वेळा पुण्याला जाऊन आले होते. पण मला मुळीच थकायला झाले नव्हते. उलट छानच वाटले.

मी हैदराबादला येवून स्थिरस्थावर झाले. पुन्हा प्रशिक्षण जोरात सुरू झाले. मी आता ८ फेब्रुवारीची वाट बघू लागले होते. कारण तेव्हा आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता व केदार हैदराबादला येणार होता. आधी आम्हाला वाटले होते की आम्ही आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस पुण्यात साजरा करू शकू. पण प्रशिक्षण लांबल्यामुळे ते होऊ शकले नाही. म्हणून आम्ही हैदराबादलाच साजरा करण्याचे ठरवले. मी नेहेमीप्रमाणे केदारसाठी खोली आरक्षित करून ठेवली.

८ तारखेला मी सकाळी ७.१५ च्या बसने केदारला आणायला गेले. मी तिथे पोचले तर तो आलेलाच होता. आम्हाला दोघांना एकमेकांना भेटून खूप आनंद झाला. मग आम्ही जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन नाष्टा केला. तिथून आम्ही माझ्या काकाकडे गेलो. त्याने आम्हाला ग्रीटिंग देऊन आमचे अभिनंदन केले. त्याने आमच्यासाठी शिरा केला होता. आम्ही थोडा थोडा खाल्ला. मग काकाकडून रामोजी फिल्म सिटीला कसे जायचे ह्याची माहिती घेतली. त्याने सांगितल्याप्रमाणे तेथून रिक्षा करून कोठीला गेलो. तिथे दिवसभरचा बसपास काढला. आणि रामोजीला जाणाऱ्या बसची वाट पाहत बसलो. थोड्याच वेळात बस आली व आम्हाला बसायला जागाही मिळाली. आम्ही खूपच मजेत होतो. प्रवास तसा लांबचा होता. १ ते १.५ तास. आम्ही मस्त गप्पा मारायला सुरुवात केली.

'रामोजी.... ' असे बसचा वाहक ओरडला तसे आम्ही बसमधून खाली उतरलो. रामोजी फिल्म सिटी खूपच भव्यदिव्य होती. आम्ही प्रवेशद्वाराजवळ तिकीटे काढली आणि आत प्रवेश केला. तिथून मुख्य ठिकाणापर्यंत जाण्यासाठी त्यांच्या बसेस होत्या. त्याची वाट बघत थांबलो. लगेचच बस आली. सर्व तिकीटधारकांना बसमध्ये प्रवेश दिला गेला. बस आम्हाला आतपर्यंत घेऊन गेली. आम्ही उतरलो. तोपर्यंत १ वगैरे वाजला होता. म्हणून आधी आम्ही जेवण करायचे ठरवले. तेथील एका रेस्टॉरंटमध्ये चायनीज जेवणाचा आस्वाद घेतला.

मग रामोजी बद्दल माहिती देणारी एक १५-२० मिनिटांची ध्वनीचित्रफीत होती. ती पाहिली. त्यानंतर मेरी गो राउंड सारख्या अनेक खेळांचा आस्वाद घेतला. मग तिथे विविध चित्रपटांचे चित्रीकरण होते त्या जागा दाखवणारी एक मिनी बस फेरी होती. त्यात बसलो. मग एक भूत महल म्हणून होते त्यात गेलो. पण फारशी भीती वाटली नाही. खूप छायाचित्रेही काढली. तिथे एक मीना बाजार का अशाच काहीशा नावाचा बाजारही होता. तिथे विविध खड्यांचे दागिने व इतर अनेक छान छान वस्तू होत्या. तिथेही एक फेरफटका मारून आलो. रामोजी फिल्म सिटी नीट बघायला खरेतर एक पूर्ण दिवस अपुराच पडतो. पण आम्ही दिवसभरात जास्तीत जास्त पाहण्याच प्रयत्न केला. खूपच मजा आली. ६ च्या बसने आम्हाला पुन्हा प्रवेशद्वाराजवळ आणून सोडले. तिथे लगेचच आम्हाला लकडी का पूल ला जाणारी बस मिळाली. आम्ही महिला वाहकाला लकडी का पूल आल्यावर सांगण्याची विनंती केली. तशी मला कल्पना होतीच पण तरी खबरदारी म्हणून आम्ही वाहकालाही सांगून ठेवले. तिने आम्हाला लकडी का पूल आल्यावर सांगितले. हैदराबादमध्ये सिटी बसेसची सोय खूपच छान आहे. विशेषतः पुण्याच्या लोकांना ते खूपच जाणवते.  

आम्ही लकडी का पूलला उतरून आनंद थिएटरला जाणाऱ्या बसची चौकशी केली. तेथून आम्हाला माझी कंपनीची बस घ्यायची होती. ती बस लगेचच आली. गर्दी होती पण थोड्या वेळाने बसायला जागा मिळाली. त्या बसने आनंद थिएटरला उतरलो. थोडी खरेदी केली. पॅरेडाइजला बिर्याणी खाल्ली. इथली हैदराबादी बिर्याणी खूपच प्रसिद्ध आहे. मग कंपनीच्या बसने डॉर्मिटरीवर आलो.

आमचा लग्नाचा पहिला वाढदिवस खूपच आनंदात साजरा झाला होता.....

(क्रमश:)