माझे हैदराबादमधिल प्रशिक्षण

१ ऑक्टोबर २००७ रोजी तुमचे प्रशिक्षण सुरू होत असल्यामुळे ३० सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत कंपनीच्या हैद्राबाद येथिल ऑफिसला पोचावे अशा आशयाची मॅनेजरची इमेल आली तेव्हा पोटात गोळाच आला. खरेतर मी ही कंपनी जॉइन केली तेव्हा मुलाखतीच्या वेळीच मला सांगण्यात आले होते की हैदराबाद येथे प्रशिक्षणासठी जावे लागेल. त्यामुळे मनाची तयारी केलेली होतीच. पण तरीही प्रत्यक्षात जेव्हा जाण्याची वेळ आली तेव्हा मात्र टेन्शन आले. इमेल वाचून मी केदारला, माझ्या नवऱ्याला फोन केला. ती सप्टेंबरची २० तारीख होती. म्हणजे १० दिवसात सर्व तयारी करायची होती. प्रशिक्षण ४ महिन्यांचे होते. (नंतर ते ५. ५ महिने झाले हा भाग वेगळा). त्या  दृष्टीने आम्ही १ यादी केली. तिथे कंपनीच्या कँटीनमध्ये जेवणाची व्यवस्था असल्यामुळे ते सामान न्यायचे नव्हते. इतर आवश्यक वस्तू आम्ही यादीप्रमाणे खरेदी केल्या. आणि बॅगा भरायला सुरुवात केली.

माझे फेब्रुवारी २००७ मध्येच लग्न झाले असल्याने तशी मी नवविवाहितच होते. शिवाय ह्याआधी कधीही मी अशी एकटी राहिले नव्हते. आणि सासर माहेर जवळ जवळच असल्याने व सासरची सर्वच माणसे अतिशय प्रेमळ असल्याने लग्न होऊन सासरी आले तरी एवढे काही जाणवले नव्हते.त्यामुळे जाण्याची खरेतर मला भीतीच वाटत होती. पण हा निर्णय केदारने आणि मी पूर्ण विचारांती घेतल्यामुळे त्याचा पाठिंबा होताच. बॅगा भरता भरता आमचे एकमेकाला धीर देणे चालूच होते. '४ महिने काय आत्ता जातील', 'पुणे हैदराबाद फक्त १० तासांचे अंतर आहे' इत्यादी. इकडे ऑफीसमध्येही डॉर्मिटरी बुकिंगचे कंफर्मेशन घेणे, तिकिट रिझर्वेशन वगैरे गोष्टी चालूच होत्या. माझे बाबा मला सोडायला हैदराबादला येणार असे ठरले. कारण माझा काका हैदराबादलाच असल्याने त्यांचे काकाकडेही जाणे झाले असते. त्यामुळे हैदराबादला पोचेपर्यंत तरी मला कसलीच काळजी नव्हती.

आमचा निघायचा दिवस उजाडला. २९ सप्टेंबर २००७‍.जड पावलांनी मी सर्वांचा निरोप घेतला आणि मी व बाबा ४. ४० च्या हैद्राबाद एक्सप्रेस मध्ये बसलो. आता इथून पुढे ४ महिने आपल्याला एकटीला काढायचे आहेत असे मी सारखे मनाला समजावत होते. माझ्याबरोबर पुण्याहून माझे ४ सहकारी पण होते. पण ते दुसऱ्या दिवशीच्या गाडीने येणार होते. शिवाय चेन्नईहून १ जण येणार होते. आणि माझे जपानी भाषेशी संबंधित डिपार्टमेंट असल्यामुळे जपानहून सुद्धा ६ जण येणार होते. असे आम्हाला १२ जणांना एकत्र प्रशिक्षण घ्यायचे होते.

३० तारखेला पहाटे ६ वाजता आम्ही (मी व बाबा) बेगमपेट ह्या स्थानकावर उतरलो. आधी ठरल्याप्रमाणे आम्ही आधी माझ्या काकाकडे जाणार होतो आणि तिथून कंपनीच्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी जाणार होतो. कंपनी काकाच्या घरापासून खूपच लांब आहे हे आम्हाला आधीच कळले होते. कंपनीने    राहण्याची व्यवस्था डॉर्मिटरीमध्ये केलेलीच होती आणि ती ऑफिसच्या कँपस मध्येच होती.

काकाकडे थोडा आराम करून , जेवण उरकून आम्ही साधारण दुपारी २ वाजता बहादुरपल्ली येथिल कंपनीच्या ऑफिसला जायला निघालो. ४ महिने रहायचे असल्यामुळे माझे सामान बरेच होते. पण १ रिक्षावाला आम्हाला न्यायला तयार झाला. माझ्याकडे पोस्टल ऍड्रेस होता पण त्यावरून काहीही बोध होत नव्हता. त्यामुळे शोधत शोधतच जायचे होते. (तशी कंपनीतर्फे स्टेशनवरून तिथे नेण्याची सोय होती पण आम्ही मध्ये काकाकडे गेल्याने आम्हाला ती मिळू शकली नही. ) २ ला रिक्षात बसलेलो आम्ही ३ वाजले तरी बहादुरपल्लीचा पत्ता नाही. आम्ही मधे मधे विचारत विचारत चाललो होतो. थोड्या वेळाने आम्ही बरेच गावाबाहेर आलो. मला तर हळू हळू रडूच यायला लागले. अशा ठिकाणी आपण ४ महिने कसे रहाणार ह्या विचाराने पाय थरथरू लागले. हायवेवरून बरेच अंतर पुढे गेल्यावर एकदाचा कंपनीच्या नावाचा फलक दृष्टीस पडला आणि जीव भांड्यात पडला.....

(क्रमशः)