माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-६

९ नोव्हेंबरला सकाळी मी पुण्याला पोचले. आमची लग्नानंतरची पहिली दिवाळी होती. ती आनंदात साजरी करून १२ नोव्हेंबरला सकाळी पुन्हा हैदराबादला आले. ह्या वेळी मी एकटीच बसने आले. अशा हळूहळू एक एक गोष्टी शिकत होते. पुण्याहून आल्यावर पुन्हा रुळायला थोडा वेळ लागला.

हैदराबादला आल्यावर लगेच २-३ दिवसांनी माझा वाढदिवस होता. हा माझा पहिला असा वाढदिवस होता जेव्हा माझ्या घरची माणसे माझ्या बरोबर नव्हती. म्हणून मी खूप दु:खात होते. माझा वाढदिवस इथे कोण साजरा करणार असा विचार करत करतच आदल्या दिवशी झोपले. पण सकाळी उठून पाहिले तर नाओने माझ्या उशाशी एक भेटवस्तू ठेवलेली होती. व त्यावर लिहिले होते, ' Many Happy Returns Of The Day......From Nao'. ते पाहून माझ्या डोळयात आनंदाश्रू तरळले. इथेही आपला वाढदिवस लक्षात ठेऊन साजरा करणारे कोणीतरी आहे ह्याचे खूप समाधान वाटले.उठून तयार होते न होते तोच दार वाजले. दार उघडून बघते तर माझे सर्व सहकारी दारात उभे होते. कुणाच्या हातात चॉकोलेट तर कुणाच्या हातात आइसक्रीम. सर्वांनी मला अशा वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मला खूप आनंद झाला. एव्हाना घरच्यांचे व मैत्रिणींचे फोन येणेही सुरू झालेच होते. मला कल्पनाही नव्हती की माझा वाढदिवस इतका छान साजरा होईल.

असे करत करत नोव्हेंबर महिना संपला. आता आमचे जावा चे प्रशिक्षण सुरू झाले होते. हे मी पहिल्यांदाच शिकत असल्याने खूप अभ्यास करणे आवश्यक होते. मला जावा मध्ये रस निर्माण झाल्याने प्रशिक्षणामध्ये मजा येऊ लागली व माझा बराचसा वेळ अभ्यासाची पुस्तके वाचण्यातच जाऊ लागला.

डिसेंबर उजाडल्यावर मी १५ डिसेंबर ह्या दिवसाची वाट पाहू लागले. कारण १५-१६ डिसेंबरच्या वीकेंडला केदार हैदराबादला येणार होता. म्हणून मी खूप खूष होते.डॉर्मिटरी मध्ये वीकेंडला नवरा/बायको आणि आई-वडील ह्यांना राहाण्याची सोय होती. मी केदारसाठी खोली आरक्षित करून ठेवलीच होती. केदार १४ ला रात्री पुण्याहून निघाला व १५ ला सकाळी ९ वाजता हैदराबादला पोचला. मी त्याला आणायला गावात गेलेच होते. मग आम्ही पॅरेडाइज परिसरात नाष्टा केला. आणि बसने डॉर्मिटरीवर आलो. केदारला डॉर्मिटरी व त्याचा परिसर दाखवला. त्याला खूपच आवडला.त्याने त्याच्या खोलीत सामान टाकले. मग फ्रेश होवून आम्ही गोळकोंडा फोर्ट बघण्यासाठी निघालो. गोळकोंडा फोर्ट खूपच सुंदर होता. आम्ही बरेच फोटोही काढले. बाहेरच जेवण वगैरे करून संध्याकाळी डॉर्म्सवर परतलो. मग कँपसमध्येच थोडा फेरफटका मारला. कंपनीचे कँपस अतिशय सुंदर आणि शांत असे होते. त्यामुळे तिथे फिरायला खूप छान वाटत असे.

दुसऱ्या दिवशी आम्ही बिर्ला मंदिर आणि लुंबिनी गार्डन बघण्यासाठी निघालो. आम्हाला जास्त वेळ नव्हता. कारण त्याच दिवशी केदारला परत जायचे होते. आम्ही ही दोन्ही ठिकाणे करून पुन्हा डॉर्मिटरीवर आलो. थोडा आराम केला. आणि पुन्हा ५. ३० च्या बसने निघालो. ह्या वेळेस केदार सामान घेऊनच निघाला. हैदराबाद शहरात थोडे फिरून एके ठिकाणी जेवण करून पुण्याच्या बसच्या स्टॉपवर येवून उभे राहिलो. पुण्याला जाणारी बस थोड्याच वेळात आली. आणि डोळ्यांत येणाऱ्या अश्रूंना थोपवत मी केदारचा निरोप घेतला.