माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-१२

९ तारखेची सकाळ उजाडली. त्या दिवशी मला प्रशिक्षण होते. पण केदार असल्याने मला मुळीच जावेसे वाटत नव्हते. शेवटी थोडा वेळ जाऊन यावे असे मी मनात ठरविले. तोपर्यंत केदार खोलीवर आराम करेल असे ठरले.

मी थोडा वेळ प्रशिक्षणाला जाऊन ५ च्या सुमारास परतले. मग मी व केदारने जवळच्याच शॉपिंग मार्टमध्ये जाऊन वेज पॅटीस खाल्ला. इथला वेज पॅटीस खूपच चविष्ट असे. मग कँपसमध्येच फेरफटका मारून आम्ही खोलीवर परतलो. 

१० तारखेला रविवार होता. केदार त्या दिवशी परत जाणार होता पुण्याला. आम्हाला काकाने जेवायला बोलावले होते. सकाळीच आम्ही कंपनीच्या बसने निघालो. आनंद थिएटरला उतरून आम्ही सालारजंग म्युझियम बघायला गेलो. मी खूपच लहानपणी ते बघितले असल्याने फारसे काही आठवत नव्हते. सालरजंग म्युझियम बघण्यासाठी दिवस पुरत नाही असे ऐकून होतो पण आम्ही दोघांनी ते २ तासात उरकले. तेथून आम्ही काकाकडे जेवायला गेलो. काकाने चविष्ट जेवण केले होते. काकू चुलत भावाच्या शिक्षणानिमित्त पुण्यात राहात असल्याने त्याला स्वयंपाकाची सवय होती. तिथे जेवण करून थोडा आराम करून आम्ही पुन्हा पॅरेडाइज येथे आलो. तिथे थोडी खरेदी केली. इकडे तिकडे फिरलो. आता हळूहळू केदारची जाण्याची वेळ जवळ येत होती. मग कामत रेस्टॉरंटमध्ये थोडेसे खाऊन पुण्याच्या बसच्या स्टॉपवर आलो.

तेव्हा माझी अशी कल्पना होती की प्रशिक्षण २३ फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे आता १५ च दिवसांत मी पुण्याला परत येणार अशी आम्हा दोघांची समजूत होती. म्हणून केदारला निरोप देताना ह्या वेळी त्रास करून घेतला नाही. ८.४० च्या बसने केदार पुण्याला व मी डॉर्मिटरीवर रवाना झाले.

त्रास करून घ्यायचा नाही असे ठरवूनही थोडेसे दुःख झालेच. राहून राहून एकमेकांच्या सहवासात घालवलेले ३ दिवस आठवत होते. कधी एकदा २३ तारीख येते असे झाले होते. तेव्हा काय कल्पना होती की प्रशिक्षण मार्चच्या १४ तारखेपर्यंत वाढणार आहे.......

सोमवारपासून पुन्हा दिनक्रम चालू झाला. मला आता परतण्याचे वेध लागले होते. तेवढ्यात प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये  जावातील २ अद्ययावत तंत्रेही शिकवण्याचे ठरले आणि प्रशिक्षण २३ फेब्रुवारीला संपण्याची शक्यता संपुष्टात आली.

(क्रमशः)