पाकिस्तानशी युद्ध कधी सुरू करायचे?

हा प्रश्न लोक सरळ सरळ विचारायला लागली आहेत. पण मला हा शुद्ध भावनावेग वाटतो. मला कोणी विचारले की त्यांना सांगते, अजून किमान ५ वर्षे तरी नाही. का ते आपण सविस्तर पाहू -

१) युद्ध शास्त्राचा पहिला नियम आहे की युद्ध हे नेहमी आपल्या सोयीच्या वेळेला (सोयीच्या ऋतूत) सोयीच्या जागी (सोयीच्या भौगोलिक परिस्थितीत) आणि शत्रूला अनपेक्षित असताना करायचे असते. युद्धकधीही इतरांच्या सोयीने करायचे नसते.

ह्या विषयात आपण अफजलखानाच्या वधाच्या वेळी शिवाजीराजे कसे वागले त्याचा नीट विचार करू - अफजलखान मे १६५९ मध्ये विजापुरातून निघतो. त्याला शिवाजी राजांना समोरासमोरची लढाई करण्यास प्रवृत्त करावयाचे आहे. प्रथम तो तुळजापूर, पंढरपूर इ. ठिकाणी देवळे फोडतो, मुलुख बेचिराख करतो. खुद्द तुळजा भवानीची मूर्ती भग्न करतो, तिथेच गाय मारतो (राजा शिवछत्रपती, पान २६५) निदान देवळे फोडल्यावर तरी शिवाजी सह्याद्री सोडून मोकळ्या मुलुखात येईल हि अपेक्षा. ती फोल ठरल्यावर तो पुढची चाल रचतो.

राजांचे मेहुणे बजाजी नाईक निंबाळकरांना मलवडीस साखळदंडानिशी बांधून ठेवतो. केवळ शिवाजी राजांनी डोंगराळ मुलुख सोडून देऊन माणदेशाच्या मैदानावर यावे हाच ह्या मागचा हेतू. मात्र शिवाजीराजे खानाच्याच सैन्यातील नाईकजी पांढरे ह्यांच्याशी संधान बांधतात. त्यांना आपुलकीच्या भाषेत लिहितात की बजाजी हे खानाचेच खिदमतगार असताना त्यांना खानाने कैदेत ठेवणे बरोबर नाही. आपण मध्यस्थी करावी. ह्याचा परिणाम म्हणजे नाईकजी स्वतः: खानाकडे बजाजींना सोडा अशी मागणी लावून ठेवतात.

यथावकाश आपल्याशी एकनिष्ठ असलेले सर्व मराठे सरदार आपल्या विरुद्ध जातील ह्या भीतीने खान दोन लाख दहा हजार रुपयांवर बजाजींना सोडायला तयार होतो ज्यासाठी स्वतः: नाईकजी बजाजींसाठी जामीन राहतात. अफजलखानाचा हा सुद्धा प्रयत्न फसतो.

जसे हॉलिवूड पटांत सरसकट सगळे जर्मन सेनाधिकारी मूर्ख आहेत असे दाखवले जाते तसे आपल्याकडे सुद्धा अफजलखान हा कसा मूर्ख होता ते दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र ते तितकेसे खरे नाही.

ह्या खेळ्या फसल्यावर सुद्धा अफजलखान गप्प बसलेला नाही. सह्याद्री म्हणजे मृत्युमुख हे त्याला पक्के ठाऊक आहे. कदाचित शिवाजी नेस्तनाबूत होईल ही पण त्यासाठी आपल्याला प्रचंड किंमत द्यावी लागेल हे त्याला ठाऊक आहे. आपल्या सैन्याची विनाकारण हानी त्याला मान्य नाही.

मग तो आता मानसिक युद्ध खेळायला सुरुवात करतो. तो शिवाजीच्या सर्व निष्ठावंत देशमुखांना, सरदारांना दमदाटीची पत्र पाठवतो -

उदा. शिवाजी डोंगरात लपून बसला आहे. तो तुमचे काय रक्षण करणार, माझ्याकडे या. मी तुम्हाला वतने देतो. मात्र नाही आलात तर...

खरोखरच ह्या मानसिक दबावाला खंडोजी खोपडे, सुलतान जगदाळे वै. देशमुख बळी पडतात. मात्र कान्होजी जेध्यांसारखे निष्ठावंत सरळ शिवाजीराज्यांच्या चरणी रुजू होतात. तसेच शिवाजीराजांना घाबरट वै. संबोधणे हा पण बुद्धिभेदाचाच एक प्रकार आहे ज्यायोगे त्यावेळच्या जनतेच्या मनांत शिवाजीराजे हे कचखाऊ आहेत असे चित्र उभे करायचे हा प्रयत्न आहे. मुलुखच्या मुलुख बेचिराख करायचे आणि वर म्हणायचे की बघा शिवाजी महाराज डोंगरात लपून बसलेले आहेत. युद्ध शास्त्रात प्रत्यक्ष युद्धाबरोबरच ह्या मानसिक युद्धाला फार मोठे महत्त्व आहे. आठवा, ऑस्ट्रेलिया वि. भारत क्रिकेट सामने.

आता शिवाजी महाराज त्याला कसे उत्तर देतात ते पाहू - एका सकाळी ते जाहीर करतात की त्यांच्या स्वप्नात प्रत्यक्ष भवानीमाता आली होती. तिने सांगितले की चिंता करू नकोस. तुजला यश मिळेल. मी तुझी तलवार होऊन राहिलेले आहे. (राजा शिवछत्रपती, पान २७९)

हे ऐकल्यावर जे शिवाजी राजांचे साथीदार आत्तापर्यंत युद्ध नको, तह करा असा राजांकडे आग्रह धरत असतात, ते खानाशी युद्धच करावे ह्या शिवाजीराजांच्या म्हणण्याला आता पाठिंबा देतात. (राजा शिवछत्रपती, पान २८०) खुद्द चाणक्याने लिहिलेले आहे की राजाने वारंवार आपल्याला दैव कसे वश आहे / आपल्या पाठीशी परमेश्वर कसा उभा आहे / त्याची आपल्याला कशी प्रचिती येत आहे हे सांगत राहावे. त्या विषयीचा श्लोक मिळाला की येथे देईन.

ह्याच मानसिक दबावाचे पुढचे पाऊल म्हणून राजे आता प्रतापगडावर जायला निघतात (११ जुलै १६५९). खान वाईत आहे. खानाला राजांनी प्रतापगडाकडे कूच केल्याची बातमी मिळते आणि खानाला कळून चुकते की समोरासमोरच्या लढाईसाठी राजे काही आता येत नाहीत. मात्र सोयीच्या जागी युद्ध हा नियम खानाला सुद्धा माहित आहे. जावळीवर चालून जायला तो काही दुधखुळा नाही. तो आपला वकिल कृष्णाजीपंत कुलकर्णी राजांकडे पाठवतो.

इकडे प्रतापगडावर येताक्षणी राजे सर्व निष्ठावंत सरदारांना बोलवून युद्धासाठी सैन्याची जुळवाजुळव करायला सुरुवात करतात. तिकडे खान शिवाजी राजांनी सपाटीवर यावे ह्यासाठी साम, दाम, दंड, भेद इ. सर्व उपाय आजमावत आहे.

त्याचे पहिले पत्र राजांना त्यांचा शहाजीराजांसमवेत असलेला भाईचारा वर्णन करते. त्याला राजे उत्तर देतात की मला खान साहेबांची भीती वाटते, मला ते वडिलांप्रमाणे. सबब, त्यांनी स्वतः: जावळीत येऊनमला क्षमा करून, मला बोटाला धरूनबादशाहाकडे न्यावे.

खानाने शिवाजीचा कावा ओळखला आहे. तो दुसरे पत्र दमदाटीचे पाठवतो. त्यावर शिवाजी राजे आपला वकिल पंताजी बोकिल ह्यांना खानाकडे पाठवतात. मात्र ते पंताजी बोकिल ह्यांना बजावून सांगतात की बेल-भंडारा उचलायला लागला तरी अनमान न करणे. शपथेवर खोटे बोलणे पण खानाला सैन्यासह जावळीत आणणे. सोबत खानासाठी अनमोल भेटी पाठवतात.

मात्र खान हा भेटवस्तुंना भाळणारा भोटमामा नाही. त्याच्या मनात अजून कित्येक महिने अशी बोलणी चालूच ठेवायची तयारी आहे. नाक दाबले की तोंड उघडते हे त्याला पक्के ठाऊक आहे. पण बडी बेगमचा धीर मात्र सुटलेला आहे. तिला डोंगरातील उंदिर ताबडतोब पिंजऱ्यात पकडून हवा आहे. कारण खानाची मोहिम चालू होऊन ५ महिने झालेले आहेत व अवाढव्य सैन्यासह निघालेल्या खानाला शिवाजी सारखा तुटपुंजे सैन्य असलेला छोटा जहागिरदार पकडता आलेला नाही ह्यात तिला भयंकर नाचक्की वाटत आहे. मात्र ह्या बालीश हट्टापुढे खानाचे राजनीतिक चातुर्य कमी पडते. तो जावळीत यायचे कबुल करतो. बाबासाहेब पुरंदरे म्हणतात, एकदा कलंडले की पूर्ण कलंडायला कितीसा वेळ लागतो?

ऍबे कॅरी हा इंग्रज अधिकारी शिवाजीराजांबद्दल लिहितो की शिवाजी राजांना केवळ आपला मुलुखच ठाऊक नव्हता तर त्यावर असलेल्या प्रत्येक झुडुपांसहित त्याच्याकडे नकाशे उपलब्ध होते. राजांच्या गुप्तहेरखात्याविषयी तर अनेकदा शत्रुंनी सुद्धा गौरवोद्गार काढलेले आहेत.

अश्या रीतीने शिवाजीराजे आपल्या सोयीच्या ठिकाणी, सोयीच्या वेळेलाच युद्ध करतात. सोयीची वेळ अशासाठी म्हणायची की जावळीत पावसाळा संपत आला आहे. सर्वत्र निबिड अरण्य आणि दाट शेवाळे माजलेले आहे. कृष्णा आणि कोयना दुथडी भरून वाहात आहेत. पायवाटा, चोरवाटा काटेरी झुडुपे लावून बंद केलेल्या आहेत. खानाच्या सैन्याला माघारी पळणे पण अशक्य व्हावे. दस्तुरखुद्द प्रत्यक्ष भेटीच्या दिवशी राजांनी आपले सैन्य जावळीत जागोजागी पेरून ठेवले. तसेच पंताजी बोकिलांच्या सहाय्याने जावळीत रडतोंडीच्या घाटाजवळ खानाचे मुख्य सैन्य, खानाचे बिनीचे १५०० शूर सरदार जनीच्या टेंबापाशी आणि खुद्द खान व त्याचे सर्वोत्तम १० सैनिक भेटीच्या जागी जी गडाच्या मध्यावर आहे तिथे असे त्रिभाजित केले. ह्या तिन्ही जागा युद्धाकरता केवळ महाराजांच्याच सोयीच्या आहेत ह्यात शंकाच नाही. त्या विषयीसविस्तर युद्धशास्त्रीय विवेचनआपल्याला "वेध महामानवाचा" ह्या पुस्तकात वाचता येईल.

(अस्वीकरण : हा लेख इतिहासाचा वस्तुविषय आहे, साहित्यकृती नाही. शुद्धलेखक जंतुंनी कृपया व्याकरण दोष काढू नयेत ही वि. वि. )

(क्रमश:)