उंडे, दिंडे , मांडे आणि असेच !

हा लेख जरी खाद्यपदार्थाविषयी असला तरी पाककृती नाही हे वाचनानंतर समजू शकेल

उंडे, मांडे आणि दिंडे या तीन वस्तूंमध्ये साम्य काय आहे असे विचारल्यास फक्त त्यांच्या उच्चार साधर्म्याचाच विचार डोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण या तीनपैकी दोन पदार्थांची तर नावेही किती लोकांना माहीत असतील याविषयी शंकाच आहे. कदाचित उंडे आणि मांडे ही तर आडनावे म्हणूनच लोकांना जास्त परिचित असतील. या तीनही पदार्थात एक महत्वाचे साम्य आहे ते म्हणजे आता हे आपल्याकडे फार कमी कुटुंबात बनवले जातात.

आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावास्येला दिव्याची अंवस म्हणतात. त्यादिवशी दिव्यांची पूजा करण्यात येते. त्यादिवशी करण्यात येणारा विशिष्ट खाद्यपदार्थ म्हणजे उंडे. मात्र आता ते आमच्याकडेही बनत नाही हा पदार्थ बाजरीची भरड काढून त्यापासून बनवतात. त्या भरडीपासून मोठ्या दिव्याच्या आकाराचे हे उंडे बनवत असत. त्यासाठी आईची तयारी आदल्या दिवसापासूनच सुरू होत असे. चांगली बाजरी आणून त्या धान्याची भरड घरच्याच जात्यावर करावी लागे कारण हा पदार्थ वर्षातून एकदाच होत असल्याने गिरणीत तशी भरड काढून मिळण्याची सोय नसे. तशी भरड काढून अंवसेच्या दिवशी सकाळी त्या भरडीत चवीपुरते मीठ घालून पोकळ शंकूच्या(मोठ्या दिव्याच्या) आकाराचे उंडे आई बनवत असे आणि नंतर ते उकडून काढत असे. हा पदार्थ मग आम्ही मोठ्या आवडीने दुधात गूळ कालवून केलेल्या गुळवणीत कुस्करून खात असू. लग्नानंतर माझ्या बायकोनेही ही परंपरा काही दिवस संभाळली पण एका वर्षी अरगट मिश्रित बाजरी खाण्याने काही लोक दगावल्यामुळे त्यावर्षी बाजरी खाणेच आम्ही सोडले. त्यामुळे एका दिवसासाठी एवढा उपद्व्याप करायला तिला नकोसे वाटू लागले शिवाय आमच्या मुलांना हा पदार्थ फार हवाहवासा वाटत नसल्याने उंड्यांचे उच्चाटण आमच्या घरातून झाले ते झालेच.

दुसरा एक असाच जवळजवळ नामशेषच झालेला पदार्थ म्हनजे दिंडे. श्रावणाच्या सुरवातीसच येणाऱ्या नागपंचमीला होणारा हा पदार्थ. नागपंचमीच्या कहाणीत शेतकऱ्याच्या नांगराचा फाळ लागून शेतातील नागाच्या पिलांची हत्या झाल्यामुळे नागाच्या दंशाने शेतकऱ्याचा निर्वंश झाला पण शेतकऱ्याच्या सुनेच्या नागपूजनाने संतुष्ट झालेल्या नागिणीने त्या शापास उ:शाप दिला असे वर्णन केले आहे त्यामुळे त्यादिवशी काहीही कापायचे नाही, तळायचे नाही, शेत खणायचे नाही, तव्यावर काही भाजायचे नाही असा प्रघात! आमच्या घरात तो अजूनही टिकून आहे त्यामुळे त्यादिवशी मला दाढीही करायची बंदी आहे. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे या अटीत बसणारा खाद्यपदार्थ त्यादिवशी करायचा असल्यामुळे त्यादिवशी दिंडे असतात. हा पदार्थ कणीक लाटून त्यात पुरण भरून त्याच्या चौकोनी घड्या करायच्या आणि त्या उकडून काढायच्या. त्यामुळे त्यादिवशी भाजीही चिरून करायची नाही असा प्रघात आहे आणि अजूनही आमच्या सौभाग्यवतीच्या राज्यात तो चालू आहे. हाही पदार्थ वर्षातून एकदाच होतो.

मांडे हा पदार्थ तर कर्नाटकातलाच आहे. आपल्याकडे वाक्प्रचारात मात्र "मनातले मांडे खाणे" आहे. कदाचित आपण बनवू शकत नसल्यामुळे असा हा वाक्प्रचार आला असावा. मी तरी हा पदार्थ कानडी मित्राच्या लग्नसमारंभातच खाल्ला आहे आणि त्यांच्या लग्नसमारंभात मात्र तो असावाच लागतो असे दिसते. आमच्या घरी मात्र हा पदार्थ अजूनपर्यंत कोणी बनवला नाही. तो बनवण्याचे काम मोठ्या कौशल्याचे असते हे तो इतरांना बनवतांना पाहून बनलेले माझे मत आहे. त्यासाठी मोठ्या पाठीचा मातीचा घडा लागते. त्यामुळेच ज्ञानेश्वरांना मांडे खाण्याची लहर आल्यावर जेव्हां धर्माभिमान्यांनी त्यांना मातीचे भांडे मिळू दिले नाही तेव्हां त्यांना जठराग्नी प्रदीप्त करून आपल्या पाठीवर मांडे करण्याची आज्ञा मुक्ताबाईला करावी लागली. हा पदार्थ म्हणजे अतिशय पातळ अशी पिठिसाखरेची पोळीच असते आणि तीही पुरणपोळीप्रमाणे दुधाबरोबर खातात.

असाच एक फारच कमी लोकांना माहीत असलेला पदार्थ म्हणजे चकुल्या. आमच्या लहानपणी हा महिन्यातून एकदोनदा तरी व्हायचा. त्यात कणकेच्या पोळ्या लाटून त्याचे चिरण्याने चौकोनी तुकडे करून ते अगोदरच केलेल्या आमटीत शिजवून काढायचे. हा पदार्थ केल्यावर इतर काहीच करावे लागत नाही कारण मग भाजी चटणी वा कोशिंबीर यांची आवश्यकताच नसते. काही लोक याच पदार्थास वरणफळेही म्हणतात. आम्ही अमेरिकेत गेल्यावर तेथे करण्यात येणाऱ्या पास्त्याचा वापर करून हा पदार्थ करायचे आणि त्याचे नाव आम्ही पास्तुल्या ठेवले होते.

अजून एक असाच नामशेष झालेला पदार्थ म्हणजे शेंगोळ्याची आमटी. हे शेंगोळे म्हणजे निरनिराळ्या दाळींची भरड एकत्र करून त्याच्या केलेल्या छोट्याछोट्या गोळ्या. त्या आमटीत टाकून शिजवल्या गेल्यावर आमटीस छान चव येत असे. एकदा आमच्या लहानपणी असेच पाहुणे आलेले असताना हा पदार्थ केला होता. पाहुण्यांना हा पादार्थ हवा का असे आईने माझ्या बहिणीस विचारावयास सांगितले तर ती वेडी त्यांना काही न विचारता " पाव्हण्यांना शेंगोळे पाहिजेत का असे कसे विचारू? " असे म्हणून जे हसत बसली ती आईचा धपाटा पाठीत बसल्यावरच भानावर आली.

आजच्या पिझ्झा, बर्गरच्या जमान्यात आता या पदार्थांच्या फक्त आठवणीच काढायच्या.