...............................................
बेट !
...............................................
कुठल्या कुठे मज फेकले आहेस तू !
किंवा असे, मज पेरले आहेस तू !
उगवून मी येईन ही खात्री तुला...?
आव्हान हे का पेलले आहेस तू ?
चुपचाप तू ऐकून घे आता मला
मौनास माझ्या छेडले आहेस तू !
ओझे अपेक्षांचे दिले माझ्या शिरी...
अन् मोकळे तुज ठेवले आहेस तू !
आता मला माळूनही घेशील ना ?
मातीतुनी मज वेचले आहेस तू !
नव्हतो कुणीही मी तुझा...नाही कुणी...
पण वेड माझे घेतले आहेस तू !
कोरेपणासुद्धा तुझा मी वाचला...
तेथे मला उल्लेखले आहेस तू !
लाजायचे ? लाजून घे...पण सांग ना...
हे चांदणे का नेसले आहेस तू ?
केलेस एकाकी मला तू केवढे...!
माझ्या मनाला वेढले आहेस तू !!
- प्रदीप कुलकर्णी
....................................................
रचनाकाल ः ६ ऑगस्ट २००९
....................................................